Friday 18 October 2013

प्रचार


प्रचार म्हणजे लोकांच्या वृत्ती, समजुती किंवा कृती यांमध्ये हवा तो बदल घडवून आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न. प्रचारक व्यक्ती किंवा यंत्रणा जाणूनबुजून इतरांना आपल्या विचारप्रणालीस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करतात व तो यशस्वी व्हावा यासाठी शब्द, हावभाव, संगीत, निशाण, ðगणवेश यांसारख्या अनेक गोष्टींचा कुशलतेने वापर करतात. बुद्धिपुरस्सर सूचना देऊन त्यांची वारंवार पुनरुक्ती करणे हे प्रचाराचे तंत्र असते; कारण तसे केल्याने त्या सूचना लोकांच्या मनावर बिंबविणे सोपे जाते व प्रचारकांचा हेतू साध्य होतो. प्रचारकांसमोर विशिष्ट उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे असतात आणि ती साध्य करण्यासाठी ते काही निवडक घटना, युक्तिवाद आणि प्रतीके यांची विचारपूर्वक मांडणी करतात. ही मांडणी परिणामकारक व्हावी म्हणून पुष्कळदा ते काही संबंधित घटनांचा उल्लेखसुद्धा वगळतात आणि लोकांचे लक्ष आपल्या प्रचारसंदेशांखेरीज इतरत्र विचलित होऊ नये, याची काळजी घेतात. म्हणूनच प्रचार व शिक्षण यांमध्ये फरक आढळतो. शिक्षणाप्रमाणे विषयाच्या सर्व बाजू लोकांसमोर मांडण्याच्या भानगडीत प्रचारक पडत नाहीत. आपला प्रचार हेच पूर्ण सत्य आहे असे ते मानतात व म्हणून प्रचार करताना आपण लोकांना शिक्षणच देत आहोत, अशी त्यांची भावना असते.


प्रचार हा शब्द राजकीय चळवळीशी निगडित असला, तरी त्याचे स्वरूप कितीतरी व्यापक आहे. प्रचारामुळे लोकमत जागृत करता येते व बदलता येते. लोकांच्या आचारविचारांना प्रचाराने एक विशिष्ट वळण लावता येते व त्यातूनच एकात्मता निर्माण होऊ शकते. प्रचाराचा अनेक वेळा दुरुपयोगही केला जातो. चुकीची माहिती, भावनात्मक युक्तिवाद व जाणूनबुजून घेतलेली एकांगी वैचारिक भूमिका यांच्या आधारे जनसमूहांच्या वृत्ती, प्रेरणा व आवेग यांचा चलाखीने वापर करून घेऊन तज्ज्ञ प्रचारक आपले उद्दिष्ट साधतात. म्हणूनच कोणतीही गोष्ट अवास्तव करून सांगणे म्हणजेच प्रचार, असा त्या शब्दाला एक सांकेतिक अर्थ प्राप्त झाला आहे. वस्तुतः तसे असण्याचे कारण नाही. चांगल्या गोष्टीचासुद्धा प्रचार करण्याची जरूरी असते.

प्रचार उघड किंवा प्रच्छन्न असू शकतो. उघड प्रचारात प्रचारक कोण हे लोकांना उघडपणे समजू शकते, तर प्रच्छन्न प्रचारात प्रचारक पडद्याआडून कार्य करीत असतो. राजकीय मुत्सद्देगिरी, कायदेशीर युक्तिवाद, जाहिरातबाजी इ. क्षेत्रांत दोन्ही प्रकारच्या प्रचारांना वाव मिळू शकतो. मानसशास्त्रीय युद्धतंत्रामध्ये युद्धापूर्वी किंवा युद्ध चालू असताना शत्रुपक्षीय नागरिकांमध्ये किंवा सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण व्हावा, त्यांचा अवसानभंग व्हावा, हल्लासमयी ते गाफील राहावेत किंवा त्यांनी शरणागती पतकरावी या हेतूने प्रचार करण्यात येतो. प्रचाराचा उपयोग राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या मतपरिवर्तनासाठीही केला जातो. अशा वेळी त्यांना विशिष्ट राजनीतीचे डोस पाजणे, त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण व्हावी म्हणून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, इ. मार्गांनी आपली विशिष्ट विचारसरणी त्यांच्या अंगवळणी पाडण्याचेही प्रयत्न होत असतात. प्रचाराचा उपयोग माल खपावा म्हणून व्यापारी कारखानदार व जाहिरातदार तर करतातच; परंतु राजकीय पक्षांनाही निवडणुका जिंकण्यासाठी प्रचाराची गरज भासते. धर्मप्रसारासाठी प्रचारतंत्राचा वापर करण्यात येतो.

विसाव्या शतकातील यांत्रिक-तांत्रिक प्रगतीमुळे अनेक खुणा, प्रतीके व माध्यमे यांच्या द्वारा प्रचाराचा संदेश प्रसृत करता येतो. खुणा अनेक प्रकारच्या असतात व त्यांनी माणसांच्या वृत्तीचे उत्तेजन साधता येते. त्या शब्दरूप किंवा ध्वनिरूप असू शकतात. (उदा., भाषणे, लेख किंवा तोफांचे आवाज), हावभाव (सैनिकी सलामी, कवायती, संचलन इ.), वेशभूषा (गणवेश), इमारती (स्मारके), दृक्‌प्रतिमा (निशाण, स्वस्तिक, चित्रे) इत्यादींचाही प्रचारासाठी उपयोग करता येतो. सामान्यतः प्रतीक म्हणजे विशिष्ट अर्थबोध करून देणारे चिन्ह. अर्थात एखादे प्रतीक निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या अर्थाचा बोध करून देणे शक्य आहे. प्रचारासाठी खुणांची व प्रतीकांची निवड करताना त्यांचा निरनिराळ्या लोकांवर काय प्रभाव आहे, याचे संशोधन करावे लागते. सर्वेक्षणाच्या साहाय्याने जनमताचा अंदाज घेऊन वा मुलाखतींद्वारे गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून प्रचारकांना मार्गदर्शन करण्याची कामगिरी काही खास संस्था करीत असतात.

खुणांचा व प्रतीकांचा वापर करण्यासाठी माध्यमांची गरज लागते. आधुनिक काळात विविध प्रकारची माध्यमेही उपलब्ध आहेत. लेखी माध्यमांत पत्रे, पत्रके, पत्रिका, भित्तिचित्रे, जाहिरात फलक, वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तिका, पुस्तके व भिंतीवरील किंवा रस्त्यावरील लिखाण इत्यादींचा समावेश होतो. दृक्‌श्राव्य माध्यमांमध्ये जाहीर व्याख्याने, चित्रपट, नाटके, मिरवणुकी, वाद्यवृंद, निदर्शने इत्यादींचा सामान्यपणे वापर केला जातो.

ऐतिहासिक आढावा : रोमन कॅथलिक पंथाने १६२२ मध्ये नेमलेल्या धर्मप्रसारक स्थायी समितीचे (द काँग्रिगेशन फॉर प्रॉपगेशन ऑफ दे फेथ) नाव व कार्य यांवरून ‘प्रॉपगँडा’ (प्रचार) ही संज्ञा प्रथम वापरात आली असली, तरी प्रचारकार्य मात्र तत्पूर्वी शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. प्राचीन संस्कृतींच्या अवशेषांवरून असे आढळते, की हजारो वर्षांपासून लोकांना दिपवून टाकणारे वेष, पुतळे, मंदिरे, राजवाडे, कायदेशीर व धार्मिक युक्तिवाद इत्यादींचा उपयोग करून राजे व धर्मगुरू यांनी आपला मोठेपणा व दैवी स्वरूप समाजावर ठसविण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट सामाजिक-धार्मिक पंथांना लोकाश्रय मिळावा म्हणून अनेक आख्यायिका, दृष्टांतकथा, म्हणी, आदेश इत्यादींचा प्रचार करण्यात आला. त्यांचे अविरोध स्वागत झाल्याने त्या काळी प्रचाराचे सिद्धांत शोधण्याची किंवा सूत्ररूपाने मांडण्याची गरज भासली नसावी. ख्रिस्तपूर्व ५०० च्या सुमारास अथेन्समध्ये अलंकारशास्त्र या सदराखाली वक्तृत्वकलेचा व प्रचारतंत्राचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. आयसॉक्राटीझ, प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी त्या शास्त्रातील नियमांचे संकलन केले. त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी या संदर्भातील साधनांच्या विश्वसनीयतेचा प्रश्न हाताळला. वक्त्याने श्रोत्यांना आपण लोकांच्या हिताचेच सत्य सांगत आहोत, आपला हेतू चांगला आहे हे कसे पटवून द्यावे, याचाही त्यांनी ऊहापोह केला. ग्रीकांप्रमाणेच अन्य प्राचीन समाजांमध्येही असे प्रयत्न झाल्याचे आढळते. ⇨बुद्ध (इ. स. पू. सु. ५६३-४८३), ⇨ कन्फ्यूशस (इ. स. पू. सु. ५५१-४७९) यांनीदेखील प्लेटोप्रमाणेच सत्यकथन, प्रभावी वक्तृत्व आणि सुयोग्य भाषण-लिखाण यांच्या साहाय्याने जनतेला सन्मार्गाचे दर्शन कसे घडवावे, याचे समर्थन केले आहे. कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात मानसशास्त्रीय युद्धपद्धतीचा व मुत्सद्देगिरीचा उल्लेख आढळतो व त्यामध्येही प्रचारकार्य कसे तडीस न्यावे याचे दिग्दर्शन आहे. स्वुन्‌ ज या चिनी लेखकाने युद्धकलेवरील आपल्या ग्रंथातही अशाच प्रकारचा उपदेश केला. सर्वच राजकीय पंथ व धर्म यांचा विस्तार आस्थापूर्वक विश्वास व विचारपूर्वक प्रचार या दोहोंच्या आधारेच बहुधा झाला असावा. ग्रीक व रोमन भाषांतून निवडणुकीतील डावपेच या विषयावर लिखाण आढळते. सोळाव्या शतकात इटलीमध्ये मॅकिआव्हेलीने, कौटिल्य व स्वुन्‌ ज यांच्याप्रमाणेच, शांतताकाळात व युद्धात धर्मशीलता व दुटप्पीपणा यांचा प्रचारासाठी होणाऱ्या उपयोगाविषयी उल्लेख केला आहे. शेक्सपिअरच्या नाटकांतूनही प्रचारतंत्राचा वापर अनेक ठिकाणी आढळतो. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे कारखाने निघाले व त्यांना आपल्या प्रचंड उत्पादनाची विक्री करण्यासाठी खास प्रयत्न करणे क्रमप्राप्त झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस निरनिराळ्या ग्राहकवर्गांच्या खरेदीविषयक प्रेरणांचा व जाहिरातींना आणि विविध विक्रयतंत्रांना मिळणाऱ्या त्यांच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यास संशोधकांनी सुरुवात केली. १९३० नंतर ग्राहक सर्वेक्षणांचा वापर करून मालाच्या विक्रीक्षेत्राचे विश्लेषण करण्याची पद्धत बहुतेक सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये रूढ झाली. विद्यमान काळात तर ही माहिती इतक्या मोठ्या प्रमाणावर गोळा केली जाते, की तिचा संग्रह करण्यासाठी गणकयंत्राचा उपयोग करावा लागतो. नभोवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके इ. माध्यमांचा जाहिरातींसाठी वापर करणाऱ्यांना ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी, त्यांची आर्थिक कुवत, शिक्षण अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. विपणिसंशोधन करून ही माहिती गोळा करणे, तिचे योग्य विश्लेषण करणे व हवी तेव्हा ती उपलब्ध करून देणे, हे कार्य गणकयंत्रांच्या मदतीमुळे बरेच सोपे झाले आहे. व्यापार, समाजकारण व राजकारण या क्षेत्रांत अज्ञानी आणि अशिक्षित जनतेतही गृहीतकल्पना, आख्यायिका, अर्धसत्य इत्यादींच्या आधारे प्रचारक दिशाभूल करू शकतात, याची जाणीव हळूहळू विचारवंताना होऊ लागली व त्यांनी प्रचाराचा सखोल अभ्यास केला. ⇨ फ्रॉइड सिग्मंड (१८५६-१९३९), वॉल्टर लिपमन, हॅरल्ड डी. लसवेल यांसारख्या अभ्यासकांनी प्रचारविषयक तत्त्वांचे विश्लेषण केले. याचा परिणाम होऊन प्रचार हे केवळ एक तंत्र किंवा कला न राहता शास्त्रच बनले व त्यावर विपुल ग्रंथनिर्मिती होऊ लागली. प्रचाराच्या विविध शाखांमध्ये निष्णात असलेले तज्ञ हे कारखानदार, राजकीय पक्ष, शासन इत्यादींना मार्गदर्शन करू शकतात.




प्रचाराचे घटक : प्रचारकाला आपली कामगिरी पार पाडताना अनेक प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागते. त्यांतील प्रमुख प्रश्न वा घटक पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रचाराचे उद्दिष्ट, क्षेत्र व अपेक्षित बदलाचे स्वरूप, (२) जागतिक समाजव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप व त्यातील परिवर्तनाची दिशा, (३) समाजातील विविध गटांचे सध्याचे स्वरूप व त्यांत होत असलेले बदल, (४) प्रचारसंदेश खुद्द प्रचारकाने की त्याच्या प्रतिनिधींनी द्यावा याचा निर्णय, (५) प्रचाराची प्रतीके, (६) प्रचाराची माध्यमे, (७) ज्यांना उद्देशून प्रचार करावयाचा त्यांचे स्वरूप, (८) परिणामाचे मूल्यमापन, (९) संभाव्य विरोधकांची भूमिका व मार्ग आणि (१०) विरोधकांना तोंड देण्याची योजना. सद्यःपरिस्थितीत प्रचाराचे हे दहा घटक विचारात घेताना प्रचारकाला माफक असेच यश मिळत असले, तरी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावाच लागतो.




प्रचाराची उद्दिष्टे निश्चित करणे हे प्रचारकाचे आद्य कर्तव्य ठरते. विशिष्ट मालाची विक्री साधावयाची असल्यास उद्दिष्ट निश्चित करणे सोपे असते; परंतु जेव्हा बऱ्याच लोकांनी आपला धर्मपंथ स्वीकारावा, आपणास अभिप्रेत असलेली समाजरचना मान्य करावी, युद्धाच्या किंवा क्रांतीच्या प्रयत्नांत सामील व्हावे, असा प्रचारकाचा हेतू असतो, तेव्हा उद्दिष्टांचे निश्चित वर्णन करणे फार अवघड होते. अशा प्रसंगी बरेच कूटप्रश्न उद्‌भवतात. शिवाय प्रचार करताना प्रचारकाला जागतिक संदर्भ व त्यात सदोदित होत असणारे बदल ध्यानी घ्यावे लागतात; नाहीतर त्याचा प्रचार वाया जाण्याची शक्यता असते. पूर्वीच्या काळी एकांगी प्रचार करणे सोपे असे व त्याचा परिणामही तात्काळ अपेक्षेप्रमाणे होत असे. परंतु संदेशवहन आजकाल सर्वव्यापी व जलद झाल्यामुळे एकांगी प्रचारकास सहजासहजी यश मिळू शकत नाही. म्हणूनच दूरदर्शी प्रचारक आपल्या प्रचारात केवळ विशिष्ट संकेतांचाच वापर न करता सार्वत्रिक प्रतीकांना अधिक महत्त्व देतात. हे कामदेखील सोपे नसते; कारण समाजात वर्गजाणीव बाळगणारे अनेक गट असतात, त्यांचे हितसंबंध वेगवेगळे असतात व त्यांच्यात संघर्षही असू शकतो. प्रचार स्वतः करावा की दुसऱ्यांमार्फत करावा, याचाही विचार करावा लागतो. बऱ्याच वेळा दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत प्रचार करता आल्यास तो विशेष व्यापक व प्रभावी होऊ शकतो. प्रचारकार्याचा निःपात करण्याचे शासनाने ठरविले, तर मूळ प्रवर्तकास भूमिगत होऊन आपल्या साथीदारांकरवी प्रचारकार्य चालू ठेवावे लागते. प्रचारकास जेथे प्रचार करावयाचा असतो, तेथील भाषेवर प्रभुत्व नसेल किंवा तेथील संस्कृतीमधील महत्त्वाच्या प्रतीकांची पूर्ण माहिती नसेल किंवा धार्मिक, वांशिक अगर सांस्कृतिक भावनांमुळे प्रचारकाविरुद्ध तेथील लोकांचे पूर्वग्रह असतील, तर त्याने स्वतः प्रचार करणे इष्ट ठरत नाही. अशा वेळी पडद्याआड राहून केलेला प्रचारच अधिक सोईस्कर असतो. प्रचारकार्यात नेतृत्वाला अतिशय महत्त्व आहे. सर्वसाधारण माणसे निष्क्रिय असतात; परंतु त्यांच्या प्रशंसेस व विश्वासास पात्र असणाऱ्या त्यांच्या आवडत्या नेत्याने चेतना दिल्यास त्या व्यक्ती एकाएकी कार्यप्रवण होतात. प्रचारसाधनांनी नेत्याची प्रतिमा जनमानसावर ठसविता येते. प्रचारकाने प्रतीकांची निवड करताना केवळ तार्किक दृष्ट्या सुसंगत युक्तिवाद किंवा आकर्षक घोषवाक्ये यांवर विसंबून राहू नये; कारण प्रचार ऐकणाऱ्यांचे वर्तन प्रचारसंदेशाखेरीज इतर चार गोष्टींवर अवलंबून असते : (१) त्यांच्या मनःपटलांवर उमटलेल्या पूर्वस्मृती. त्यांचा परिणाम होऊन प्रचारातील बऱ्याचशा प्रतीकांकडे ते दुर्लक्ष करतात. (२) प्रचारकाने देऊ केलेले आर्थिक प्रलोभन, उदा., देणगी, अन्य प्रकारची लालूच इत्यादी. (३) प्रचारकाने दाखविलेली शारीरिक प्रलोभने, उदा., हिंसेपासून संरक्षण. (४) सामाजिक दबाव. ज्याच्यामुळे ते प्रचारकाच्या सांगण्याप्रमाणे वागतील किंवा प्रतिस्पर्धी प्रचारकाला विरोध करतील. या गोष्टी विचारात घेऊन प्रचारक अशाच वर्तनाचा प्रचार करतो, की जी लोकांना करावीशी वाटते व करणे शक्य असते.

याचाच अर्थ प्रचारकाने वास्तववादी असले पाहिजे, एरव्ही त्याचा प्रचार व्यर्थ जाईल. प्रचाराचा संदेश कृतिशील असला पाहिजे. उदा., स्वदेशीचे व्रत घ्या, परकीय मालावर बहिष्कार टाका, अ ला मत द्या, ब च्या पक्षातून बाहेर पडा, असा प्रचार परिणामकारक होण्याची शक्यता असते. प्रचारकाने अशाच प्रकारचे वर्तन सुचवावे, की जे श्रोत्यांना आवडेल व ज्यावर त्यांचा विश्वास बसेल. त्याचबरोबर संदेश देताना त्याने जर माता-पिता यांसारख्या प्रतीकांचा वापर करून आवाहन केले, तर प्रचार श्रोत्यांच्या हृदयास सहजपणे भिडण्याची शक्यता असते. म्हणूनच राष्ट्रीय चळवळीच्या प्रचारात मातृभूमी, पितृभूमी, राष्ट्रपिता, भारतमाता यांसारख्या कल्पनांची विशेष छाप पडते. जेथे ही प्रतीके वापरता येत नाहीत, तेथे प्रचारसंदेशाचा संबंध थोर व्यक्ती, लेखक, नेते किंवा साधुसंत यांच्याशी लावला जातो. प्रचारकाला संदेशप्रसारासाठी असंख्य माध्यमे उपलब्ध असतात. ज्या माध्यमांकडे लोकांचे विशेषत्वाने लक्ष जाईल, त्यांची निवड प्रचारक करतात. ज्यांचा दृष्टिकोन आपणास पसंत आहे, अशाच माध्यमांकडे सामान्यतः लोक लक्ष देतात. काही नवीन शिकण्यासाठी म्हणून ते माध्यमांचा वापर करतात असे नाही, तर आपल्या श्रद्धा, समजुती व पूर्वग्रह योग्य आणि बरोबर आहेत, असे मानसिक समाधान मिळविण्यासाठी ते माध्यमांचा आश्रय घेतात. म्हणूनच प्रचारकाने त्यांना जे आवडते, त्यांची जी वागणूक असते त्याहून फार निराळे काही सांगण्याच्या भरीस पडू नये. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे, नभोवाणी यांसारख्या व्यक्तिनिरपेक्ष, सार्वत्रिक माध्यमांच्या ऐवजी ज्यांच्याशी लोकांचा प्रत्यक्ष संबंध येतो अशा संस्था, संघटना, गट किंवा क्लब यांच्या माध्यमांतून केलेला प्रचार अधिक परिणामकारक होतो. आधुनिक जगात प्रचाराबरोबरच प्रतिप्रचारही चालू असतो. शिवाय शिक्षण, प्रकाशन, वृत्तप्रसार, समारंभ इ. कार्यक्रमही सुरू असतात. या सर्वांमधून प्रचाराचा प्रत्यक्ष परिणाम किती व कोणता होतो, हे सांगणे फार कठीण आहे. नियंत्रित प्रयोग करून हा परिणाम अजमावण्याचा प्रयत्न करण्यात येतो; परंतु प्रचाराचा परिणाम काही काळ सुप्त राहत असल्यामुळे हा प्रयत्नही अपुराच पडतो. शिवाय अशा प्रयोगांसाठी लोक पुढे यावयास तयार नसतात. केव्हा केव्हा तज्ञमंडळांच्या सभासदांच्या वेळोवेळी मुलाखती घेऊन त्यांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रचाराच्या परिणामाविषयी निष्कर्ष काढण्यात येतात. प्रचाराचे विरोधक प्रचारकाविरुद्ध कारवाई करतात. प्रचारकाला तुरुंगात टाकून त्याचा प्रचार बंद पाडतात किंवा अन्य उपायांनी त्याला नामोहरम करतात. त्याच्याविरुद्ध आर्थिक व इतर दबाव आणतात. प्रचारास आळा बसावा म्हणून वृत्तपत्रस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदेही केले जातात. त्यांविरुद्ध प्रचारकाला संधी मिळेपर्यंत स्वस्थ बसणे भाग पडते. प्रचाराचा जनसमूहावर नेहमीच अपेक्षित परिणाम होतो, असे मानता येत नाही. मानसिक सुस्तपणा, दुराग्रही वृत्ती व रूढ विचारसरणीला चिकटून राहण्याची प्रवृत्ती इ. कारणांमुळे बराचसा प्रचार निष्फळ ठरतो. शिवाय हितसंबंधी गटांच्या परस्परविरोधी प्रचारांमुळेही प्रचारकार्य निष्प्रभ होते.

प्रचाराचे नियंत्रण : लोकशाहीमध्ये प्रत्येकास प्रचाराचे व प्रतिप्रचाराचे स्वातंत्र्य असते. अशा प्रचारातून व प्रतिप्रचारातून समाजहिताच्या ज्या कल्पना आहेत, त्याच टिकतील अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. यामध्ये असे गृहीत धरलेले असते, की सर्वसामान्य जनता ज्ञानी, सुशिक्षित, विचारी आणि सहनशील असून संदेशवहनाच्या अतिरेकानेसुद्धा ती गोंधळून जात नाही. हे गृहीत तत्त्व वास्तववादी नसल्यामुळे शासनातर्फे प्रचारावर मर्यादा किंवा नियंत्रणे घालण्यात येतात. प्रचारकाने व प्रकाशकाने आपले नाव विवक्षित अधिकाऱ्याकडे नोंदवावे, प्रचार निनावी असू नये अशा प्रकारची नियंत्रणे बसविण्यात येतात. राजकीय निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण घालण्यात येते व निवडणुकीपूर्वी एकदोन दिवस प्रचारावर बंदी घालता येते. साम्यवादी राष्ट्रांमध्ये प्रचाराची सर्व साधने शासनाच्या ताब्यातच असल्याने शासनाकडे प्रचाराची मक्तेदारी असते. राष्ट्रीय पातळीवर जरी प्रचारावर नियंत्रणे बसविता येत असली, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रचाराचे नियंत्रण करणारी संस्था अद्याप अस्तित्वात नाही. (विश्वकोश)

Thursday 17 October 2013

प्रसिध्दिपत्रक

शासकीय संस्था, औद्योगिक, व्यापारी किंवा सामाजिक सेवा-संस्था, परकीय देशांच्या वकीलाती अथवा सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती आपापले कार्यक्रम, कार्य वा मते ह्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इ.-माध्यमांसाठी जो मजकूर तयार करतात, त्याला प्रसिध्दि-पत्रक किंवा प्रसिध्दिका (हँड-आउट) म्हणतात.

प्रसिध्दि-पत्रक हे मुद्रित, चक्रमुद्रित, टंकलिखित किंवा हस्तलिखितही असते. ते प्रसिध्दीस देणाऱ्या संस्थेचे वा व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ते पत्रक केव्हा प्रसिध्द करावे, यासंबंधीची सूचना हे तपशील पत्रकाच्या शीर्षस्थानी दिलेले असतात. मजकुराला स्पष्टीकरणात्मक शीर्षकही असते. प्रसिध्दि-पत्रकाचा हेतू किंवा मजकुराचा सारांश प्रारंभी दिलेला असतो. लहान परिच्छेद, आटोपशीरपणा, तर्कशुध्द व स्पष्ट मांडणी ह्यांना प्रसिध्दि-पत्रकात महत्त्व असते. अनावश्यक विशेषणे, आलंकारिक भाषा, पुनरुक्ती, वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अशा गोष्टींमुळे प्रसिध्दि-पत्रकांची विश्वसनीयता व परिणामकारकता कमी होते. संपादक, वृत्तसंपादक किंवा एखाद्या विशेष विभागाचा संपादक ह्यांना उद्देशून प्रसिध्दि-पत्रक तयार केलेले असते आणि असा संपादक व प्रसिध्दि-पत्रक तयार करणारा जनसंपर्काधिकारी वा प्रसिध्दि-अधिकारी यांमध्ये संपर्क निर्माण करणे, असलेला संपर्क टिकविणे व वाढविणे इष्ट असते. कारण या कामी मिळणाऱ्या यशामुळेच प्रसिध्दि-पत्रकांचे चीज होऊ शकते. काही वेळा प्रसिध्दि-पत्रकांमध्ये छायाचित्रे, नकाशे वा तांत्रिक तपशील इत्यादींचाही समावेश असतो. 

बाबुराव विष्षु पराडकर

(१६ नोव्हेंबर १८८३-१२ जानेवारी १९५५). नामवंत हिंदी पत्रकार. जन्म वाराणसी येथे. त्यांचे घराणे महाराष्ट्रातील. बाबूरावांचे आई-वडील अन्नपूर्णाबाई व विष्णुशास्त्री महाराष्ट्रातून वाराणसीला येऊन स्थायिक झाले. विष्णुशास्त्री हे संस्कृतचे पंडित होते. बाबूरावांचे मूळ नाव सदाशिव, परंतु 'बाबू' हे वडिलांनी प्रेमाने दिलेले नावच पुढे रूढ झाले. सुरुवातीस संस्कृतचे अध्ययन झाल्यावर १९०० मध्ये ते भागलपूर येथून मॅट्रिक झाले. १९०३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
वडिलांच्या निधनानंतर १९०६ मध्ये ते कलकत्त्यास त्यांच्या मामांकडे गेले. प्रख्यात पत्रकार ⇨ सखाराम गणेश देउसकर हे त्यांचे मामा. तेथे मामांकडून त्यांनी हिंदी वंगवासी या पत्रात संपादनाचे प्राथमिक धडे घेतले (१९०६-१९०७). तेथे अंबिकाप्रसाद वाजपेयी, बदरीनारायण चौधरी 'प्रेमधन' यांसारख्या विद्वान हिंदी साहित्यिकांशी तसेच रासबिहारी घोष आणि अरविंद घोष यांसारख्या क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध आला. नंतर १९०७ ते १० ह्या काळात ते हितवार्ता या हिंदी साप्ताहिकाचे संपादक होते. या वेळीच ते बंगाल नॅशनल महाविद्यालयात हिंदी व मराठीचेही अध्यापन करू लागले. १९११ मध्ये ते भारतमित्र ह्या (साप्ताहिकाचे दैनिक झालेल्या) पत्राचे संयुक्त संपादक झाले. हितवार्तांमध्ये राजकीय विषयांवर गंभीर स्वरूपाचे टीकालेखन करून त्यांनी हिंदी पत्रसृष्टीत एक नवीन परंपरा सुरू केली. सुरुवातीपासूनच त्यांनी राष्ट्रीय भावनेतून संपादन कार्य केले. संपादनासोबतच त्यांनी राजकारणातही सक्रिय भाग घेतला. १९१६ मध्ये राजद्रोहाच्या संशयावरून त्यांना अटक झाली व साडेतीन वर्षे नजरकैदेत रहावे लागले. १९२० मध्ये नजरकैदेतून मुक्त होताच ते वाराणशीस आले. १९२० मध्ये तेथून 'ज्ञानमंडल' संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या आज ह्या दैनिक पत्रांचे संपादकत्व त्यांना व श्रीप्रकाश यांना देण्यात आले. सु. चार वर्षे ते ह्या पत्राचे संयुक्त संपादक होते. नंतर ते त्याचे संपादक व १९३४ पासून अखेरपर्यंत प्रमुख संपादक होते. १९४३ ते ४७ ह्या काळात ते संसार ह्या पत्राचे संपादक होते. हिंदीतील अग्रगण्य पत्र म्हणून आज ह्या दैनिकास उच्च स्थान प्राप्त करून देण्याचे व ते लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. या पत्राद्वारे त्यांनी केलेले हिंदी भाषेच्या विकासाचे व राष्ट्रजागृतीचे कार्य चिरंतन स्वरूपाचे आहे.
सोळाव्या हिंदी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनात संपादक संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९२५). सिमला येथे भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९३१). संमेलनात त्यांना 'साहित्य वाचस्पति' ही उपाधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गीतेवरील हिंदी भाष्य (१९२४) तसेच बंगालीतील देशेर कथा (१९०४) ह्या देउसकरांच्या प्रसिद्ध ग्रंथाचा त्यांनी देशकी बात नावाने हिंदीत अनुवादही केला. हिंदी भाषेत त्यांनी शेकडो नवे पारिभाषिक शब्द रूढ केले. त्यांची शैली स्वतंत्र असून लहान लहान वाक्यांद्वारे क्लिष्ट विषयही सुबोध करून सांगणे, हा तिचा विशेष म्हणावा लागेल. वाराणसी येथे त्यांचे निधन झाले.

पत्रकार कक्ष

वृत्तपत्रप्रतिनिर्धीसाठी राखून ठेवलेली स्वतंत्र जागा. संसदेत व राज्यविधिमंडळात चालणारे कामकाज वृत्तपत्रप्रतिनिधींना पाहता यावे व त्याचा वृ्त्तांत त्यांना देता यावा, म्हणून त्यांच्या बसण्याची जी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते, त्या जागेस पत्रकारकक्ष असे म्हणतात. या पत्रकारकक्षेत बसणाऱ्या पत्रप्रतिनिधींना संबंधित वृत्तपत्रसंस्थेकडून प्रतिनिधित्वाचे विशेष अधिकारपत्र मिळवावे लागते. अशा पत्रप्रतिनिधींची अधिकृत वार्ताहर म्हणून शासनाकडून नोंद करण्यात आल्यावरच त्यांना पत्रकारकक्षेत बसण्याची प्रवेशपत्रिका देण्यात येते. भारतीय लोकसभेत सु. शंभरांवर पत्रकार बसू शकतील, असे एक दालन (गॅलरी) आहे. संसदभवनात त्यांच्यासाठी तीन स्वतंत्र खोल्या ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या कार्यालयात एक मोठे दालन ⇨ पत्रकार परिषदेसाठी व एक खोली पत्रकारकक्ष म्हणून ठेवण्यात आलेली आहे. तेथे सर्व शासकीय खात्यांचे संपर्काधिकारी पत्रकारांना भेटू शकतात. मुंबईतही मंत्रालयात पत्रकारकक्ष म्हणून एक स्वतंत्र खोली असून तेथे पत्रकार परिषदा होतात. तसेच एखाद्या वेळी शासनाच्या निर्णयासंबंधीची माहिती देण्यासाठी पत्रकारांच्या त्या खोलीत शासकीय अधिकारी, मंत्री किंवा अन्य संबंधित व्यक्ती उपस्थित राहतात. त्याशिवाय पत्रकारांना परस्परांची ओळख करून घेण्याकरिता व बातम्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही या खोलीचा उपयोग करण्यात येतो. अधिकृत पत्रकारांनाच पत्रकारकक्षेत प्रवेश मिळतो. त्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रिकेच्या मागील बाजूस साधारणपणे दहा नियमांची एक आचारसंहिता दिलेली असते. त्या संहितेचा भंग केल्यास प्रवेशपत्रिका रद्द करण्याचा अधिकार प्रवेशपत्रिका देणाराला असतो. राजकीय पक्षांच्या व सामाजिक संस्थांच्या अधिवेशनप्रसंगी पत्रकारांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केलेली असते.

पवार, सुधाकर
विश्वकोशातून


पत्रकार परिषद

पत्रकार परिषद : प्रेस कॉन्फरन्स किंवा न्यूज कॉन्फरन्स या इंग्रजी संज्ञेचा हा मराठी पर्याय आहे. यासाठी मराठीत वार्ताहर परिषद, वार्ताहर बैठक, पत्रप्रतिनिधी परिषद इ. इतर संज्ञाही रूढ आहेत. मराठीत पत्रकारांची जी एक संघटना आहे तिचेही ‘पत्रकार परिषद’ असे नाव आहे, परंतु त्या संघटनेचा या विषयाशी संबंध नाही. [⟶ वृत्तपत्रकारिता ] एखादी विशेष महत्त्वाची माहिती वृत्तपत्रकारांना पुरवावयाची असेल, तेव्हा साधारणतः पत्रकार परिषद बोलाविण्यात येते. खाजगी संख्या अथवा उद्योग केंद्रे स्वत:च्या उपक्रमांची प्रसिद्धी व्हावी म्हणून पत्रकार परिषद बोलावतात. शासनातर्फे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री एखादा महत्त्वाचा निर्णय वा योजना जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतात. काही वेळा मंत्री किंवा उच्च शासकीय अधिकारीही पत्रकार परिषदा घेतात. अमेरिकेत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पत्रकार परिषद घेत. ही पद्धत आता सर्वत्र रूढ झालेली आहे. आपल्याकडेही स्वातंत्र्योत्तर काळात माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी २८ ऑगस्ट १९४७ रोजी पहिली वार्ताहर परिषद घेतली होती. त्यात त्यांनी दिल्ली व पंजाबमधील राजकीय परिस्थितीचे निवेदन केले होते. त्यानंतरही ते दर महिन्याला नियमितपणे पत्रकार परिषद घेऊन शासकीय निर्णयांची व अन्य राष्ट्रीय प्रश्नांसंबंधीची माहिती देत असत. पत्रकार परिषदेत वार्ताहरास विचारावयाचे प्रश्न आधी लेखी स्वरूपात द्यावे लागतात. काही वेळा आयत्या वेळचे प्रश्नही विचारता येतात. विशेषतः परदेशी पाहुण्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न अगोदर द्यावे लागतात. सर्वच प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत, असे बंधन नसते. तथापि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असा संकेत आहे. पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तर रूपाने मोकळी चर्चा होऊन अनेक तऱ्हेची माहिती प्राप्त होते. तथापि प्रश्नोत्तरे याचा अर्थ वादविवाद नव्हे, हे पथ्य पत्रकारांना पाळवे लागते आणि पत्रकार परिषद घेणारासही नुसते भाषण देता येत नाही. जास्तीत जास्त एक तासाचा काळ पत्रकार परिषदेसाठी दिला जातो. बहुधा पत्रकार परिषदेचे आयोजन शासकीय प्रसिद्धी अधिकारी किंवा लोकसंपर्क अधिकारी करतात. त्यांना ज्या विषयासंबंधी पत्रकार परिषद ध्यावयाची असते, त्यासंबंधी एक टिपणी तयार करून ती पत्रकारांना द्यावी लागते. त्याला ⇨प्रसिद्धिका (प्रेस हैंडआउट) म्हणतात. वृत्तपत्रांच्या अधिकृत प्रतिनिधींना किवा संपादकांना वा सहसंपादकांना पत्रकार परिषदेस आमंत्रित करण्यात येते. महत्त्वपूर्ण बातम्या प्रस्तुत करण्याचे पत्रकार परिषद हे एक मोठे साधन आहे. (विश्वकोश)

पुस्तके


  1. सामंत सत्वशीला. २००८. व्याकरणशुध्द लेखनप्रणाली. डायमंड पब्लीकेशन्स.
  2. वाळंबे, मो. रा. मराठी शुद्धलेखन प्रदीप. नितीन प्रकाशन
  3. ‍अग्निहोत्री ग. ह. (संपा.) अभिनव मराठी शब्दकोश. खंड १ ते ५. व्हीनस प्रकाशन
  4. ‍जोशी प्र. न. (संपा) आदर्श मराठी शब्दकोश. विदर्भ-मराठवाडा बुक कंपनी
  5. ‍फडके अरुण. शुद्धलेखन मार्गप्रदीप. अंकुर प्रकाशन.
  6. ‍कुलकर्णी एस.के., २००४. पत्रकारिता मार्गदर्शक, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन.
  7. ‍माळी, सुनील. २००८. बातमीदारी
  8. ‍अकलूजकर, प्रसन्नकुमार. वृत्तपत्रविद्या. श्रीविद्या प्रकाशन.
  9. ‍अकलूजकर, प्रसन्नकुमार. फिचर राईंटिग.. श्रीविद्या प्रकाशन.
  10. ‍फडके य. दि. विसाव्या शतकातील महाराष्ट्र. श्रीविद्या प्रकाशन.
  11. ‍सहस्त्रबुद्धे पु. ग. महाराष्ट्र संस्कृती.
  12. ‍वळसंगकर कृ. ना. विसावे शतक आणि समाजवाद. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.
  13. ‍पळशीकर, सुहास व सुहास कुलकर्णी (संपा.) महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष. समकालीन प्रकाशन.
  14. ‍तळवलकर, गोविंद.अग्रलेख. प्रेस्टिज पब्लिकेशन्स, १९८१. ‍
  15. लेले, रा. के. ‘राठी वृत्तपत्रांचा इतिहास. काँटिनेंटल.

Saturday 12 October 2013

व्हिडिओ


  1. कुमार केतकर यांचे गोंविद तळवलकर यांच्‍यावर भाष्‍य (मराठी)
  2. वेबमिडिया आणि बदलते माध्यम स्वरुप-अनय जोगळेकर (मराठी)
  3. इंटनेटवरील मराठी पत्रकारिता-अनय जोगळेकर 1 (मराठी)
  4. इंटनेटवरील मराठी पत्रकारिता-अनय जोगळेकर 2 (मराठी)
  5. सोशल नेटवर्कीग आणि त्याचा वापर करताना घ्‍यावयाची काळजी
  6. पत्रकार अमेय गोगटे यांची इंटनेट पत्रकारितेवर मुलाखत (मराठी)
  7. जेष्‍ठ पत्रकार पुण्‍यप्रसून वाजपेयी यांचे विदयमान पत्रकारितेवर भाष्‍य (हिंदी)
  8. जेष्‍ठ पत्रकार आसुतोष्‍ा यांची पत्रकारितेवर मुलाखत  (हिंदी)

पत्रकार संघटना

Friday 11 October 2013

दैनिके

छायाचित्रणकला भाग 3

कलात्मक छायाचित्रणाच्या पद्धती 

छायाचित्रणाला कलात्मक दर्जा प्राप्त व्हावा आणि त्यातून अभिप्रेत आशय प्रकट व्हावा यासाठी अनेक पद्धती वापरतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत :

(१) प्रकाशछानकांचा उपयोग : खुल्या भिंगाने निळ्या आकाशातील विरळ पांढरे ढग मुद्रणप्रतीत येऊ शकत नाहीत, पण पिवळा छानक वापरून असे ढग असलेल्या निसर्गदृश्याचे तत्सदृश छायाचित्र घेता येते. नारंगी रंगाचा छानक ढगांस अधिक उठाव देतो, तर फिकट लाल छानक आकाश जास्त काळे करून वादळी हवामान दर्शवितो. फुलांच्या पाकळ्यांवर असणारे नाजुक व सुंदर आकृतिबंध फुलांच्याच रंगाचे छानक वापरून उठावदार करता येतात. हिरव्या रंगाची वनश्री हिरव्या छानकाने अधिक उठावदार बनते, तर धूसर छानकाने जरूर पडल्यास धुक्याचा प्रभाव कमी करता येतो. पोलरॉइड छानक वापरून काचेसारख्या वस्तूवरील जाचक परावर्तन टाळता येते, तर लाल छानक अथवा अवरक्त छानक व त्याकरिता मिळणारी खास अवरक्त फिल्म वापरून झगझगीत सूर्यप्रकाशातील निसर्गदृश्यांतही चांदण्याचा आभास उत्पन्न करता येतो;

(२) उत्थित शिल्पसदृश छायाचित्रे : ऋणप्रतीपासून त्याच आकाराची एक पारदर्शक धनप्रत तयार करण्यात येते. मूळ ऋणप्रत व अशी धनप्रत जर एकमेकांशी मिळत्याजुळत्या ठेवल्या, तर दोहोंच्याही परस्परविरुद्ध छटांमुळे त्या साधारणपणे अखंड करड्या रंगाच्या भासतात; परंतु जर त्यांतील एक प्रत थोडी बाजूला सरकवून त्या दोन्ही प्रती चिकटपट्टीने कडेला चिकटवून, चित्रवर्धकाने त्या युतीपासून (युती हीच नवी ऋणप्रत समजून) धनप्रत बनविली, तर ते उत्थित शिल्पसदृश किंवा नखचित्राप्रमाणे भासते. या त-हेची चित्रे इटालियन सपाट शिल्पाप्रमाणे दिसतात;

(३) सौरविनाशन (सोलरायझेशन) : ऋणप्रतीपासून धनप्रत बनविण्यासाठी संवेदनशील कागद प्रकाशनानंतर विकसन-द्रावणात टाकला असतानाच जर पांढरा दिवा लावला, तर तो सर्वच कागद संपूर्ण काळा होतो; परंतु असा पांढरा दिवा लावून लगेच विझविला व विकसनाचे कार्य पुढे चालू ठेवले, तर त्या कागदावर ऋणप्रतच तयार होते. त्याच वेळी त्यातील आकृतीच्या आकाररेषेभोवती एक करड्या रंगाची रेषा उमटते. या उमटलेल्या रेषेचा उपयोग करूनच विशिष्ट परिणाम साधता येतो;

(४) भित्तिपत्रवत् सुलभीकरण (पोस्टरायझेशन) : सामान्य छायाचित्रात त्यातील छटा अगदी पूर्ण पांढऱ्या रंगापासून तो संपूर्ण काळ्या रंगापर्यंत क्रमाने वाढत जातात, त्यास अखंड छटाक्रम म्हणतात. अशा छायाचित्राच्या पारदर्शक धनप्रतीवरून या अखंड छटाक्रमांतील तीन किंवा चार छटांपासून प्रत्येक छटेसाठी एक नवे ऋणपत्र बनवितात. ह्या ऋणप्रती एकापाठोपाठ एकाच संवेदनशील कागदावर छापून अशा तऱ्हेचे छायाचित्र बनवितात. या पूर्ण छायाचित्रांत भित्तिपत्रिकेतील चित्राप्रमाणे फक्त तीन वा चार छटा दिसतात;
(५) रंगपालट : रासायनिक प्रक्रियेने मूळ कृष्णश्वेत छायाचित्रांचे हिरव्या-पांढऱ्या, निळ्या-पांढऱ्या अशा अनेक छटांत रूपांतर करता येते. चित्रविषयाचा योग्य अशा छटेत रंगपालट केल्यास चित्र उठून दिसते. गोल्डक्लोराईडचा उपयोग करून रंगपालट केलेली चित्रे सुंदर तर दिसतातच, पण काही अंशी अधिक काळ टिकतात;
(६) रेखारूप छायाचित्रण : गर्द काळ्या व स्वच्छ पांढऱ्या छटांचा किंवा ठिपक्यांचा उपयोग करून एखादे चित्र काढावे, तसा परिणाम या प्रकारच्या छायाचित्रांत दिसतो. ऋणप्रतीवरून लीथसारख्या अल्पछटाक्रम (काँट्रास्टी शॉर्ट टोनल रेंज) फिल्मवर धनप्रत काढतात. या धनप्रतीवरून पुन्हा ऋणप्रत, त्यावरून पुन्हा धनप्रत असे चारसहा वेळा करतात. प्रत्येक वेळी नको असलेले भाग रासायनिक प्रक्रियेने किंवा रंग लावून काढण्यात येतात. शेवटच्या ऋणप्रतीपासून प्रत्यक्ष छायाचित्रण तयार केले जाते;
(७) फोटोग्राफ किंवा सर्जनशील छायाचित्रण : संवेदनशील कागदावर निरनिराळ्या वस्तू, चित्रविचित्र काचतुकडे किंवा काचेच्या वस्तू, कागदाचे कपटे इ. ठेवून कागदावर थोडा प्रकाश पाडण्यात येतो. नंतर त्यावरील वस्तू काढीत किंवा फिरवीत जाऊन दर वेळी थोडा वेळ प्रकाश पाडला जातो. नंतर अशा कागदावर विकसन व स्थिरीकरणाच्या प्रक्रिया केल्या जातात. वस्तूंचा आकार, त्या कागदावर ठेवण्याची किंवा फिरवण्याची पद्धत व प्रकाशनाच्या कालमर्यादा यांचे नियंत्रण करून मनात योजिलेले अप्रतिरूप छायाचित्र तयार करता येते. अशा चित्रास ‘फोटोग्राम’ अशी संज्ञा आहे;
(८) तुकडेजोड छायाचित्रण (काँबिनेशन प्रिंटिंग) : यामध्ये भिन्न भिन्न ऋणप्रतींतून थोडे थोडे विभाग घेऊन ते चित्रवर्धकातून एकाच संवेदनशील कागदावर छापण्यात येतात. यालाच अप्रतिरूप तुकडेजोड छायाचित्रे म्हणतात. अशी चित्रे बनविण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकापासूनच चालत आली आहे;
(९) मेजपृष्ठीय (टेबलटॉप) छायाचित्रण: लहान खेळणी किंवा इतर वस्तू टेबलांवर मांडून, आरसे, काचा, माती, दगड, धोंडे इत्यादींच्या साहाय्याने त्यांचे देखावे रचतात व त्यावरून निसर्गसदृश छायाचित्रे तयार करण्यात येतात. त्यांनाच ही संज्ञा आहे. स्वच्छ पांढरे मीठ, पीठ किंवा तत्सम पदार्थ वापरून हिमवर्षावाचा देखावा निर्माण केलेली दृश्ये अशा छायाचित्रणाचाच एक नमुना होय;
(१०) स्थिर वस्तूंचे छायाचित्रण : कलात्मक आकाराच्या कृत्रिम अथवा नैसर्गिक वस्तूंची आकर्षक मांडणी करून ही छायाचित्रे घेता येतात. यांत मुख्य भर वक्ररेषा, आकार आणि पोत-अभिसाधन यांवर दिला जातो; (११) गतिमान पदार्थाचे छायाचित्रण : नृत्यकार, धावते प्राणी, उडते पक्षी इत्यादींची छायाचित्रे घेताना प्रकाशनकाल जास्त ठेवल्यास चित्रकाराने कुंचल्याचे स्वैर फटकारे मारावेत त्याप्रमाणे, गतिदर्शक छायाचित्रे घेता येतात;
(१२) अतिनिकट छायाचित्रण (अल्ट्रा क्लोजअप) : झाडांच्या साली किंवा अतिसूक्ष्म वस्तू, यांतील चमत्कृतिजन्य आकृतींतून मोठी केलेली छायाचित्रे यांचा यात समावेश होतो;
(१३) किमया चित्रे (कॅमेरा ट्रिक्स) : एकाच फिल्म-भागावर (फ्रेम) भिन्न भिन्न वस्तूंची दोन वा अधिक छायाचित्रे घेऊन चमत्कृतिजनक छायाचित्रे तयार करण्यात येतात;
(१४) आकृतिबंधात्मक (पॅटर्न) छायाचित्रे : ऋणप्रतींवरील एकच चित्र किंवा चित्राचा काही भाग एकाच कागदावर एकदा उलटा एकदा सुलटा असा वारंवार जोडून चमत्कृतिपूर्ण आकृतिबंध तयार करता येतात. अशी छायाचित्रे बहुरूपदर्शकाचा उपयोग करूनही घेतली जातात.


चित्रपटातील छायाचित्रण : चित्रपटांचा एकूण कलात्मक दर्जा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.

त्यांपैकी एक घटक छायाचित्रणाचा होय. सामान्यतः चांगल्या छायाचित्रणाचे जे सर्वसामान्य निकष असतात, तेच चित्रपटीय छायाचित्रणासही लागू पडतात. तथापि चित्रपटातील छायाचित्रणात कल्पकतेला अधिक वाव असतो. त्यामुळे कोणत्याही चित्रपटाच्या यशात छायाचित्रणाचा भाग बराच असतो. चित्रपटातील छायाचित्रण हे एक सांघिक फलनिर्मितीचे कार्य असते. संकल्पित अंदाजपत्रकाची एक प्राथमिक मर्यादा चित्रपटाच्या छायाचित्रकाराला पाळावीच लागते. पटकथेतील प्रसंगाचा नीटपणे विचार करणे, त्यासंबंधी दिग्दर्शकाच्या कल्पना समजावून घेणे, नटनट्यांना अभिनयास पुरेसा वाव मिळेल किंवा त्यांच्या अभिनयास पुरेसा उठाव मिळेल याबद्दल दक्ष राहणे, कलादिग्दर्शकाने योजिलेल्या देखाव्यांचे प्रभावी चित्रिकरण करणे, त्यांतील उणिवा झाकणे, तसेच चित्रपटातील नृत्यगायनादी प्रसंगांना पुरेशी परिणामकारकता लाभेल, या किंवा अशा सर्व गोष्टींचे भान चित्रपटाच्या छायाचित्रकाराला ठेवावे लागते. केवळ कलेसाठी कला अशी भूमिका चित्रपटाच्या छायाचित्रणात संभवत नाही. उलट चित्रपटाची कथावस्तू उठावदार करणे, हे चित्रपटीय छायाचित्रणाचे मुख्य उद्दिष्ट असते.

चित्रपट-छायाचित्रणात मांडणीचा विचार महत्त्वाचा असतो. प्रत्येक छायाचित्राची चौकट (फ्रेम) परिपूर्ण असावी लागते. त्याचप्रमाणे अशा प्रत्येक चौकटीचा पुढच्या भागाच्या छायाचित्रणाशी योग्य प्रकारे मेळही असला पाहिजे. चित्रपट हे चलत् चित्र असल्याने प्रत्येक चौकटीची परिपूर्णता साधण्यासाठी, तसेच अनेक चौकटींत योग्य तो दुवा राखण्यासाठी कॅमेऱ्याची हालचाल कौशल्याने करावी लागते.

योग्य प्रकारचे किरणकेंद्रीकरण साधणे म्हणजे केंद्रीकरण, अपकेंद्रीकरण किंवा भेददर्शी केंद्रीकरण यांचा यथाप्रसंग उपयोग करणे. पार्श्वभूमी अतिगडद असेल, गुंतागुंतीची असेल किंवा धूसर दाखविणे असेल, तर भेददर्शी केंद्रीकरण योजावे लागते. प्राणी किंवा वाहने यांच्या चालण्याच्या दिशेने कॅमेरा फिरविला असेल, तर त्यांच्या चालण्याच्या दिशेला पुरेसे अंतर राखणे आवश्यक असते. चित्रपटातील छायाचित्रणाला कलात्मक दर्जा येतो, तो त्यातील योग्य प्रकाशयोजनेमुळे. बाह्य चित्रीकरणात प्रकाशयोजनेविषयी विशेष काळजी घ्यावी लागते. पात्रांच्या प्रभावी भावदर्शनासाठी किंवा मार्मिक अभिनयासाठी विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना करावी लागते. सूर्योदय, सूर्यास्त, धुके, पाऊस यांसारख्या निसर्गदृश्यांचा नेमका असा प्रत्यय येण्यासाठी योग्य ती प्रकाशयोजना करावी लागते. प्रकाशपरावर्तकांचाही उपयोग करून घेणे कौशल्याचे असते.


पात्रांची रंगभूषा व वेशभूषा वेधक पद्धतीने चित्रित होईल यासाठी मुद्दाम लक्ष द्यावे लागते. त्यातील दोष शक्यतो झाकण्याचा प्रयत्न करावा लागतो.

छायाचित्रणाच्या सोयीसाठी अनेक यांत्रिक साधने वापरावी लागतात. विविध प्रकारची भिंगे, छानके, जाळ्या, ढकलगाड्या इत्यादींचा उपयोग करावा लागतो. बदलत्या केंद्रांतराची भिंगेही वापरावी लागतात. चित्रपटात चमत्कृतिदृश्येही असतात. उदा., उडता गालिचा, पौराणिक अस्त्रप्रयोग, अदृश्य माणूस यांसारख्या चमत्कृती साधण्यासाठी कॅमेऱ्याचाच चातुर्याने उपयोग करावा लागतो. व्यंगपटात सचेतनीकरणाची प्रक्रिया वापरून चित्रीकरण करावे लागते. संपूर्ण रंगीत चित्रपटात तर योग्य ती रंगसंगती कायम राखणे अत्यंत आवश्यक असते. सुस्पष्टता, सुयोग्य केंद्रीकरण, छायाचित्रणातील सातत्य, स्थलकालांचा योग्य आभास, डोळ्यांस जाणवणारी सुसंगतता, चमत्कृतिदृश्यांची परिणामकारकता, चित्रपटातील नटनट्यांच्या सूक्ष्म भावदर्शनास व अभिनयास दिलेला उठाव आणि समर्पक प्रकाशयोजना इ. निकष वापरून चित्रपटातील छायाचित्रणाचा कलात्मक दर्जा ठरविण्यात येतो.

वृत्तपत्रीय छायाचित्रण : वृत्तपत्र हे एक प्रभावी बहुजन माध्यम आहे. त्यात छायाचित्रांचा उपयोग केला जातो. छायाचित्रांचा वृत्तपत्रांसाठी उपयोग करण्याचा प्रयत्न प्रथम १८२६ मध्ये झाला; परंतु जर्मनीतील हँबर्ग शहरातील भीषण आगीचे १८४२ मध्ये प्रसिद्ध झालेले छायाचित्र हे वास्तव अर्थाने सुरुवातीचे चित्र म्हणता येईल. १८५५ मध्ये रॉजर फेन्टन याने क्रिमियन युद्धाची छायाचित्रे ओल्या ‘कोलोडिअन’ पद्धतीने काढून ती प्रसिद्ध केली. १८८० च्या सुमारास सहज हाताळता येईल, असा कॅमेरा व सुक्या संवेदनशील काचांचा शोध लागल्यानंतर छायाचित्रांनी नटलेली वृत्तपत्रे नियमित निघू लागली. त्यांतून १८८६ मध्ये कृत्रिम प्रकाश-निर्मितीसाठी फ्लॅश पावडर, १९२९ मध्ये फ्लॅश बल्ब आणि १९३७ मध्ये इलेक्ट्रॉनिक फ्लॅशगन यांचा शोध लागल्याने वृत्तपत्रीय छायाचित्रकाराचे काम बरेचसे सुलभ झाले.

केवळ छायाचित्रांचाच उपयोग करून चालविलेले पहिले वर्तमानपत्र म्हणून १९०४ मध्ये निघालेले लंडन डेली मिरर याचा उल्लेख करावा लागेल. पुढे १९०८ मध्ये ऑर्थर बेरेट याने आपल्या टोपीत कॅमेरा लपवून एका न्यायालयीन खटल्याचे छायाचित्र घेतले व ते प्रसिद्ध केले. प्रथम अमेरिकेमध्ये अशी छायाचित्रे घेण्यावर बंधन नव्हते, असे दिसते; परंतु चार्ल्स ए. लिंडबर्ग याच्या लहान मुलाला पळवून त्याचा खून केल्याच्या खटल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यापासून म्हणजे १९३५ पासून अमेरिकन बार असोसिएशनने न्यायालयात छायाचित्रे घेण्यास बंदी घातली. यापूर्वी एरिक सॉलोमन या छायाचित्रकाराने पिशवीत कॅमेरा लपवून एका खुनाच्या खटल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. १८७६ पासून सामाजिक सुधारणांचा प्रचार करण्यासाठी छायाचित्रांचा उपयोग करण्यात आला. लंडनमधील बेघर लोकांच्या जीवनावर, जॉन टॉमसन आणि अ‍ॅडॉल्फ स्मिथ यांनी ३७ छायाचित्रे प्रसिद्ध करून विदारक प्रकाश टाकला. त्याच सुमारास ग्लासगोमधील बकाल वस्तीवर छायाचित्रांद्वारा टीका करून त्यांची सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रीस याने न्यूयॉर्क इव्हिनिंग सन या वृत्तपत्रामधून अमेरिकेत सामाजिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने १८८७ पासून छायाचित्राचा उपयोग करण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच लूइस डब्ल्यू. हीने याने आपला कॅमेरा श्रमजीवी मुलांच्या व इतर सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी वापरला.


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोन्ही पक्षांकडून पहिल्या जर्मन चढाईपासून ते हीरोशिमावरील अणुबाँब हल्ल्यापर्यंत प्रचाराचे मुख्य साधन म्हणून छायाचित्रणाचा उपयोग करण्यात आला. भारतात वृत्तपत्र व्यवसायाचे शिक्षण देणाऱ्या संस्था अनेक आहेत; परंतु खास वृत्तपत्रीय छायाचित्रणाच्या शिक्षणाची सोय कोठेच आढळत नाही. काही मोठ्या वृत्तपत्रांत खास छायाचित्रकारांची नेमणूक केलेली असली, तरी मुख्यत्वे हौशी उमेदवारच वर्तमानपत्रास छायाचित्रे पुरवीत असतात. भारतात छायाचित्रणासाठी लागणारी आधुनिक उपकरणे व इतर सोयी सर्रास उपलब्ध नसल्याने येथील वृत्तपत्रीय छायाचित्रण अजून फारसे वरच्या दर्जाचे नाही.

वृत्तपत्राच्या दृष्टीने प्रसंग घडल्यापासून छायाचित्राचे वितरण होईपर्यंतचा काळ शक्य तितका कमी असणे आवश्यक असते. छायाचित्राचे पूर्ण विकसन काही मिनिटांतच होईल, अशी रसायने वापरली जातात. एका मिनिटात कृष्णश्वेतच नव्हे, तर संपूर्ण रंगीत छायाचित्रे देणारे लँड-पोलरॉइडकॅमेरे हल्ली उपलब्ध झाले आहेत. छायाचित्रे तयार झाली, की ती त्वरित वृत्तपत्रांकडे पाठविली जातात. तारायंत्राच्या तारा टाकल्यानंतर थोड्याच दिवसांत दूरछायाचित्रप्रेषण पद्धतीने छायाचित्रे पाठविता येऊ लागली. १९३० पासून रेडिओचे तंत्र वापरून बिनतारी पद्धतीने छायाचित्रे पाठविण्यात येत आहेत. त्यांना रेडिओ फोटो म्हणतात. हल्ली छायाचित्रे मिळविणे व ती जगभर तत्काळ पाठविणे असे कार्य करणाऱ्या बऱ्याच संस्था निघाल्या आहेत. अ‍सोशिएटेड प्रेस, युनायटेड प्रेस इंटरनॅशनल, रॉयटर या त्यांपैकी काही संस्था असून त्यांचे कार्य परस्परांच्या सहकार्याने चालते. १९६७ पासून तर अमेरिका आणि यूरोप यांमध्ये छायाचित्रांची देवघेव टेलिस्टार-२ या कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने करण्यात येऊ लागली आहे. भारतात अशा प्रकारचे टेलिस्टारद्वारा येणारे संदेश वा छायाचित्र स्वीकारण्याचे स्थानक पुण्याजवळ आर्वी येथे असून, त्याचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. (चित्रपत्रे १६ अ, १६ आ, ४५). (विश्वकोश)


छायाचित्रणकला भाग 2

छायाचित्राची चिकित्सा

कलात्मक दृष्टीने छायाचित्राची चिकित्सा करण्यासाठी काही स्थूल निकष विचारात घेतले जातात, ते पुढीलप्रमाणे : (१) छायाचित्रविषयाची स्वतंत्रता, (२) छायाचित्रविषयाची एकूण मांडणी, (३) छायाचित्राचा मुद्रणदर्जा, (४) छायाचित्रातील त्रिमितीय आभासनिर्मिती, (५) छायाचित्रातील पट्टी (की ऑफ द पिक्चर), (६) छायाचित्रातील किरणकेंद्रीकरण, (७) छायाचित्राचे अंतिम संस्करण व
(८) पोत-अभिसाधन.

(१) छायाचित्रविषयाची स्वतंत्रता : छायाचित्राचा विषय स्वतंत्र असावा; म्हणजे छायाचित्रातील वस्तू वा व्यक्ती जरी जुन्या किंवा परिचित असतील, तरी त्यांचे चित्रण नव्या अर्थाचे सूचक ठरावे. याचा अर्थ कोणत्याही विषयाच्या चित्रात अभिनव आशय निर्माण करणारी स्वतंत्र कलादृष्टी असावी लागते.

(२) छायाचित्रविषयाची एकूण मांडणी : छायाचित्रातील सर्व घटक परस्परांशी सुसंगत ठेवणे आवश्यक असते. चित्रकाराप्रमाणे छायाचित्रकाराला संकल्पित चित्रातील अनावश्यक भाग गाळणे किंवा आवश्यक भागाची भर घालणे नेहमीच शक्य नसते. यासाठी कॅमेऱ्याचा कोन बदलून अथवा वस्तूंची सुयोग्य मांडणी जमून येईपर्यंत थांबून छायाचित्रण करावे लागते. छायाचित्रातील विशिष्ट घटकांना उठाव देण्यासाठी आणि दुय्यम गोष्टी त्यांना पूरक राखण्यासाठी चित्रविषयाचे आकारमान व स्थान विचारात घेऊन छटा, प्रकाशयोजना व रेखीव किरणकेंद्रीकरण यांचा योग्य उपयोग करावा लागतो. साध्या छायाचित्रात काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी वस्तू किंवा पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळी वस्तू असल्यास छायाचित्रास योग्य तो उठाव येतो; परंतु जेथे चित्रातील सगळेच घटक जवळजवळ सारख्याच छटांचे असतील, तेथे छायाचित्राला उठाव आणण्यासाठी पूर्णकेंद्रीकरण उपयुक्त ठरते.

कॅमेरा ज्या अंतरावर केंद्रित करण्यात येतो, त्या अंतरावरील वस्तूंचेच पूर्णकेंद्रित प्रतिबिंब पडते. बाकीच्या वस्तूंची प्रतिबिंबे थोड्याफार प्रमाणात अपकेंद्रित असतात. त्यामुळे कॅमेऱ्याच्या भिंगासमोरील छिद्रपटल (डायफ्राम) लहान केल्यास सुकेंद्र-विस्तार (डेप्थ ऑफ फील्ड) वाढतो व छिद्रपटल मोठे केल्यास तो कमी होतो. उठावासाठी विशिष्ट प्रकाशयोजनाही उपयुक्त ठरते. वस्तूंवरील प्रकाश नैसर्गिक असेल, तर योग्य दिशेला जाऊन किंवा वस्तू सरकविण्याजोगी असेल, तर ती थोडी फिरवून किंवा योग्य दिशेने प्रकाश येण्याची वाट पाहून चित्रण साधावे लागते. छटांचा कमीजास्तपणा परावर्तकांच्या साहाय्यानेही करता येतो. प्रकाशयोजना कृत्रिम असेल, तर परावर्तकाचा योग्य उपयोग होतो. छायाचित्रात ज्या वस्तूने जास्त जागा व्यापली असेल तिला महत्त्व प्राप्त होते. वस्तू जसजशी कॅमेऱ्याच्या जवळ येते, तसतसा तिचा छायाचित्रातील आकार वाढत जातो. गाई हाकणारा गुराखी पुढे असून गाय त्याच्या मागून येत असेल, तर छायाचित्रात गुराख्याला महत्त्व येईल. जर गाय पुढे असेल, तर तिला महत्त्व येईल आणि ती दोघे कॅमेऱ्याच्या जवळ असतील, तर गुराख्याच्या मानाने गाय खूपच मोठी दिसेल, परंतु त्या दोघांपासून कॅमेरा बऱ्याच अंतरावर नेला, तर गाय पुढे असूनही प्रमाणाबाहेर मोठी दिसणार नाही. म्हणून वस्तुवस्तूंमधील अंतर कमीजास्त करून व त्या वस्तूंचे कॅमेऱ्यापासूनचे अंतर कमीअधिक करून छायाचित्रात प्रमाणबद्धता राखता येते. यासाठी निरनिराळ्या केंद्रांतरांची भिंगेही वापरता येतात.

छायाचित्रात विशिष्ट घटकास प्राधान्य द्यावयाचे असेल, तर ते कसे साधावे, याबद्दल काही आडाखे आहेत. त्यांतील काही असे : (अ) दोन उभ्या व दोन आडव्या रेषा काढून चित्रचौकटीचे नऊ सारखे भाग केले, तर त्यांपैकी प्रत्येक दोन रेषा ज्या ठिकाणी एकमेकींस छेदतात, असे चार बिंदू मिळतात. त्यांपैकी प्रत्येक बिंदू छायाचित्रातील महत्त्वबिंदू होय. ज्या घटकाला प्राधान्य द्यावयाचे असेल, तो यांपैकी एका बिंदूजवळ असावा व इतर कोणतेही घटक बाकीच्या तिन्ही बिंदूंपासून वेगळे असावेत; (आ) चित्रचौकटीचा गुरुत्वमध्याशी म्हणजेच जेथे दोन्ही विकर्ण एकमेकांस छेदतात तेथे कोणताही घटक असू नये. तसे झाल्यास त्या घटकांवरच दृष्टी खिळून राहते व चित्र निर्जीव भासते. या बिंदूला मृतकेंद्र (डेड सेंटर) असेच नाव दिले जाते; (इ) छायाचित्रात पुरोभूमी व पार्श्वभूमी विभक्त करणारी रेषा चित्रचौकटीच्या बरोबर मध्यावर येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. निसर्गदृश्यात क्षितिज ही अशीच एक रेषा असते. क्षितिजरेषेने छायाचित्राचे दोन सारखे भाग होत असतील, तर लक्ष द्विधा होते म्हणून ही क्षितिजरेषा चित्राचे सारखे दोन भाग करणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. ती चित्रचौकटीच्या पायारेषेशी समांतर असावी लागते; (ई) छायाचित्रात महत्त्वाच्या घटकांचे संतुलन राखावे लागते. त्यामुळे छायाचित्राला स्थैर्य प्राप्त होते. सारख्याच आकाराच्या वस्तू छायाचित्रांच्या मध्यापासून सारख्याच अंतरावर असतील, तर तराजूच्या पारड्याप्रमाणेच समतोल साधतो; परंतु त्यात जोर नसतो. एखादी जवळची मोठी वस्तू, चित्रमध्यापासून विरुद्ध बाजूला जास्त अंतरावर ठेवलेल्या लहान वस्तूबरोबर संतुलन साधते व चित्र अधिक उठावदार दिसते; (उ) छायाचित्रणात एखादी गतिमान वस्तू ज्या दिशेला जात असेल, त्या दिशेला जास्त जागा सोडावी लागते. तसेच एखादी खाली पडणारी वस्तू असेल किंवा उडी मारणारा प्राणी वा व्यक्ती असेल, तर ती वस्तू किंवा प्राणी ज्या जागेवर उतरणार असेल, ती जागा छायाचित्रात असावी लागते; (ऊ) छायाचित्रात अनावश्यक घटकांपासून महत्त्वाचा भाग अलग केल्यास त्याकडे ताबडतोब लक्ष खेचले जाते. उदा., फुलांची छायाचित्रे आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतात. त्यासाठी फुलांच्या शक्य तेवढ्या जवळ जाऊन खालच्या पातळीवरून छायाचित्र घेता येते किंवा साध्या पडद्याची योग्य ती कृत्रिम पार्श्वभूमी वापरूनही मूळच्या उपद्रवकारक पार्श्वभूमीपासून त्यास दूर करता येते;

(ए) छायाचित्र कळण्यास सोपे असावे. त्यात मुख्य आकर्षणबिंदू एकच असावा व तो योग्य ठिकाणी असावा. छायाचित्रात फक्त त्यास पूरक ठरणारे घटकच असावेत. त्यामुळेच चित्रात साधेपणा साधता येतो;

(ऐ) छायाचित्रात एकात्मता आणण्यासाठी त्यातील सर्व घटकांत अर्थपूर्ण परस्पर संबंध असावा. उभ्या किंवा आडव्या रेषेत घटक तोडले जाऊ नयेत; (ओ) छायाचित्र योग्य क्षणी टिपलेले असावे. व्यक्तींचे, वस्तूंचे किंवा देखाव्याचे नेमके वैशिष्ट्य प्रकट होईल, अशा त्याच्या अवस्था टिपणे महत्त्वाचे असते. या नेमक्या क्षणाचे कलादृष्टीने फार महत्त्व असते. मांडणीचे हे सर्व आडाखे काटेकोरपणे पाळले जातातच, असे नाही; पण त्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तशा छायाचित्रांत काहीतरी उणिवा निर्माण होतात.


(३) छायाचित्राचा मुद्रणदर्जा : मूळ वस्तूचे जेवढे भाग प्रकाशित असतात तेवढे ते छायाचित्रात कधीही येत नाहीत. झगझगीत सूर्य आणि छायेमध्ये आलेला काळ्या दगडावरील भाग एकाच वेळी छायाचित्रात दाखविणे अशक्य असते. रंगीत छायाचित्रात सूर्याच्या दीप्तीचा थोडाफार आभास रंगाच्या वापराने निर्माण करता येतो. छायाप्रकाशाचे लहान प्रमाण घेऊन मुळातील प्रकाशमूल्ये त्याच प्रमाणात छायाचित्रात आणणे, ही एक कला आहे. डोळा हे एक अतिशय संवेदनक्षम इंद्रिय आहे. तो एकाच वेळी स्वच्छ उन्हामधील पांढरे पदार्थ व त्यांवरील सूक्ष्म छटा आणि सावलीतील काळ्या पदार्थांवरील सूक्ष्म छटा पाहू शकतो. हे कॅमेऱ्याच्या भिंगाला साधत नाही. तरीही तंत्रज्ञान वापरून छायाचित्रण हे सत्याभासाच्या जेवढे जवळ जाईल, तेवढा मुद्रणदर्जा चांगला ठरतो. म्हशीच्या पाठीवर ऊन पडले असता घेतलेल्या छायाचित्रात उन्हातील भाग पांढरे येतात. ते पांढरे न वाटता तो पांढरा आभास प्रकाशाचे परावर्तन आहे व त्याखाली म्हशीचा रंग काळाच आहे, असे ज्या छायाचित्रात भासेल त्याचा दर्जा उच्च ठरतो. छायाचित्राचे सर्व भाग समप्रमाणात उमटलेले असावे, त्यावर कसलेही डाग असू नयेत, याची काळजी घ्यावी लागते.

(४) छायाचित्रातील त्रिमितीय आभासनिर्मिती : छायाचित्राचे बरेचसे विषय त्रिमितीय असल्याने, त्यांची छायाचित्रे त्रिमिती भासावीत हे क्रमप्राप्तच आहे. द्विमिती कागदावर त्रिमितीचा आभास उत्पन्न करताना पुढील आडाखे उपयुक्त ठरतात : (अ) निमुळत्या समांतर रेषा : समोरच्या दिशेने समांतर जाणारे आगगाडीचे रूळ निमुळते दिसतात. छायाचित्रांतही अशा निमुळत्या रस्त्यांमुळे चित्रे त्रिमितीय वाटतात; (आ) आडव्या समांतर रेषा : विस्तीर्ण पटांगणात सारख्या अंतरावर काढलेल्या आडव्या रेषांकडे पाहिल्यास जवळच्या भागात त्या दूर दूर वाटतात; परंतु लांब अंतरावर त्या जवळजवळ वाटतात. छायाचित्रात याचाही त्रिमितीय आभासासाठी उपयोग करण्यात येतो. समुद्रावरील लाटा असा आभास निर्माण करतात; (इ) मावळत्या छटा : एकामागे एक आलेल्या डोंगरांच्या ओळींचे छायाचित्र घेतल्यास अगदी जवळचे डोंगर येतात. डोंगराच्या दूरवरच्या ओळी क्रमाने फिकट होत जातात आणि शेवटच्या तर करड्या बनून आकाशाच्या पार्श्वभूमीत लुप्त होतात. अशा छटाभिन्नत्वामुळे आलेला त्रिमितीय आभास उच्च दर्जाचा असतो; (ई) पडछाया : वस्तूच्या मागील बाजूस सूर्य अथवा दिवे असल्यास त्या वस्तूच्या पडछाया पुढील बाजूस पडतात. अशा पडछायांच्या कडा वस्तूंपेक्षा कॅमेऱ्याच्या अधिक जवळ आल्याने त्या पडछाया वस्तूंच्या बाजूला जाताना निमुळत्या होत जातात व निमुळत्या समांतर रेषांप्रमाणेच त्या त्रिमितीय आभास निर्माण करतात.

(५) छायाचित्रातील पट्टी : कित्येक छायाचित्रांत पांढरी शुभ्र वस्तू किंचित करड्या छटांनी दाखविली जाते. अशा छायाचित्रांस आसन्न शुभ्र (हाय की) छायाचित्रे म्हणतात. आनंद, तारुण्य, मृदुता, कोमलता इ. भाव दाखविण्यास ही पद्धत वापरतात. याउलट ज्या छायाचित्रांत बहुतांशी काळ्या छटा असतात व महत्त्वाचे भाग तेवढे प्रकाशित केले जातात, अशा छायाचित्रांस आसन्न कृष्ण (लो. की) छायाचित्रे म्हणतात. वार्धक्य, गंभीरता, वैषम्य, निराशा इ. भाव या पद्धतीने जास्त प्रभावी दिसतात.

(६) छायाचित्रातील किरणकेंद्रीकरण : बहुतेक छायाचित्रांत त्यांतील सर्वच भाग पूर्णकेंद्रित असावे लागतात; परंतु काही छायाचित्रांत मुख्य घटकाचे पूर्णकेंद्रीकरण करून बाकीच्या भागांचे जाणूनबुजून योग्य प्रमाणात अपकेंद्रण करावे लागते; कॅमेऱ्याकडे बघणाऱ्या व्यक्तीचे डोळे आणि नाक पूर्णकेंद्रित करून कान आणि डोक्याच्या आकाररेषांचे अपकेंद्रीकरण करण्यात येते. त्यामुळे असे छायाचित्र अगदी वास्तवदर्शी होते. या प्रकारास भेददर्शी केंद्रीकरण म्हणतात. नाजूकपणा किंवा कोमल भावना दाखविताना मृदुकेंद्रीकरणाचा उपयोग करतात. असे छायाचित्र घेण्याकरिता मृदुकेंद्रण करणारी स्वतंत्र भिंगे अथवा चालू भिंगांवर लावण्याची उपभिंगे वापरतात. कॅमेऱ्याच्या किंवा चित्रवर्धकाच्या भिंगापुढे बारीक जाळी (नेट किंवा मेश) धरूनही मृदुकेंद्रीकरण साधता येते. यातही भेददर्शी केंद्रीकरण होऊ शकते. साधारणपणे कृष्णश्वेत छायाचित्रांत नजीकचे घटक (पुरोभूमी) पूर्णकेंद्रित असावे लागतात; परंतु रंगीत छायाचित्रांत पुरोभाग काय किंवा पार्श्वभाग काय किंवा प्रसंगी दोन्ही भाग अपकेंद्रित केल्यास त्या भागांतील रंगांचे संमिश्रण होऊन छायाचित्राला उठाव लाभतो. छिद्रपटल विस्तृत ठेवून हे साधता येते.

(७) छायाचित्राचे अंतिम संस्करण : या सर्व गुणधर्मांबरोबरच छायाचित्रावर कचऱ्यामुळे आलेले पांढरे डाग, किंवा ऋणपट्टीवरील सूचिछिद्रांमुळे आलेले काळे डाग घालविण्यासाठी संस्करण (स्पॉटिंग अँड फिनिशिंग) करावे लागते.

(८) पोत-अभिसाधन : कापड किंवा गालिचे यांसारख्या वस्तूंचे पोत, झाडांच्या सालीचा अथवा झोपड्यांच्या भिंतीवरील खडबडीत पृष्ठभाग, त्वचेवरील छिद्रे, चेहऱ्यावरील सुरकुत्या, भांड्यांवरील चमक इत्यादींचे तंतोतंत छायाचित्रण करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. असे छायाचित्रण वस्तुपृष्ठांवर शक्य तेवढा तिरपा प्रकाश टाकून करता येते.

पुढच्या पानावर बघा

वेबमिडिया

जाहिरातकला

Wednesday 9 October 2013

दुसरा वृत्तपत्र आयोग

राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) सरकारने वृत्तपत्र समिती कायदा रद्द करुन वृत्तपत्र समिती बरखास्त केली. वृत्तपत्रांवर प्रकाशनपूर्व परिनिरीक्षणाचे बंधन घातले. आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पक्ष सरकारने १९७८ साली पुन्हा वृत्तपत्र समितीची व दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाची स्थापना केली.

न्यायमुर्ती पी. के. गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाची स्थापना २९ मे १९७८ रोजी करण्यात आली. भाषण स्वातंत्र्यासंबधी संविधानात असलेली तरतुद वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी पुरेशी आहे काय याचा विचार करणे; वृत्तपत्रांसंबधीचे कायदे, नियम व निर्बध यांचा आढावा घेउन त्यांत बदल वा सुधार सुचविणे सर्वप्रकारच्या दबावांपासुन वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक अशा उपाय योजना सुचविणे इ. गोष्टींचा आयोगाने प्रामुख्याने विचार करावा, असे आयोगाला सांगण्यात आले. वृत्तपत्रांच्या मालकीचे स्वरुप, वृत्तपत्र उद्योगाचे अर्थकारण पत्रकारितेचे प्रशिक्षण हेही मुद्दे पहिल्या आयोगाप्रमाणेच याही आयोगाच्या विचाराधीन होते.

अबू अब्राहम, प्रेम भाटीया, मोईद्दीन हरीस, व्ही.के. नरसिंहन् फली, एस् नरीमन एस्. एच्. वात्स्यायन, अरुण शौरी इ. आयोगाचे सदस्य होते. शौरी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यांनतर (डिसेंबर १९७८) निखिल चक्रवर्ती यांची आयोगावर नेमणूक करण्यात आली. या आयोगाला प्रथम ३१ डिसेंबर १९७९ पर्य़ंत ३१ मार्च १९८० पर्यंत अशी दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली. आयोगाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच १९८० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर केंद्रात सत्ताबदल होउन कॉग्रेसचे सरकार सत्तेवर आले. या राजकीय बदलांची दखल घेउन न्या. गोस्वामी आणि त्यांच्या सहकार्य़ांउनी आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे २१ एप्रिल १९८० रोजी न्यायमूर्ती के.के. मँथ्यु यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची पुर्नरचना करण्यात आली. पुर्नरचित आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करुन, विकसनशील लोकशाही समाजरचनेतील वृत्तपत्रांची भूमिका, साखळी-वृत्तपत्रे आणि वृत्तपत्रांचे उद्योगाशी असलेले संबंध यांचा त्यात समावेश करण्यात आला.

या आयोगाचे शिशिरकुमार मुखर्जी, पां. वा. गाडगीळ गिरिलाल जैन, मदन भाटिया, ह. कृ परांजपे इ. दहा सदस्य होते. या आयोगाला ३१ डिसेंबर १९८० पूर्वी अहवाल सादर करावयास सांगण्यात आले होते. परंतु आयोगाची मुदत तीन वेळा वाढवण्यात आली. अखेरीस एप्रिल १९८२ मध्ये आयोगाने आपला अहवाल सादर केला.

विकसनशील लोकशाही राष्ट्रामध्ये वृत्तपत्रांची भूमिका विरोधकाची नसावी आणि पाठीराख्याचीही नसावी. अविचारी विरोधक किंवा आंधळा समर्थक असणे म्हणजे कलुषित भूमिका घेण्यासारखे आहे. स्वतंत्र वृत्तपत्रांनी विधायक समीक्षकाची भूमिका वठविली पहिजे, असे मत आयोगाने शिफरशी देताना व्यक्त केले आहे.
वृत्तपत्र निबंधक वृत्तपत्रांची लहान, मध्यम आणि मोठी अशी वर्गवारी करीत असत. त्या वर्गवारीत आयोगाने बदल सुचविला. फार मोठ्या वृत्तपत्रांच्या मालकीच्या लहान वृत्तपत्रांपुढे तसा स्पष्ट उल्लेख निबंधकांनी करावा, असे आयोगाने सुचविले तसेच लहान व मध्यम वृत्तपत्रांना कागद, साधनसामग्री, दूरमुद्रक सेवा योग्य किंमतीत उपलब्ध व्हावी, म्हणून आयोगाने सविस्तर सुचना केल्या.
वृत्तपत्रांतील जाहिरातींचे प्रमाण ठरविण्याचा आणि आक्षेपार्ह जाहिराती नाकारण्याचा अंतिम अधिकार संपादकाला पाहिजे, असा स्पष्ट निर्वाळा आयोगाने दिला. परराष्टीय धोरणासंबंधीचे संपादकाचे मत शासकीय धोरणाशी सुसंगत नसले, तरी सरकारने त्याच्याकडे राष्ट्रविरोधी म्हणून पाहु नये, असे मत आयोगाने व्यक्त केले. मात्र जातीय तणाव व दंगे यांच्या काळात वृतापत्रांनी सनसनाटी बातम्या देणे आणि मृत वा जखमी यांची जाती वा धर्मनिहाय आकडेवारी प्रसिध्द करणे टाळावे, असेही आयोगाने सुचविले .
वृत्तपत्रस्वातंत्र्यासंबधीच्या कायद्याचा आढावा घेताना, पत्रकारिता म्हणजे फक्त उद्योग नसुन सामाजिक सेवा आणि व्यवसाय आहे. त्यामुळे वृत्तपत्रावर सामाजिक जबाबदारी असून जनतेच्या हिताचे उत्तरदायित्व त्यांच्याकडे आहे.या मुद्यावर आयोगाने विशेष भर दिला. वृत्तपत्रस्वातंत्र्याचा विचार करताना ग्राहकांच्या स्वांतत्र्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिपादन आयोगाने केले. नफा मिळविणे हे वृत्तपत्राचे मुख्य उद्दिष्ट नव्हे. वृत्तपत्रे ही जनमत घडवण्याचे कार्य करतात. वृत्तपत्रांमुळे एखाद्या प्रश्नाविषयी समाजाचे मत, भूमिका आणि वर्तन घडते किंवा बदलत असते. त्यामुळे सामाजिक हित हा निकष लावून वृत्तपत्रांवर काही निर्बंध घालणे आवश्यक आहे, असे आयोगाला वाटले.
वृत्तपत्र समितीला आणखी अधिकार देउन वृत्तपत्रांना ताकीद किंवा इशारा देण्याच्या तरतुदी करण्यात याव्यात; पत्रकारितेच्या प्रशिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष देण्याचे काम १९७८ च्या वृत्तपत्र समितीच्या कायद्यात बदल करून समितीकडे द्यावे, इ. सुचना आयोगाने केल्या.
एकेकटया वृत्तपत्रांची स्वतंत्रपणे वाढ न होता संपूर्ण वृत्तपत्र व्यवसायाची एकसंधपणे वाढ व्हावी, यांसाठी ‘वृत्तपत्र विकास आयोग’ नेमावा, असे आयोगाने सुचविले. भारतीय भांषामधील सर्व प्रकाराच्या वृत्तपत्रांच्या विकासाला या आयोगाने मदत करावी; त्यासाठी वृत्तपत्र उद्योगातील संशोधन आणि विकास यांना चालना द्यावी. भारतीय भाषांच्या लिपींत दूरमुद्रक विकसित करावेत, भारतीय भांषामधील वृत्तसंस्था स्थापन करव्यात, दुर्गम आणि दूरवरच्या भागांत वृत्तपत्रे सुरू करण्याच्या दुष्टीने प्रयत्न करावेत इ. उद्दिष्टे, संकल्पित वृत्तपत्र आयोगाचे स्वरूप कसे असावे, यांची चर्चा करताना दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाने नमुद केली. संकल्पित आयोगासाठी लागणारा निधी कसा गोळा करावा, हेही आयोगाने सुचविले.
वृत्तपत्रांच्या मालकांनी एकाच वेळी इतर उद्योगामध्ये मालकी हक्क ठेवण्यास किंवा त्यात हितसंबध ठेवण्यास कायद्याने बंदी घातली पाहिजे, असा निर्णय आयोगाने दिला. यातच समाजाचे हित आहे, असेही मत आयोगाने व्यक्त केले. वृत्तपत्र व्यवसायाचे इतर उद्योगांशी कशा प्रकारचे संबध असावेत, हेही आयोगाने नमुद केले.
वृत्तपत्रांचा उद्योग म्हणून आढावा घेताना त्यांना नियमितपणे कागदाचा पुरवठा व्हावा, कागद आयातीवर निर्बंध घालू नयेत, सर्व प्रकारच्या वृत्तपत्रांनी एकत्र येउन कागदाच्या आयातीसाठी सहकारी संस्था स्थापन करावी, वृत्तपत्राची एकूण पृष्टसंख्या आणि त्यांची किंमत यांचा परस्परसंबध निश्चित करावा (हीच सूचना पहिल्या आयोगाने केली होती.) इ. सूचना दुसऱ्या आयोगाने केल्या. वृत्तपत्रांमधील स्पर्धा निकोप राहण्याच्या दृष्टीने या गोष्टींची आवश्यकता आहे, असे आयोगाचे मत होते.
आयोगाने केलेल्या अनेक शिफारशींशी गिरीलाल जैन, राजेंद्र माथुर, शिशिर कुमार मुखर्जी आणि ह. कृ. परांजपे हे चार सदस्य सहमत नव्हते. सुमारे सव्वादोनशे मुद्यांविषयी मतभिन्नता दर्शवणारी त्यांची विस्तृत नोंद आयोगाच्या मुख्य अहवालाच्या पहिल्या खंडात समाविष्ट करण्यात आली आहे. (विश्वको

शिक्षणाची संधी



  1. ‘लोगान विज्ञान पत्रकारिता फेलोशिप’
  2. पत्रकारितेचे शिक्षण देणा-या संस्था
  3. नाईट सेंटर फॉर जर्नालिझम
  4. असोसिएशन फॉर एज्युकेशन इन जर्नालिझम एण्ड मास कम्युनिकेशन
  5. जर्नालिझम स्कूल्स डिरेक्टरी (भारत)
  6. जर्नालिझम स्कूल्स डिरेक्टरी (अमेरिका)
  7. पत्रकारिता व जनसंवाद विभाग, मुंबई विद्यापीठ
  8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम एण्ड न्यू मीडिया
  9. पॉइंटर इन्सिट्यूट

संदर्भसाठा

Wednesday 2 October 2013

करिअर-1

कामाचे स्वरूप/वातावरण : बातमीदारांना विशिष्ट विषयांवरील वृत्तसंकलन अथवा त्या त्या विषयातील बातमीचा वेध घेण्यासाठी कामाची जबाबदारी दिली जाते. त्याचप्रमाणे बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

विशेष प्रतिनिधी : परदेश, राजकीय, सामाजिक घडामोडी, कोर्ट, क्रीडा अथवा त्या त्या विषयाशी संबंधित शहरातील बातम्या, त्यांचे विश्लेषण करणे इ. जबाबदारी विशेष प्रतिनिधींवर असते. बातमीदार आणि विशेष प्रतिनिधींना अतिशय व्यस्त कामाचे स्वरूप असते. त्यांना ठराविक वेळेतच आपले काम पूर्ण करावे लागते.

स्तंभलेखक : स्तंभलेखकांना नियमितपणाने एका विशिष्ट विषयावर विश्लेषणात्मक लेख लिहावा लागतो.

फिचर रायटर्स : विविध विषयांवर संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण लेख तयार करणे यासाठी कालमर्यादा असते; परंतु त्यांना पुरेसा वेळ दिला जातो व शब्दमर्यादा निश्चित केली जाते. यात पुस्तक परीक्षणे, चित्रपट अथवा ध्वनिचित्रफीत रसग्रहण, टी.व्ही. आणि रेडिओ प्रश्नेग्रॅम, सीडीज्, ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटस् परीक्षण, वेबसाइटस् इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो.

उपसंपादक : बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.

मुख्य संपादक : धोरणात्मक आणि वृत्तपत्रात/ प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराची जबाबदारी सांभाळावी लागते.

मुक्त पत्रकार : मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वत:च बाजारपेठ शोधावी लागते.

आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वत:चे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलन क्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते


  तील निवडक अभ्यासक्रमांची थोडक्या

१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन : भारत सरकारच्या इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ही एक स्वायत्त संस्था असून या संस्थेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यम/ जाहिरात विभागात काम करणाऱ्या संपर्क व्यावसायिकांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षणवर्ग आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा या अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या संस्थेमध्ये ओरिएन्टेशन कोर्स फॉर ऑफिसर्स ऑफ दि इंडियन इन्फर्मेशन सव्‍‌र्हिस, ब्रॉडकास्ट जर्नालिझम कोर्स फॉर पर्सोनेल ऑफ आकाशवाणी आणि दूरदर्शन आणि डिप्लोमा कोर्स इन न्यूज एजन्सी जर्नालिझम फॉर नॉनअलाइज्ड कंट्रीज असे तीन अभ्यासक्रम राबविले जातात. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन जर्नालिझम हा अभ्यासक्रम सर्व पदवीधारकांसाठी खुला आहे. यांची माध्यमे इंग्रजी आणि हिंदी आहेत. त्याव्यतिरिक्त डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स हा एक कोर्स आहे. या सर्वाचा कालावधी आठ महिने आहे. परीक्षा आणि मुलाखत दिल्ली मुक्कामी देऊन प्रवेश घ्यावा लागतो. मागणीनुसार परीक्षा केंद्र मुंबईमध्ये येते. फ्रीशिप्स आणि शिष्यवृत्त्या आहेत. संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली- ११००६७.

२) मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, जमिया मिलिया इस्लामिया, जमियानगर, नवी दिल्ली- ११००२५ कोर्स : एम. ए. (मास कम्युनिकेशन) कालावधी : दोन वर्षे प्रवेशपात्रता : पदवीधर

३) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिटय़ूट, फग्र्युसन कॉलेज रस्ता, पुणे- ४११००४ प्रवेशपात्रता : पदवीधर कालावधी : एक वर्ष जर्नालिझम (मराठी) कालावधी : सहा महिने प्रवेशपात्रता : बारावी पास (इंग्रजीसह)

४) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करियर एज्युकेशन, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ, मुंबई- ४०००९८. कालावधी : एक वर्षाचा अंशकालीन पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशपात्रता : पदवीधर

५) एस. एन. डी. टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी, पाटकर मार्ग, चर्चगेट, मुंबई- २१. कोर्स : जर्नालिझम (मराठी)

६) एम. आय. टी. स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, १२४, पौड रोड, कोथरूड, पुणे- ४११०३८ एक वर्षाचा अंशकालीन डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट प्रवेशपात्रता : पदवीधर

७) मुंबई मराठी पत्रकार संघ : संघाच्या वतीने मराठी भाषेत पदविका (पदवीधरांसाठी) आणि प्रमाणपत्र (बारावी उत्तीर्णांसाठी)अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यंदाचे अभ्यासवर्गाचे १०वे वर्ष असून १३ ऑगस्टपासून हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. दर गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत चालणाऱ्या या अभ्यासवर्गांना ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करतात. अधिक माहितीसाठी, पत्रकार भवन, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, महापालिका मार्ग येथे प्रत्यक्ष किंवा २२६२०४५१, २२७०४१८९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन या विषयात अंशकालीन पदविका देणाऱ्या मुंबईतील काही संस्था :

८) भारतीय विद्याभवन चौपाटी, मुंबई- ४००००७.

९) बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालिझम,

के. सी. कॉलेज इमारत, चर्चगेट, मुबई- ४०००२०.

१०) बॉम्बे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.

११) देहली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड सव्‍‌र्हिसेस २६३, दादाभाई नवरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१.

१२) हरकिसन मेहता फाऊंडेशन इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम,

नरसी-मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स, विलेपार्ले, मुंबई

१३) हॉर्निमन कॉलेज ऑफ जर्नालिझम, माटुंगा, मुंबई

१४) मराठी वृत्तपत्र लेखक संघ, शिंदेवाडी, पालन मार्ग, दादर, मुंबई- ४०००१४.

१५) सेंट झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई- १.

१६) सोफिया कॉलेज (बी. के. सोमाणी पॉलिटेक्निक) भुलाभाई देसाई रोड, मुंबई- ४०००२६.

१७) सोमैया इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम अँड मास कम्यु. विद्याविहार, मुंबई- ४०००७७.

१८) सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन, आनंद भवन, दादाभाई नवरोजी मार्ग, मुंबई- ४००००१.

१९) पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रश्नेफेशनल स्टडीज.

२०)मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.







पहिला वृत्तपत्र आयोग

(प्रेस कमिशन इन् इंडिया). वृत्तपत्र व्यवसायासंबंधी पाहणी व अभ्यास करुन शिफारशी करण्याकरिता ‘वृत्तपत्र आयोग’ नेमण्याचा प्रघात ग्रेट ब्रिटन, अमेरिका यांसारख्या लोकशाहीवादी देशांनी सुरु केला. ग्रेट ब्रिटन मध्ये ‘रॉयल प्रेस कमिशन’ हा वृत्तपत्र आयोग १९४५ मध्ये स्थापन झाला. अमेरिकेत रॉबर्ट एम्. हचिन्स (१८९९–१९७७ ) या शिक्षणतज्ज्ञाने ‘कमिशन ऑन फ्रिडम ऑफ द प्रेस’ या वृत्तपत्र आयोगाचे नेतृत्व केले (१९४६).
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील वृत्तपत्राच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी ब्रिटीश ‘रॉयल प्रेस कमिशन’ च्या धर्तीवर आयोग नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली. अखिल भारतीय वृत्तपत्र संपादक परिषद आणि भारतीय श्रमिक पत्रकार महासंघ यांनी ही मागणी विशेषत्वाने उचलुन धरली.

पहिला वृत्तपत्र आयोग :
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ग. स. राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली २२ सप्टेंबर १९५२ रोजी पहिल्या वृत्त्पत्र आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात सी. पी. रामस्वामी अय्यर, आचार्य नरेंद्र देव, झाकिर हुसेन, पु. ह. पटवर्धन, आ. रा. भट, चलपती राव, आणि ए. डी. मणी इ. सभासद होते.
आयोगाने विचारात घ्यावयाचे मुद्दे पुढील प्रमाणे होते: वृत्तपत्राच्या निंयत्रणाचे स्वरुप आणि त्यांची आर्थिक रचना, मक्तेदारी, आणि साखळी- वृत्तपत्रे, बातम्यांचा अचुकपणा आणि नि:पक्षपातीपणा, जाहिरतींचे वितरण, निकोप पत्रकारितेचा विकास, उच्च व्यावसायिक मृल्यांचे जतन, श्रमिक पत्रकारांच्या कामाची परिस्थिती, वेतन, प्रशिक्षण, वृत्तपत्रीय कागदाचा पुरवठा, शासन आणि वृत्तपत्रे यांतील परस्पर संबंध, वृत्तपत्रस्वांतत्र्य आणि त्यासंबधीचे कायदे इत्यादी.
आयोगाने १४ जुलै १९५४ रोजी आपला अहवाल लिहून पूर्ण केला. या अहवालाचे एकुण तीन भाग आहेत : पहिल्या भागात वृत्तपत्रविषयक प्रमुख शिफारशी आहेत. दुसऱ्या भागात भारतीय पत्रकारितेचा इतिहास दिला आहे आणि तिसऱ्या भागात आयोगाच्या कामकाजाचे तपशील देण्यात आले आहेत. या अहवालाचे वर्णन आयोगाचे सदस्य व प्रसिद्ध पत्रकार ⇨चलपती राव यांनी ‘अ काइंड ऑफ बायबल’ (वृत्तपत्र व्यवसायाचा पवित्र ग्रंथ या अर्थी) असे केले आहे.
या आयोगाने वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि पत्रकारांकरिता आचारसंहिता तयार करण्यासाठी वृत्तपत्र समितीची (प्रेस काउन्सिल) स्थापन करण्यात यावी. अशी शिफारस केली. त्यानुसार वृत्तपत्र समिती कायदा संमत होऊन (१९६५), ४ जुलै १९६६ रोजी पहिली वृत्तपत्र समिती स्थापन करण्यात आली. वृत्तपत्र निबंधकाची (प्रेस रजिस्ट्र्रार) नेमणूक करण्यात यावी. या सुचनेची दखल घेउन शासनाने १ जुलै १९५६ पासून ते पद निर्माण केले.
आयोगाच्या कामाची महत्वाची फलश्रुती म्हणून १९५५ चा श्रमिक पत्रकार कायदा आणि वेतन मंडळाची स्थापना या बाबींचा निर्देश करता येईल. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये वेतन अधिक असले तरी देशी भाषांतील वृत्तपत्रकाराची स्थिती मात्र हलाखीची होती. त्यामुळे पत्रकारांना किमान रू. १२५ मासिक वेतन द्यावे. त्याच्या भविष्यनिर्वाह निधीची व उपदान निधीची (ग्रॅच्युइटी) तरतुद असावी, तसेच महागाई भत्ता आणि शहर भत्ता देण्यात यावा अशा सूचनाही आयोगाने केल्या. श्रमिक पत्रकारांच्या कामगार संघटनांनी राजकीय पक्ष व आंदोलने यांपासुन कटाक्षाने दुर रहावे, असा इशारा आयोगाने दिला.
कमी खपाच्या लहान वर्तमानपत्रांना गुंतवणुकीच्या जेमतेम एक टक्का नफा होत असे. मोठ्या वर्तमानपत्राच्या बाबतींत हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत जात असे. मक्तेदारी आणि साखळी-वृत्तपत्रांचे प्रमाण जास्त होते. अशा वृत्तपत्रांशी स्पर्धा करणे एकट्या व स्वतंत्र वृत्तपत्रांना जड जाई. त्यांमुळे मालकी वृत्तपत्रांऐवजी विश्वस्त संस्थेच्या वतीने वृत्तपत्रे चालवण्याची योजणा आयोगाने मांडली. सर्वसाधारणपणे बँकेकडून जेवढे व्याज मिळेल, त्यापेक्षा अवाजवी नफा गुंतवणुकीवर मिळवण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांनी करू नये, अशी आयोगाची भूमिका होती. धंदा म्हणून वृत्तपत्रांकडे न पाहता लोकशिक्षणाचे साधन म्हणून सामाजिक हिताच्या व जबाबदारीच्या जाणिवेतून वृत्तपत्रे चालवली जावीत, असे आयोगाचे आग्रही प्रतिपादन होते.
साखळी–वृत्तपत्रांपैकी प्रत्येक वृत्तपत्र स्वतंत्र असावे, एकाच वृत्तपत्राच्या अनेक आवृत्त्या असतील तर त्यांचे हिशोब स्वतंत्र असावेत, असे आयोगाने सुचविले.
विषम स्पर्धा टाळण्यासाठी पृष्ठ-किंमत कोष्टक ठरवण्याची आयोग़ाची सूचना केंद्र शासनाने कायदेशीर तरतूद करुन अमंलात आणली. या निर्बंधाच्या विरोधात पुण्याच्या सकाळ वृत्तपत्राने याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने सकाळच्या बाजूने निकाल दिल्याने हा निर्बंध प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
लहान शहरातील व ग्रामीण भागांतील वृत्तपत्रांना उत्तेजन देण्यासाठी शासकीय जाहिराती देताना याच वृत्तपत्रांचा प्रामुख्याने विचार केला जावा, ही आयोगाची शिफारस महत्वाची होती. त्याचबरोबर वृत्तपत्रांच्या एकूण मजकुरातील जाहिरातींचे प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त नसावे, असे आयोगाचे मत होते.
स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्र-संपादकांच्या स्वातंत्र्यात आणि दर्जात घसरण होत असल्याची नोंद आयोगाने केली. स्वत:च्या मालकीच्या वृत्तपत्रांतुन आपला दृष्टिकोन प्रकट होइल अशी अपेक्षा करणे हा वृत्तपत्रचालकांचा हक्क आहे. हे आयोगाने मान्य केले. परंतु संपादकाची नेमणूक करतेवेळीच वृत्तपत्राचे धोरण शक्य तितक्या नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट करावे, व तसा संपादकाशी करार करावा आणि त्यानंतर मात्र संपादनाचे संपूर्ण अधिकार संपादकाच्या हाती असावेत, असे आयोगाने सुचविले. करारांतील मुद्यांच्या अर्थाविषयी मतभेद झाल्यास त्यांचा निवाडा वृत्तपत्र समितीने करावा, असेही आयोगाने सुचविले.
वृत्तपत्र कागदाच्या पुरवठयासाठी राज्य व्यापार निगमाची स्थापना करावी, जिल्हास्तरावर वृत्तपत्रे स्थापन करवीत, वृत्तसंस्था शासकीय मालकीच्या किंवा शासकीय नियंत्रणाखली असु नयेत, पत्रकारितेच्या औपचारिक शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे इ. शिफारशी आयोगाने केल्या. (विश्वकोश)

नानासाहेब भिकाजी परुळेकर

नारायण ऊर्फ नानासाहेब भिकाजी परुळेकर
डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, (सप्टेंबर २०, इ.स. १८९७ - जानेवारी ८, इ.स. १९७३) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते.
'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
इ.स. १९२९ साली नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले.
नानासाहेबांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली. खरे तर भारतात परतल्यावर तेव्हा सुरू असलेल्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घ्यायचा विचारही त्यांच्या मनात होता; पण पत्रकारितेकडे वळाण्याची काही खास कारणे होती. आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती, आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते. दुसरे म्हणजे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते. लोकमान्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि 'केसरी'मार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा नानासाहेबांवर प्रभाव होता. त्यांचा पिंड हा सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता. त्यामुळे नानासाहेबांची पत्रकारिताच करण्याचे निश्चित केले.
नानासाहेब भारतात परतले तो काळ राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हते. मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती. इंग्रजीला सरकारदरबारीही महत्त्व होते. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते; कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते. समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती.
दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्त्विक चर्चा न करता, त्यावर बोजड भाषेत लेख न लिहिता, आसपास घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. असे केल्याने ते दैनिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले तरच आगामी काळात तगणार होते.
नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले. त्यांना असे दिसून आले की, वाचकांना तपशीलवार तर सोडाच, ताज्या बातम्याही मिळत नाहीत. मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचे होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या नानासाहेबांच्या उद्देशाला हा हेतू पूरकच होता. वृत्तपत्र सुरू करताना पारंपरिक वाचकवर्गाकडे न वळता ते नवीन वाचकवर्ग तयार करण्याच्या कामी लागले. त्यासाठी धोरण आखतानाच त्यांनी वृत्तपत्राचे स्वरूप वार्ताभिमुख ठेवले. दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले. वाचकांना ताज्या बातम्या देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे; शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त; न्यायालये, पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यांवर नानासाहेबांनी भर दिला. ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांमध्ये वार्ताहर नेमले. मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधीची नेमणूक केली. वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासाहेबांनी त्याच्या रचनेत, मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. आजची पत्रकारिता ही अशाप्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी राहिली.
उत्तरोत्तर प्रगती करताना त्यांच्या 'सकाळ'ने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परदेशांतील निवडणुका, ऑलिम्पिक सामने, घोड्यांच्या शर्यती, बाजार, ललित कला, संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ' लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाचा मित्र झाला.
सुरूवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ नानासाहेबांना नव्हते. त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मानली नाही; त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती. काही स्नेहीजनांनी मदतीचा हात पुढे केला, तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले. केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे त्यांना खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागले. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोके वर काढत. नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी केला.
'सकाळ' सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसांतच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले.
मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’ चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस-चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले; मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करीत असत. या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला.
नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले. अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असे मानून त्यांनी नव्याने व्यवसायाची नौका हाकारली; म्हणूनच त्यांचे नाव आज यशस्वी संपादकांच्या मांदियाळीत घेतले जाते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता! त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले, तरी त्यात व्यावसायिकता आणली. त्याचबरोबर धंदेवाईकपणा दूर ठेवला. बांधावरच्या शेतमजुरालाही त्याच्या अस्तित्वाशी निगडित बातम्या पुरवून त्यांनी आपले दैनिक सर्वव्यापी केले. ते स्वतः वृत्तपत्राचे चालक, मालक, व्यवस्थापक आणि संपादक होतेच, पण आपला वृत्तसंपादकाचा बाणा त्यांनी कायम जागता ठेवला. आलेली प्रत्येक बातमी डोळ्यात तेल घालून तपासली आणि बातमीदारांमध्ये बातम्यांसंदर्भातली विशेष जाण विकसित केली. नानासाहेब हे यशस्वी संपादक तर होतेच, पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे, त्यातील अनावश्यक भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला कालसुसंगत तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते.

वृत्तपत्रविद्या

वृत्तपत्रविद्या : (जर्नॅलिझम, स्टडी ऑफ). वृत्त किंवा वार्ता हा वृत्तपत्राचा केंद्रबिंदू असल्याने वार्तेचे स्वरुप, मूल्ये, संकलन, लेखन, संपादन, विश्लेषण, टिकाटिपण्णी या विषयांचा वृत्तपत्रविद्येत प्रामुख्याने समावेश होतो. म्हणूनच केसरीचे संपादक थोर साहित्यिक न. चिं. केळकर (१८७२-१९४९) त्याला ‘संपादकीय शिक्षण’ असे म्हणत. याशिवाय वृत्तपत्राशी संबंधित असलेले इतर विषय म्हणजे मुद्रण, वृत्तपत्राचे तत्त्वज्ञान, वृत्तपत्रविषयक कायदे, ताज्या घडामोडी, जाहिरात, जनसंपर्क, तसेच नभोवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट इ. जनसंज्ञापन-माध्यमे यांचाही वृत्तपत्रविद्येत समावेश करण्यात येतो. मात्र एक किंवा दोन वर्षांच्या मर्यादित कालावधीत या सर्व विषयांचे सखोल ज्ञान देणे अशक्य असल्याने वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमात तांत्रिक कौशल्ये व तत्वज्ञान यांना प्राधान्य देऊन इतर विषयांची साधारणपणे तोंडओळख करुन दिली जाते. वृत्तपत्रविद्येला एक शैक्षणिक विषय म्हणून म्हणून मान्यता मिळाली आहे.

जागतिक आढावा : () भारत : वृत्तपत्रविद्येचे प्रशिक्षण देण्याचे सुरुवातीचे प्रयत्न पुणे व चेन्नई येथे झाले. १९२१ साली असहकारितेच्या चळवळीत उडी घेऊन शाळा-महाविद्यालयांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र धंद्याचे शिक्षण देण्याकरिता केसरी-मराठा संस्थेने पुणे येथील गायकवाड वाड्यात संपादकीय शिक्षणाचा एक वर्ग काढून खर्च करुन एक वर्ष चालविला. या वर्गातून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे वर्तमानपत्राचा धंदा केला व हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सातारा वगैरे ठिकाणी त्यांनी वर्तमानपत्रे चालविली, असे न. चिं. केळकरांनी वृत्तपत्रमीमांसा (१९६५ – पृ. १३४) या पुस्तकात म्हटले आहे. चेन्नईतील अड्यारच्या राष्ट्रीय विद्यापीठातील इंग्लिश विभागामध्ये डॉ. अॅनी बेझंट यांनी वृत्तपत्रविद्येचे प्रशिक्षण देण्यास १९२०-२१मध्ये सुरुवात केली. हा उपक्रम सु, पाच वर्षे चालला. वृत्तपत्रातील कार्यानुभव हा या अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग होता आणि त्यातून सु. २५ विद्यार्थी प्रशिक्षत झाले, अशी माहिती या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेले एक विद्यार्थी व साध्वीचे संपादक आगाराम रंगय्या यांनी आपल्याला दिली अशे नोंद प्रा. नाडिग कृष्णमूर्ती यांनी केली आहे (इंडियन जर्नॅलिझम, १९६६). विद्यापीठ पातळीवर वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा पहिला मान अलिगढ मुस्लिम विद्यापीठाकडे जातो. १९३८ मध्ये सुरु झालेला हा अभ्यासक्रम शिकविणारे प्राध्यापक रहमली अल् हाश्मी यांचे वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे तो १९४० मध्ये बंद झाला.

भारतात वृत्तपत्रविद्येचा खरा पाया घातला प्रा. पृथ्वीपालसिंग यांनी. लाहोर (सध्या पाकिस्तानात) येथील ⇨पंजाब विद्यापीठात त्यांनी १९४१ मध्ये वृत्तपत्रविद्येचा सायंकालीन अंशवेळ पदविका अभ्यासक्रम सुरु केला. त्यांनी स्वतः ‘लंडन पॉलिटेक्निक’ मधून पदविका आणि मिसूरी विद्यापीठातून ‘मास्टर्स’ ही पदवी मिळवली होती. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणापुढे अगदी प्रारंभापासून त्या दोन भिन्न प्रणालींचे आदर्श होते. त्यापैंकी ब्रिटिश प्रणाली फक्त पत्रकारितेच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणारी, प्रात्यक्षिक कार्यानुभवावर भर देणारी आणि मनुष्यबळ व निधी यांच्या मर्यादित गुंतवणूकीवर आधारलेली होती. त्यामुळे व सर्व ब्रिटिश गोष्टींना आदर्श मानण्याच्या तत्कालीन प्रवृत्तीमुळे भारतीय विद्यापीठांनी प्रारंभीच्या दोन-तीन दशकांत ब्रिटिश प्रणालीचे अनुकरण केले. १९७० नंतर अमेरिकी धर्तीवर दोन वर्षांचे ‘मास्टर’ या पदवी अभ्यासक्रमात झाले आहे. मद्रास विद्यापीठाने १९४७मध्ये अर्थशास्त्र विभागांतर्गत वृत्तपत्रविद्येचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला. १९७५ मध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन होऊन तेथे दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. १९७९ मध्ये त्याची जागा दोन वर्षांच्या एम्. ए. (संज्ञापन) या अभ्यासक्रमाने घेतली. नागपूरच्या हिस्लॉप ख्रिश्चन (सध्याचे विदर्भ महाविद्यालय) महाविद्यालयाने १९५२ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्यांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरु केला. १९६४ मध्ये त्या अभ्यासक्रमाचे रुपांतर ‘बॅचलर’ पदवी अभ्यासक्रमात झाले. पण शिक्षकांच्या अभावी हा अभ्यासक्रम १९६६मध्ये बंद पडला. नागपूर विद्यापीठाने १९६९ मध्ये त्याचे पुनरुज्जीवन केले. कोलकाता विद्यापीठानेही १९५० मध्ये सुरु केलेल्या दोन वर्षांच्या अंशकालीन अभ्यासक्रमाचे १९७१ मध्ये ‘मास्टर्स’ पदवी अभ्यासक्रमात रुपांतर केले. म्हैसूरच्या महाराजा महाविद्यालयाने बी. ए. च्या अभ्यासक्रमात वृत्तपत्रविद्येचा ऐच्छिक विषय म्हणून समावेश केला. १९५९ मध्ये बी. ए. च्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात वृत्तपत्रविद्या हा मुख्य विषय म्हणून मान्य करण्यात आला. म्हैसूर विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा स्वतंत्र विभाग १९६९ मध्ये सुरु केला. तेथे तेव्हापासून दोन वर्षांचा ‘मास्टर’ पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आता बंगलोर विद्यापीठाने व अन्य काही विद्यापीठांनीही बॅचलर पदवी अभ्यासक्रमात पत्रकारिता व जनसंज्ञापन या विषयांचा समावेश केला आहे. भारतात सु. साठ विद्यापीठांमध्ये वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते.

पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाची स्थापना १९६४ मध्ये झाली. प्रारंभी दोन वर्षांचा अंशकालीन पदविका अभ्यासक्रम, १९६८ पासून एक वर्षाचा पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रम, १९७४ पासून एक वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आणि १९९३ पासून एक वर्षाचा ‘मास्टर’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी प्रगती होत होत आता तेथे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि मास्टर या पदवीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम असे तीन अभ्यासक्रम चालविले जातात. यांशिवाय पुणे विद्यापीठात १९९० नंतरच्या दशकात संज्ञापनविद्या हा वेगळा विभाग सुरु झाला. तेथेही दोन वर्षांचा संज्ञापनविद्येतील ‘मास्टर’ या पदवीचा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. वृत्तपत्रविद्येमध्ये पुणे विद्यापीठाने आतापर्यंत तीन पीएच्. डी. पदव्याही प्रदान केल्या आहेत.

रंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ येथे वृत्तपत्रविद्येचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यांच्या क्षेत्रांतील काही महाविद्यालयांमध्ये वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम चालविले जातात. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठामध्ये वृत्तपत्रविद्येचे अल्पकालीन व अंशकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात.

भारत सरकारने १९६५ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ ची स्थापना केली. तेथे केंद्राच्या व राज्यांच्या कक्षेतील अधिकार्यां ना वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. शिवाय त्या संस्थेमध्ये वृत्तपत्रविद्येचा एक वर्षाचा पदव्युत्तर-पदविका अभ्यासक्रम, आकाशवाणी व दूरचित्रवाणी-पत्रकरिता आणि जाहिरात असे प्रत्येक एक वर्षाचे चार पदविका अभ्यासक्रम इंग्लिश व हिंदी या माध्यमांतून चालविले जातात. त्यांपैकी वृत्तपत्रविद्येच्या व वृत्तसंस्था-पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत आशिया व आफ्रिका खंडातील विकसनशील राष्ट्रांच्या उमेदवारांसाठी ५०% जागा राखीव ठेवलेल्या असतात. अध्यापकवर्ग, इमारत, यंत्रसामग्री आणि निधी या दृष्टींनी भारतातील ही एक समृद्ध संस्था आहे. आता तिची धेनकानाल (ओरिसा) व कोट्टयम् (केरळ) अशी दोन प्रादेशिक केंद्रे सुरु झाली असून, मध्य प्रदेशातील झाबुआ येथे आणि नागालँड दिमापूर येथे केंद्रे सुरु करण्याची संस्थेची योजना आहे. पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ या संस्थेमध्ये दूरचित्रवाणी पत्रकारितेचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते.

वृत्तपत्रविद्येसाठी मध्य प्रदेश शासनाने भोपाळ येथे ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय’ स्थापन केले (१९९१).

भारतात अनेक खाजगी संस्थांमध्येही वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते. त्यांमध्ये भारतीय विद्याभवनाची सु. २० केंद्रे, ‘सेंट झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (मुंबई), ‘मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड अॅडव्हरटायझिंग’ (अहमदाबाद), ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नॅलिझम’ (बंगलोर), ‘मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (मणिपाल) आणि ‘सिंबॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (पुणे) यांचा उल्लेख करावा लागेल. यांशिवाय मुंबईतील किसनदास चेलाराम महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, सोफिया महाविद्यालय यांसारखी खाजगी महाविद्यालये वृत्तपत्रविद्येचे अंशकालीन अभ्यासक्रम चालवितात. केरळ, म्हैसूर व जयपूर या विद्यापीठांतर्फे टपालाद्वारेही वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते.

वृत्तपत्रविद्येच्या प्रमाणभूत अभ्यासक्रमांत पुढील विषयांचा अंतरभाव असतो : () वृत्तसंकलन, वृत्तलेखन, वृत्तसंपादन. () संपादकीय लेखन, वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे संपादन, पानांची रचना () छायाचित्र-पत्रकारिता. () वृत्तपत्रांचे तत्वज्ञान. () वृत्तपत्रविषयक कायदे, भारतीय राज्यघटना. () भारतातील वृत्तपत्रांचा (=पत्रकारितेचा) इतिहास, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास. () चालू घडामोडी-आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक. () संज्ञापनाचे सिद्धांत, आंतरव्यक्ती संज्ञापन, जनसंज्ञापन. () भारतातील नभोवाणी व दूरचित्रवाणी यांचा विकास. (१०) नभोवाणी/दूरचित्रवाणीसाठी पत्रकारिता. (११) भाषालेखन कौशल्ये. (१२) संशोधनपद्धती. (१३)प्रादेशिक भाषेतील पत्रकारिता, प्रदेशाचा इतिहास.

() अमेरिका : वॉशिंग्टन विद्यापीठाने १८६९ मध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याला फक्त जोसेफ पुलिट्झर (न्यूयॉर्क वर्ल्ड) आणि व्हाइट लॉ रीड (‘ट्रिब्यून’) या दोनच संपादकांचा पाठिंबा होता. मिसूरी विद्यापीठाने १८७८ मध्ये पत्रकारितेचा ‘इतिहास-साधने’ याचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. तेथेच १९०८ मध्ये पत्रकारितेचे पहिले स्वतंत्र ‘स्कूल’ सुरु झाले. जोसेफ पुलिट्झरने दिलेल्या देणगीमुळे कोलंबिया विद्यापीठाने (न्यूयॉर्क) पत्रकारितेची कौशल्ये व कार्यानुभव देणारे ‘स्कूल’ १९१२ मध्ये सुरु केले. पत्रकारितेच्या विभागांची अमेरिकी विद्यापीठातील संख्या  (१९१०) वरुन ८४(१९१७), ४५५ (१९३४) व ६०० (१९८७) अशी वेगाने वाढत गेली. अमेरिकेतील पत्रकारितेच्या शिक्षणाचे प्रमाणीकरण करण्यात ‘अमेरिकेन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ जर्नॅलिझम’ (१९१२), ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड डिपार्टमेंट्स ऑफ जर्नॅलिझम’ (१९१७), ‘अमेरिकन काउन्सिल फॉर एज्युकेशन इन जर्नॅलिझम’ (१९३९) आणि ‘अमेरिकन सोसायटी ऑफ जर्नॅलिझम अँड स्कूल जर्नॅलिझम’ (१९४४) इ. संस्थांनी आणि वृत्तपत्रादी माध्यमांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. शासकीय मदतीवर चालणारी विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे यांच्याबरोबरच ‘गनेट सेंटर’ (न्यूयॉर्क) यांसारख्या खाजगी संस्था संशोधन, चर्चासत्रे, अभ्यासक्रमांचे आणि अध्यापनपद्धतींचे आधुनिकीकरण, ग्रंथनिर्मिती अशा विविध मार्गांनी पत्रकारितेच्या शिक्षणाचा कस वाढविण्यास साहाय्य करतात. पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी (उच्च माध्यमिक शिक्षणानंतर) चार वर्षे असतो. त्याला एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची जोड देऊन पदव्युत्तर पदवी घेता येते. एकूण अभ्यासक्रमाच्या २५% भाग प्रात्यक्षिके, कार्यानुभव, पत्रकारितेची तत्वे, इतिहास आणि संज्ञापनाचे सिद्धांत यांचा असतो. बाकी ७५% अभ्यासक्रमात भाषा, मानव्यविद्या व विज्ञाने यांनी व्यापलेला असतो

(कॅनडा : मार्शल मक्लूअन या इंग्लिशच्या प्राध्यापकाने माध्यमविषयक आपले क्रांतिकारक व द्रष्टे विचार टोराँटो विद्यापीठातील व्याख्यानात मांडले, त्यामुळे आता तेथे ‘मक्लूअन सेंटर फॉर कल्चर अँड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली आहे.१९८० पर्यंत वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देणार्या् कॅनडातील संस्थांची संख्या ७० (३० विद्यापीठे व ४० महाविद्यालये) झाली होती.


() इंग्लंड : लॉर्ड नॉर्थक्लिफ आणि इतर वृत्तपत्र-मालकांच्या आश्रयाने ‘लंडन स्कूल ऑफ जर्नॅलिझम’ ची स्थापना १९१९ मध्ये झाली. लंडन विद्यापीठाने १९१९ ते १९३९, अशी सु. २० वर्षे वृत्तपत्रविद्येचा पदविका अभ्यासक्रम चालविला होता. वृत्तपत्रांचे मालक, संपादक व पत्रकार यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन १९५२ मध्ये ‘नॅशनल काउंसिल फॉर द ट्रेनिंग ऑफ जर्नॅलिझम’ (एनसीटीजे) या संस्थेची स्थापना केली. इच्छुक उमेदवारांसाठी ‘एनसीटीजे’ ने () थेट प्रवेश व () प्रवेशपूर्व उमेदवारी अशा दोन पद्धती ठरविल्या आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये उमेदवार संपादकांकडे थेट अर्ज करुन वृत्तपत्रांत दाखल होतात. तेथे सहा महिने काम केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना दोन-अडीच किंवा तीन वर्षांसाठी ‘शिकाऊ उमेदवार’ हा दर्जा दिला जातो. या काळात पदवीधर उमेदवार दहा आठवड्यांचा एक अभ्यासक्रम पूर्ण करतात. दुसर्याा पद्धतीतील उमेदवार प्रारंभीच्या सहा महिन्यांच्या सेवेनंतर एखाद्या महाविद्यालयात एक वर्ष पूर्णवेळ शिक्षण घेतात आणि त्यानंतर वृत्तपत्रातील प्रशिक्षण पूर्ण करतात. त्यानंतर त्यांना वृत्तपत्रांत तीन महिन्यांसाठी परिवीक्षा कालावर काम करावे लागते. परिवीक्षा कालावधीनंतर सव्वादोन वर्षे किंवा अधिक काळासाठी त्यांना शिकाऊ उमेदवार हा दर्जा मिळतो. ‘शिकाऊ उमेदवारां’च्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘एनसीटीजे’ ने काही (सु. सात) महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. तेथे इंग्रजी भाषा, स्थानिक व राष्ट्रीय प्रशासन, वृत्तपत्रविषयक कायदे, लघुलेखन व टंकलेखन आणि वृत्तपत्रांची विविध अंगे ह्यांचे शिक्षण दिले जाते. शिकाऊ उमेदवारांच्या परिक्षेत, बातमीसाठी घ्यावयाची मुलाखत, प्रसिद्धीपत्रकावरुन सु. ३०० शब्दांची बातमी लिहिणे, लघुलेखन (मिनिटाला १०० शब्द), टंकलेखन, भाषणाच्या नोंदींच्या साहाय्याने ४०० ते ५०० शब्दांची बातमी लिहिणे इत्यादींचा समावेश असतो. ‘एनसीटीजे’ ने पदव्युत्तर एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कार्डिफच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ ला व लंडनच्या ‘सिटी युनिव्हर्सिटी’ ला मान्यता दिली आहे. राजकारण, अर्थकारण, संपादकीय लेखन इ. विशेष क्षेत्रांसाठी वृत्तपत्रे योग्य उमेदवारांची थेट भरतीही करतात. पण सर्वसाधारणपणे राष्ट्रीय वृत्तपत्रे प्रादेशिक वृत्तपत्रांतील पत्रकारांनाच आपल्या सेवेत घेतात.

() जर्मनी व फ्रान्स : पत्रकारितेच्या इतिहासासंबंधीची व्याख्याने जर्मनीतील विद्यापीठांमध्ये १६७२ मध्ये आयोजित केली जात. परंतु वृत्तपत्रविद्येच्या औपचारिक आणि सातत्यपूर्ण शिक्षणाचा प्रारंभ मात्र जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुमारास झाला. पत्रकारितेच्या कौशल्यांचे शिक्षण देणे हे आपल्या कक्षेत येत नाही, असे जर्मन विद्यापीठांचे मत होते, त्यामुळे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, कायदा या विषयांवर जर्मन विद्यापीठातील पत्रकारिता विभाग भर देत. दुसर्याि महायुद्धानंतर जनमत व प्रचार यांना महत्त्व देण्यात येऊ लागले. दुसर्याा महायुद्धाच्या काळात बंद पडलेल्या वृत्तपत्रविद्या प्रबोधिनीचे पुनरुज्जीवन फ्रान्सने ‘फ्रेंच इन्स्टित्यूट ऑफ प्रेस’ या नावाने १९५१ मध्ये केले. १९५७ मध्ये ती सॉरबाँ विद्यापीठाला जोडण्यात आली आणि पदवी व पदविका देण्याचा अधिकार तिला १९६६ मध्ये मिळाला. १९७० च्या दशकापर्यंत युरोपमधील प्रत्येक देशात वृत्तपत्रविद्येचे सिद्धांत व कौशल्ये अशा दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्याच्या सोयी निर्माण झाल्या होत्या.

() रशिया : ऑक्टोबर क्रांतीनंतर (१९१७) लगेचच मॉस्को येथे ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ जर्नॅलिझम’ ची स्थापना झाली. दुसर्याश महायुद्धानंतर विद्यापीठीय केंद्रांनी तिची जागा घेतली. त्यातील पहिले केंद्र लेनिनग्राड विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात १९४६ मध्ये सुरु झाले. मॉस्को विद्यापीठातील केंद्र भाषाविज्ञान विभागात होते. रशियात वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाच्या तीन पद्धती आढळतात : () पाच वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम, () सहा वर्षांचा सायंकालीन अभ्यासक्रम, () टपालद्वारे शिक्षण. वृत्तपत्रे, नियतकालिके व वृत्तसंस्था यांमधील पत्रकारिता, ग्रंथप्रकाशन आणि नभोवाणी-दूरचित्रवाणी यांमधील पत्रकारिता यांतील एखाद्या विषयाचा विद्यापीठीय केंद्रात विशेष अभ्यास करता येतो. याशिवाय रशियन पत्रकारितेचा इतिहास, जनसंज्ञापनमाध्यमांचे समाजशास्त्र, रशियन भाषा व वाङ्‌मयीन समीक्षा या विषयांचा व दहा आठवड्यांच्या कार्यानुभवाचा वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमांत समावेश असतो.

(७) आशिया खंड : वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापनविद्या यांचे औपचारिक शिक्षण देणार्याभ आशिया खंडातील संस्थांची संख्या १९३० च्या दशकात वीसपेक्षा कमी होती. १९७५ मध्ये ती संख्या २१० पर्यंत गेली. त्यांपैकी जवळजवळ निम्म्या संस्था अमेरिकी प्रणाली वापरतात. टोकिओच्या सोफाया विद्यापीठातील वृत्तपत्र विभाग १९३२ मध्ये सुरु झाला. तेथील अभ्यासक्रम चार वर्षांच्या अभ्यासक्रमात संशोधनावर भर दिला जातो. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात संशोधनावर भर असतो. मानिला (थायलंड) च्या ‘फारईस्टर्न’ ने १९३४ मध्ये आणि चीनमधील चेंगची विद्यापीठाने १९३५ मध्ये वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम सुरु केले. त्यानंतर इंडोनिशिया, कोरिया, सिंगापूर इ. देशात वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम सुरु झाले.

इंग्लंडच्या टॉमसन फौंडेशनने व आफ्रिका खंडातील वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणात मोलाची कामगिरी बजावली आहे. भारतातील ‘प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’, चीनची ‘झिनुआ’ ही वृत्तसंस्था, सिंगापूरमधील ‘अॅमिक’ (एशियन मास कम्युनिकेशन अँड रिसर्च सेंटर) इ. संस्थांच्या सहकार्याने टॉमसन फौंडेशन इंग्लंडमध्ये आणि त्या त्या देशांत अल्पमुदतीचे सेवांतर्गत अभ्यासवर्ग चालविते. जर्मनीची ‘फ्रीड्रिख एबर्ट फौंडेशन’ ही भारत, सिंगापूर येथील संस्थांच्या सहकार्याने संशोधन, चर्चासत्रे इ. कार्यक्रम राबविते.

() आफ्रिका खंड : संपूर्ण आफ्रिका खंडात स्वतंत्र देशांची संख्या १९५० मध्ये चार होती, ती १९७० मध्ये ३६ पर्यंत पोहोचली. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी वृत्तपत्रविद्या वा जनसंज्ञापन-माध्यमांचे शिक्षण देणारी केंद्रे वेगाने सुरु केली. यांपैकी अनेक देशांत स्वतःच्या वृत्तसंस्थाही नव्हत्या; त्यामुळे पुस्तके, स्टुडिओ, साधने, अनुभवी शिक्षक यांचीही उणीव होती.

कैरोच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम १९३७ मध्ये सुरु झाला. इस्राइलमध्ये जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठामध्ये संज्ञापन वृत्तपत्रविद्येसाठी स्वतंत्र संस्था सुरु करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील पॉचफ्स्ट्रूम विद्यापीठामध्ये माध्यम-व्यावसायिकांसाठीचा अभ्यासक्रम १९६० मध्ये सुरु झाला. उत्तर आफ्रिकेतील वृत्तपत्रविद्येची पहिली संस्था १९६४ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर अल्जीरिया, लिबिया, सीरिया इ. देशांमध्ये वृत्तपत्रविद्येशी संबंधीत असलेले अभ्यासक्रम व संस्था स्थापन झाल्या.

फ्रिकेच्या वासाहतिक इतिहासामुळे तेथे स्थानिक व प्रादेशिक भाषांपेक्षा इंग्रजी व फ्रेंच या भाषांचे राज्यकारभार, माध्यमे व शिक्षण या क्षेत्रांत वर्चस्व आहे. त्यामुळे वृत्तपत्रविद्येच्या संस्थांमध्ये वापरल्या जाणार्याइ पुस्तकांपैकी ६०% पुस्तके अमेरिकेतील व २०% पुस्तके इंग्लंडमधील आहेत, असे युनेस्को १९८७ मध्ये केलेल्या एका पाहणीत आढळले. काही ठिकाणी पुस्तकाची एकच प्रत, तीही शिक्षकाकडे, होती आणि विद्यार्थ्यांना त्याच्या छायाप्रती वापराव्या लागत.

() लॅटिन अमेरिका: तथाकथित ‘तिसऱ्या’ जगातील इतर देशांच्या तुलनेने दक्षिण व मध्य अमेरिकेतील देश पुष्कळच आधी स्वतंत्र झाले. शिवाय भौगोलिक व सांस्कृतिक सान्निध्यातील त्यांच्यापुढे उत्तर अमेरिकेतील शिक्षणाचा आदर्श होता. त्यामुळे वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाच्या बाबतीत आशिया व आफ्रिकेतील देशांपेक्षा लॅटिन अमेरिकेतील देशांनी आघाडी घेतली. ब्राझील व अर्जेंटिनामध्ये वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देणार्या संस्था १९३० च्या दशकातच स्थापन झाल्या. त्यानंतरच्या दशकात एक्वादोर, मेक्सिको, पेरु आणि व्हेनेझुएला या देशांत अशा संस्था सुरु झाल्या. १९७० मध्ये या संस्थांची संख्या ८१ पर्यंत पोहोचली होती. मात्र यातील बहुतेक सर्व संस्थांना निधीचा व पात्र शिक्षकांचा तुटवडा जाणवतो. साधनेही तुटपुंजी व प्राथमिक स्वरुपाची आढळतात. बहुसंख्य अभ्यासक्रम अल्प मुदतीचे असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा समाधानकारक नसतो. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून ब्राझीलने १९६९ मध्ये पत्रकारांना मात्यताप्राप्त संस्थेची पदवी मिळविणे बंधनकारक ठरविले. १९८० नंतरच्या दशकातील नव्या जागतिक माहिती व संज्ञापन-व्यवस्थेविषयीच्या आवेशपूर्ण चर्चेमुळे युनेस्कोने ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर अॅडव्हान्स स्टडिज इन जरनॅलिझम इन लॅटिन अमेरिका’ (सीआय्इएसपीएएल्) या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शेतीविषयक संघटनांच्या मुळेही वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाला खूप साहाय्य झाले. शेतीतील आधुनिकतेचे तंत्र व संशोधन शेतकर्यांतपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांचा उपयोग अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कसा करता येईल याचे संशोधन त्या संघटना करत असतात. वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी लॅटिन अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रे साहाय्य करतात.
                    
संदर्भ : 1. Astbury, A. K. Freelance Journalism, London, 1963.
            2. Careers Institute, Journalism as a Career, New Delhi, 1951.
            3. Dodge, John, Ed. The Practice of Journalism, London, 1963.
            4. Sengupta, B. Journalism as a Career, Culcutta, 1955.
            5. Williams, Francis, Journalism as a Career, London, 1962.
            ६. अकलूजकर, प्रसन्नकुमार, वृत्तपत्रविद्या, पुणे, २०००.
            ७. केळकर, न. चिं. संपा. केळकर, का.न. वृत्तपत्रमीमांसा, पुणे, १९६५.
                         
परांजपे, प्र. ना

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...