Thursday 5 September 2013

जाहिरातींची माध्यमे

जाहिरातींची माध्यमे : वृत्तपत्रे, मासिके, विशिष्ट नियतकालिके, बहि:स्थल जाहिरात (उदा., भित्तीपत्रे, प्रसिद्धिफलक, दुकानांच्या पाट्या, विजेच्या पाट्या इ.), परिवहन जाहिरात, प्रसिद्धिपट, सरकचित्रे, (सिनेमा स्लाईड), आकाशवाणी, दूरचित्रवाणी, प्रदर्शने व प्रात्यक्षिके, गवाक्षशोमन (विंडो डिस्प्ले), विक्री-केंद्र जाहिरात, टपाली जाहिरात, छापील माध्यमे (उदा., हस्तपत्रके, पुस्तिका, घडीपत्रिका, सूचिपत्रे इ. ), ग्रामीण भागासाठी माध्यमे (उदा., खास चित्रपट, प्रदर्शने व प्रात्यक्षिके, नभोवाणी, दूरचित्रवाणी, भित्रीपत्रके, दवंडी, हस्तपत्रके, वस्तूंचे नमुने) इ. जाहिरातींची माध्यमे रूढ आहेत. त्यांपैकी काहींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होत:

वृत्तपत्रे : भारतात एकूण लोकसंख्येच्या सु. ६ ते ७ टक्के लोक वृत्तपत्रे वाचतात असा अंदाज आहे. दर ५० ते ६० लोकांमध्ये एक वृत्तपत्र असे प्रमाण पडते. म्हणजे ह्या माध्यमाची व्यापकता कमी आहे. तरीही भारतात वृत्तप्रसाराच्या दृष्टीने हे माध्यम अत्यंत महत्त्वाचे गणले जाते. समाजातील मतप्रवर्तक लोक वृत्तपत्रांचे वाचक असून त्यातील संदेश ते वृत्तपत्रे न वाचण्यांपर्यत पोचवतात. जाहिरातींच्या दृष्टीने वृत्तपत्रांचे फायदे अनेक आहेत : उदा., तातडीचे वातावरण, विश्वसनीय भावनांची निर्मिती, योग्य वेळी वा वक्तशीर संदेश, वृत्तशील जाहिराती, इत्यादी. तसेच वृत्तपत्रांच्या प्रत्यक्षातील खपाच्या दोन ते साडेतीन पट त्यांचा प्रत्यक्ष वाचकवर्ग असतो. तथापि एक जाहिरात-माध्यम म्हणून वृत्तपत्रांचे काही तोटेही आहेत. उदा., त्यांत रंग वापरता येत नाही. शिवाय तांत्रिक मर्यादांमुळे त्यांतील जाहिरातींची छपाई उत्कृष्ट होऊ शकत नाही. बहुसंख्य वाचकांना संपूर्ण वृत्तपत्र वाचण्यास उसंत नसते

वृत्तपत्रात लक्ष वेधून घेण्यासाठी बातम्या वा जाहिरातींशी, मोठ्या जाहिराती या छोट्या जाहिरातींशी व स्पर्धक मालाच्या जाहिराती एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. तसेच वृत्तपत्राचा ताजेपणा हा त्याचा जसा फायदा तसा तोटाही ठरतो; कारण वृत्तपत्रांचे आयुष्य एका दिवसाचेच असते. त्यामुळे एका वाचकाने जर एक दिवस वृत्तपत्र वाचले नाही, तर त्यातील एखादी जाहिरात त्याला परत न दिसण्याची शक्यता आहे.

मासिके व नियतकालिके : ह्या माध्यमाचे आयुष्य वृत्तपत्रापेक्षा निश्चितच अधिक असते. म्हणूनच वृत्तपत्राच्या एका प्रतीच्या वाचकांपेक्षा मासिकाच्या एका प्रतीचे वाचक अधिक असतात. वृत्तपत्र घाईत वाचले जाते, तर मासिके फुरसतीच्या वेळात वाचले जाते. म्हणून मासिकातील जाहिरातीत अधिक मजकूर समाविष्ट करणे शक्य होते. भारतात वृत्तपत्रापेक्षा मासिके, विशेषत: प्रादेशिक भाषांतील मासिके अधिक प्रमाणात छापली व वाचली जातात. मासिकांचे प्रकारही अनेक आहेत. समाजातील भिन्न स्तरांमध्ये त्यांचा वाचकवर्ग पसरला आहे. तसेच स्त्रिया वृत्तपत्रांपेक्षा मासिकेच जास्त वाचतात.

रंगीत जाहिराती हे काही मासिकांचे वैशिष्ट्य असले, तरीही बहुसंख्य मासिकांत रंगीत छपाईचा दर्जा सामान्य असतो. कित्येक मासिकांत तर साधी छपाईसुद्धा सुवक नसते आणि त्यांच्या मर्यादा तांत्रिक स्वरूपाच्या असतात. अनेक मासिकांचा खप अल्पप्रमाणात असल्याने त्यांतील जाहिरातींचे दर इतर माध्यमांच्या तुलनेने अधिक वाटतात.


व्यावसायिक नियतकालिके : विशिष्ट धंदा, उद्योग वा व्यवसाय ह्यांना वाहून घेतलेल्या नियतकालिकांचा वाचकवर्ग विशिष्ट असतो व तो फारच अल्प ठरतो. वाचकवर्गाचा निश्चित गट व जाहिरातीची रंगीत छपाई असे महत्त्वाचे फायदे ह्या माध्यमातून लाभतात. ह्या माध्यमाचे तोटे म्हणजे कमी प्रसार व त्यामुळे एका प्रतीस अधिक किंमत. त्यांचे वर्गणीदारही अनेक असतात; परंतु ते नियतकालिके वाचतातच असे नक्की सांगता येणे कठीण असते. जाणकार व तज्ञ ह्यांना संपादनासाठी वेळ मिळत नसल्याने अशा नियतकालिकांचा संपादकीय दर्जा पुष्कळदा सामान्य असतो. भारतात जगातील विकसित राष्ट्रांच्या मानाने, अशी नियतकालिके व त्यांचा वाचक वर्ग अल्प प्रमाणात आहे.

बहि: स्थल जाहिरात : सहजपणे लक्ष वेधून घेणारे हे एक माध्यम आहे. बहि:स्थल जाहिरातीत विविध रंग व त्यांच्या अनेक छटा वापरता येतात. भित्तिपत्रके व प्रसिद्धिफलक ह्यांच्या प्रदर्शनाच्या जागांचे पूर्वनियोजन व प्रसारक्षेत्राची व्याप्ती निवडीनुसार करता येते. एखाद्या शहरातील मोक्याच्या जागांवर बहि:स्थल जाहिराती केल्या असता घराबाहेर पडणाऱ्या जवळजवळ सर्व लोकांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचू शकतो, पण या जाहिराती एकाच जागी स्थिर असतात. परिवहन किंवा फिरत्या जाहिराती, उदा., बसमधील जाहिराती, मात्र भिन्न ठिकाणच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

बहि:स्थल जाहिरात ही सामान्यत: दुय्यम माध्यम गणले जाते. ते महत्त्वाचे स्मरणवजा माध्यम आहे, म्हणून त्यातील संदेश त्रोटक व अधिक चित्रमय असावा लागतो. त्यांत लांबलचक वर्णने असल्यास ती नीट वाचली जात नाहीत. म्हणून जेव्हा जाहिरात स्मरणवजा राखण्याचा उद्देश असतो, तेव्हा हे माध्यम प्राथमिक स्वरूपात वापरतात. नवसाक्षरांसाठीही हे माध्यम परिणामकारक ठरते. सामान्यपणे एकच एक व सुबोध कल्पना एका बहि:स्थल जाहिरातीत असावी लागते.

चित्रपट : दृक्-श्राव्य असे हे माध्यम असल्याने ह्यातून वास्तवादी व हुबेहूब चित्रण होऊ शकते. म्हणूनच हे माध्यम निरक्षरांसाठीसुद्धा परिणामकारक ठरते. ह्या माध्यमातून स्वाभाविक हालचाल, रंग व संगीताद्वारे योग्य मन:स्थिती व वातावरणनिर्मिती इ. गोष्टी साधल्या जातात. शिवाय चित्रपटगृहातील बंदिस्त प्रेक्षकवर्गाची मन:स्थिती तेथील वातावरणामुळे जाहिरातीमधील संदेश ग्रहन करण्यास अनुकूल बनलेली असते.

भित्तिपत्राप्रमाणेच चित्रपटगृहाची निवड प्रसाराच्या उद्देशानुसार करता येते व प्रसाराचा अपव्यय टाळता येतो. असा अपव्यय वृत्तपत्रे आणि नमोवाणी यांवरील राष्ट्रव्यापी जाहिरांतींच्या बाबतीत टाळता येणे कठीण असते. कारण त्यांच्याव्पकत्वेर जाहिरातदाराचा ताबा नसतो. तुलनात्मक द्दष्टया प्रसिद्धिपटांचे स्वरूप टिकाऊ असते, परंतु वृत्तपत्रांतील जाहिरातींचे स्वरूप असे नसते. भित्तीपंत्राचा रंग थोड्याच दिवसांतउडतो व त्याचे इतर नुकसानही होऊ शकते, परंतु एकच प्रसिद्धिपट वर्षानुवर्षे दाकवता येणे शक्य असते. भारतात एक मिनिट चालणारे विशेषत: रंगीत जाहिरातपट चित्रपटगृहातून दाखविले जातात. जाहिरातीची राष्ट्रव्यापी मोहीम करण्यास हे माध्य इतर माध्यमांपेक्षा स्वस्तच पडते.

सरकचित्रे (स्लाइड्‌स) : बहिःस्थल जाहिरातीप्रमाणे हे माध्यमही एक उत्तम स्मरणवजा माध्यम आहे. सरकचित्रे चित्रपटगृहात चित्रपटापूर्वी आणि मध्यंतरानंतर अशा दोन वेळी दाखविली जातात. ह्या माध्यमालाही बंदिस्त प्रेक्षकवर्ग उपलब्ध असतो. ह्या माध्यमात अनेक रंग वापरण्यास वाव असतो. काही सरकचित्रांमध्ये क्लृतिपूर्वक हाल चालींचा आभासही निर्माण करता येतो. लागोपाठ एकाहून अधिक सरकचित्रांद्वारे संदेश देऊन प्रेक्षकांची उत्कंठा चाळवता येते. हे स्वस्त असे माध्यम आहे. स्थानिक व्यापारी उत्पादक इत्यादींना या माध्यमाचा विशेष लाभ घेता येतो. हे स्मरणवजा माध्यम असल्यामुळे एक सरकचित्र सात ते दहा सेकंदांपर्यंतच दाखविले जाते. त्यामुळे ह्यातील संदेशाच्या मजकुरास मर्यादा असते. शिवाय एकापाठोपाठ एक अशी अनेक सरकचित्रे चित्रपटगृहात दाखविण्यात येत असल्यामुळे अमुकच सरकचित्र संस्मरणीय होईल, असे निश्चितीने सांगता येणे शक्य नसते.

नभोवाणी : या माध्यमाचे वैशिष्ट्ये असे आहे, की त्यातील विज्ञापने एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोचतात. तरीही त्यात ध्वनिक्षेपकांचे व श्रोत्यांचे जवळचे संबंध निर्माण होतात. एखाद्या संभाषणात भाग घेतल्याप्रमाणे निवेदक श्रोत्यांशी बोलतो; त्यामुळे तो फक्त आपल्याशीच खाजगी संभाषण करीत आहे, अशी भावना श्रोत्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते व संदेश सूचनक्षम बनतो. त्यामुळेच सर्व माध्यमांपेक्षा ह्या माध्यमात पत्रोत्तररूपी आदनप्रदान अधिक असते.

सामान्यत: रेडिओ श्रोत्यांच्या घरातच असतो व त्याला आपल्या इच्छेनुसार त्याचा वापर करता येतो. ट्रांझिस्टर तर कोठेही बरोबर नेता येतो. नभोवाणी हे फक्त श्राव्य माध्यम असल्यामुळे वेगवेगळ्या आवाजांनी, संगीताने व शब्दांनी श्रोत्यांच्या मनात ध्वनिप्रतिमा निर्माण करता येते. नभोवाणीचे हे माध्यम साक्षरांना तसेच निरक्षरांनादेखील आकलन होऊ शकते. हे माध्यम चित्रपट वा दूरचित्रवाणी यांच्या तुलनेने स्वस्त पडते. नभोवाणीवरील विचारप्रसाराला वेळेची, हवामानाची व इतर भौगोलिक अडचणींची कसलीच आडकाठी नसते. चित्रपट सर्वच ठिकाणी दाखविता येत नाही. दूरचित्रवाणी ही खर्चाची बाब आहे. नभोवाणीचे माध्यम या दृष्टीने अधिक व्यापक व कमी खर्चाचे असते. शिवाय गृहिणी व मुले इतर माध्यमांपेक्षा ह्या माध्यामाच्या कक्षेत अधिक येतात. ज्यांना इतर माध्यमांतून संदेश पाचू शकत नाही, त्यांच्यासाठी हे माध्यम उपयुक्त आहे. संदेशाची पुनरावृत्तीही रेडिओवरून होऊ शकते.

ह्या माध्यमाचा मर्यादा म्हणजे संदेश अत्यंत संक्षिप्त असावा लागतो. शिवाय निव्वळ आवाजानेच उत्कृष्ट विचारप्रसार करावयाचा असल्याने त्यात निवेदकाचे कौशल्य पणास लागते. शिवाय सामान्य श्रोतृवर्गाच्या आवडीनिवडीचे समाधान करण्यामुळेही कार्यक्रमांचा दर्जा कमी होतो.

दूरचित्रवाणी :
हे माध्यम चित्रपटाप्रमाणेच दृक्-श्राव्य आहे. शिवाय नभोवाणीप्रमाणे घराघरांतून विचारप्रसार करते. नभोवाणी व चित्रपट ह्या दोन्हीपेक्षा अधिक विविध प्रकारे कार्यक्रम प्रसृत करण्याची लवचिकता दूरचित्रवाणीत आहे. ह्यातील वातावरण नभोवाणीसारखे प्रेक्षकांशी जवळचा संबंध प्रस्थापित करण्यास अनुकूल आहे, कारण ह्यातील निवेदकाला प्रेक्षक बघूही शकतात. ज्यांच्या घरी दूरचित्रवाणी आहे, असा प्रेक्षकवर्ग प्रथमदर्शनी तरी बऱ्याचशा वस्तूंचे वा सेवेचे संभाव्य ग्राहक आहे, असा कयास बांधणे चुकीचे ठरणार नाही.

भारतात दूरचित्रवाणीवर जाहिरातीची अल्पशी सुरुवात झाली आहे. दूरचित्रवाणीवरील जाहिरात ही इतरमाध्यमांतील जाहिरातींच्या तुलनेने अधिक महाग असते. त्यावरील कार्यक्रमाचा खर्च अधिक असल्याने पुरस्कृत कार्यक्रम चांगल्या दर्जाचे होऊ शकतात. ह्या माध्यमाचे तोटे म्हणजे चित्रपटाच्या तुलनेने दूरचित्रवाणीचा पडदा लहान असतो व त्या प्रमाणात त्याचा परिणामही कमी होतो. रंगीत दूरचित्रवाणी ही अत्यंत खर्चाची बाब आहे. हे माध्यम घरातच असल्यामुळे चित्रपट गृहाप्रमाणे प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होत नाही. त्याचप्रमाणे अधिकअधिक प्रेक्षकवर्ग असण्याच्या वेळा सर्वच जाहिरातदारांना मिळू शकत नाही.

प्रदर्शने व प्रात्यक्षिके : निवडक प्रेक्षकांना गृहीत धरणारे हे माध्यम इतर माध्यमांपेक्षा महाग ठरते; परंतु प्रेक्षकांपैकी जास्तीत जास्त व्यक्ती संभाव्य ग्राहक असतील, तर हे माध्यम अत्यंत उपयुक्त ठरते. उदा., खास अभ्यागत प्रेक्षकांसाठी आयोजित केलेले चित्रपट व अनुबोधपट.

प्रदर्शनांचे तीन प्रकार आहेत : (१) विशेषत: निर्यात धंद्याची आंतरराष्ट्रीय प्रदर्शने; (२) औद्योगिक प्रदर्शने उदा., कृषिविषयक प्रदर्शने, यांत केवळ देखावे पाहण्यास वाव नसतो व (३) लोकप्रिय प्रदर्शने. ही बहुजनांसाठी असतात आणि आनुषंगिक रीत्या धंदेवाईकांसाठी असू शकतात. अशा प्रदर्शनांत राष्ट्रीय समस्यांसंबंधी विचारप्रसार करण्याची उत्तम संधी मिळते. संभाव्य ग्राहकांना वस्तू दाखविण्याचा वा तिचा नमुना देण्याचा फायदा ह्या माध्यमातून मिळतो. ह्या माध्यामाचा वापर इतर माध्यमे परिणामकारक होत नसतील तेव्हाच सामान्यपणे केला जातो. इकडून तिकडे हलविण्यास कठीण असणारी एखादी वस्तू वा उत्पादन तसेच नवीन उपकरणे व यंत्रे इत्यादींची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती ह्या माध्यमांतून दिली जाते.

गवाक्षशोभन (विंडो डिस्प्ले) : ह्या माध्यमात वस्तू वा विक्रीसंदेश सुयोग्य पार्श्वभूमीवर एका दर्शनिकेत मांडला जातो. अशा दर्शनिका केवळ दुकानातच नव्हे, तर रेल्वे वा बसस्थानकांवर, मोठ्या उपाहारगृहात, पथिकाश्रमांत व इतर सार्वजनिक स्थळी उभारण्यात येतात. अशा दर्शनिका विवृत्त्यांचा हेतू म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य माणसाचे लक्ष वेधून घेणे, हा असतो. अशी दर्शनिका विवृत्ती ठसठशीत, संदेशप्रचुर व उठावदार असावी लागते. ह्या माध्यमाद्वारे जाहिरातदाराचा संदेश विचारप्रवर्तक व सौंदर्यपूर्ण होऊ शकतो. हे माध्यम जाहिरातीची मोहिम व दुकानातून वस्तूची केलेली अंतिम खरेदी ह्यांमधील एक महत्त्वाचा दुवा आहे. वृत्तपत्रीय जाहिरातीने वस्तूबद्दल जिज्ञासा जागृत करता येते, तर ह्या माध्यमाद्वारे प्रत्यक्ष विक्रीचे उद्दिष्ट साध्य करता येते. प्रदर्शने व गवाक्षशोभन ही एकाच वर्गातील पण वेगळी माध्यमे होत. त्यांच्या उभारणीत विक्रीकला, प्रदर्शकौशल्य, शब्दांकन, छायाचित्रणकला, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र, विद्युत् अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, मुद्रणकला, मुद्राक्षररचना, सुतारकाम इ. कलाविद्यांचा उपयोग होतो, कारण इतर माध्यमांहून एक वेगळाच घटक त्यांत असतो व तो म्हणजे तिसरी मिती. शिवाय ह्या दोन्ही माध्यमांच्या यशाचे कारण म्हणजे सर्वसामान्य माणूस तोंडी अथवा लेखी शब्दांपेक्षा दृक्‌प्रतिमांचे ग्रहण त्वरित व परिणामकारक रीत्या करतो, हे आहे.
ह्या माध्यमांवरील खर्चाचे प्रमाण त्यांच्या प्रेक्षकांच्या प्रमाणात असले पाहिजे. नाहीतर ही माध्यमे महाग पडतात. प्रक्षेकांत संभाव्य ग्राहकांचे प्रमाणदेखील अधिक हवे. ते साध्य करण्यासाठी दर्शनिका हमरस्यावर व मोक्याच्या जागी असाव्या लागतात. पुष्कळदा सुशोभनाच्या आहारी जाऊन विक्रीचा मूळ मुद्दा डावलला जातो. काही दिवसांनंतर दर्शनिकांची मांडणी बदलावी लागते, नाहीतर तेच दृश्य पुन्हा पुन्हा पाहून प्रेक्षकांत अंधबिंदू (ब्लाइड स्पॉट) निर्माण होण्याची शक्यता असते. हा तोटा इतर माध्यमांनाही लागू आहे. उदा., प्रसिद्धिपट, प्रसिद्धिफलक, भित्तिचित्रे. वृत्तपत्रीय जाहिराती इत्यादी.


विक्रीकेंद्र जाहिरात : माध्यमाद्वारे प्रत्यक्ष विक्रीच्या ठिकाणीच वस्तूची जाहिरात केली जाते. ह्या माध्यमाची कार्ये म्हणजे ग्राहकाचे लक्ष आकर्षून घेणे, संस्मरण, नवीन वस्तूंची ओळख करून देणे व विक्री होऊ शकेल अशा जागी व समयी विक्रीशील प्रलोभनांनी संभाव्य ग्राहकांस खरेदीस उद्युक्त करणे. ह्या माध्यमात इतर सर्व माध्यमांतील संदेश आणि चित्रे एकत्रित करून विक्रीचे अंतिम विधान संभाव्य ग्राहकांसमोर मांडण्यात येते. विक्रीकेंद्र जाहिरात हा विपणनमालिकेतील खरेदीचा महत्त्वाचा उपान्त्य दुवा आहे. दुकानात पूर्वनियोजित खरेदी करण्यास अलेला ग्राहक ह्या माध्यमांमुळे नव्या वस्तूची उत्स्फूर्त खरेदी करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. अशा उत्स्फूर्त खरेदीचा संपूर्ण विक्रीच्या व्याप्तीत मोठा वाटा असतो व ती आकर्षक आवेष्टन आणि विक्रीकेंद्रजाहिरात यांमुळेंच होते. ह्या माध्यमाचे अनेक प्रकार आहेत व त्यास तांत्रिक मर्यादा नसतात.
ह्या माध्यमाचा फार मोठा गैरफायदा म्हणजे एकाच दुकानदाराकडे अनेक जाहिराती वेगवेगळे उत्पादक पाठवतात हा आहे. त्यांतील सर्वच जाहिराती तो वापरू शकत नाही. विक्रीकेंद्र जाहिरातीची निर्मिती करण्यापुर्वी दुकानदारास तीपासून अडचण व त्रास होणार नाही, ह्याची दक्षता घ्यावी लागते. नाहीतर, ती प्रदर्शित करण्यास तो तयार होत नाही.

टपाली जाहिरात : वाचकांची निवड करणारे हे माध्यम वैयक्तिक व बहुजन माध्यम ह्यांचे एकत्रीकरण होय. कारण प्रत्येक वाचकापर्यंत ते स्वतंत्रपणे पोहचते तसेच जाहिरातदाराच्या मोहिम-योजनेनुसार ते अनेक वाचकांनाही एकाच वेळी मिळते. ज्या व्यक्तींना वा संस्थांना उद्देशून संदेश पाठवायचा असतो त्यांची निवड करून यादी करावी लागते. या माध्यमामुळे असंभाव्य ग्राहकांवर होणारा अनाठायी खर्च टाळता येतो. शिवाय बहुजन माध्यमात नसणारा वैयक्तिकतेचा भाव या माध्यमात असतो. या माध्यमाचे एक लोकप्रिय उदाहरण म्हणजे वैद्यकीय तज्ञांना पाठविण्यात येणाऱ्या औषध-कंपन्यांच्या टपाली जाहिराती व माध्यमाचा खर्च म्हणजे पत्रकछपाईचा व टपालाचा.बहुजन माध्यमापेक्षा कितीतरी पटींनी हे माध्यम महाग पडते, परंतु संभाव्य ग्राहकांकडे निवडीनुसार निश्चित पोच हा याचा फायदा व्यापक असतो. ज्या उत्पादकांचे ग्राहक मर्यादित आहेत. त्यांना टपाली जाहिराती अधिक किफायदेशीर ठरतात. उदा., औद्योगिक यंत्रसामग्री व विशिष्ट सेवा यांच्या जाहिराती. ह्या माध्यमाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे समयोचिताना. त्यामुळे योग्य वेळी निश्चित संदेश ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. ह्यांतील संदेशाचा मजकूर, रंगसंगती, छपाईचा कागद इत्यादींच्या तांत्रिक मर्यादा नसतात.

छापील माध्यमे : ह्यांचे अनेक प्रकार असतात. बहुजन माध्यमांद्वारे देण्यात येणारा संदेश विस्तृत शकत नाही, तो या माध्यमांतून देता येतो. उदा., एखाद्या वृत्तपत्रीय जाहिरातीत, अधिक माहितीसाठी सोबतचे माहितीपत्र भरून पाठवा आणि पुस्तिका मागवा असा संदेश असतो. अनेक औद्योगिक कारखाने आपल्या मालाच्या विक्रीसाठी सूचिपत्रे तयार करतात. रस्त्यावर एखादी वस्तू वा कार्यक्रमाची हस्तपत्रके वाटतात. किरकोळ वाटणाऱ्या ह्या माध्यमात विक्री वाढविण्याचे मोठे सामर्थ्य आहे. अनेकदा ह्या माध्यमाला टपाली जाहिरातीची जोड देतात. टपाली जाहिरातीप्रमाणेच ह्या माध्यमालाही तांत्रिक मर्यादा नाहीत. या माध्यमाची पोच मात्र संभाव्य ग्राहकापर्यंत झाली पाहिजे. नाहीतर खर्चाचा अपव्यय होण्याचा संभव असतो.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...