Friday 11 October 2013

छायाचित्रणकला भाग 2

छायाचित्राची चिकित्सा

कलात्मक दृष्टीने छायाचित्राची चिकित्सा करण्यासाठी काही स्थूल निकष विचारात घेतले जातात, ते पुढीलप्रमाणे : (१) छायाचित्रविषयाची स्वतंत्रता, (२) छायाचित्रविषयाची एकूण मांडणी, (३) छायाचित्राचा मुद्रणदर्जा, (४) छायाचित्रातील त्रिमितीय आभासनिर्मिती, (५) छायाचित्रातील पट्टी (की ऑफ द पिक्चर), (६) छायाचित्रातील किरणकेंद्रीकरण, (७) छायाचित्राचे अंतिम संस्करण व
(८) पोत-अभिसाधन.

(१) छायाचित्रविषयाची स्वतंत्रता : छायाचित्राचा विषय स्वतंत्र असावा; म्हणजे छायाचित्रातील वस्तू वा व्यक्ती जरी जुन्या किंवा परिचित असतील, तरी त्यांचे चित्रण नव्या अर्थाचे सूचक ठरावे. याचा अर्थ कोणत्याही विषयाच्या चित्रात अभिनव आशय निर्माण करणारी स्वतंत्र कलादृष्टी असावी लागते.

(२) छायाचित्रविषयाची एकूण मांडणी : छायाचित्रातील सर्व घटक परस्परांशी सुसंगत ठेवणे आवश्यक असते. चित्रकाराप्रमाणे छायाचित्रकाराला संकल्पित चित्रातील अनावश्यक भाग गाळणे किंवा आवश्यक भागाची भर घालणे नेहमीच शक्य नसते. यासाठी कॅमेऱ्याचा कोन बदलून अथवा वस्तूंची सुयोग्य मांडणी जमून येईपर्यंत थांबून छायाचित्रण करावे लागते. छायाचित्रातील विशिष्ट घटकांना उठाव देण्यासाठी आणि दुय्यम गोष्टी त्यांना पूरक राखण्यासाठी चित्रविषयाचे आकारमान व स्थान विचारात घेऊन छटा, प्रकाशयोजना व रेखीव किरणकेंद्रीकरण यांचा योग्य उपयोग करावा लागतो. साध्या छायाचित्रात काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी वस्तू किंवा पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळी वस्तू असल्यास छायाचित्रास योग्य तो उठाव येतो; परंतु जेथे चित्रातील सगळेच घटक जवळजवळ सारख्याच छटांचे असतील, तेथे छायाचित्राला उठाव आणण्यासाठी पूर्णकेंद्रीकरण उपयुक्त ठरते.

कॅमेरा ज्या अंतरावर केंद्रित करण्यात येतो, त्या अंतरावरील वस्तूंचेच पूर्णकेंद्रित प्रतिबिंब पडते. बाकीच्या वस्तूंची प्रतिबिंबे थोड्याफार प्रमाणात अपकेंद्रित असतात. त्यामुळे कॅमेऱ्याच्या भिंगासमोरील छिद्रपटल (डायफ्राम) लहान केल्यास सुकेंद्र-विस्तार (डेप्थ ऑफ फील्ड) वाढतो व छिद्रपटल मोठे केल्यास तो कमी होतो. उठावासाठी विशिष्ट प्रकाशयोजनाही उपयुक्त ठरते. वस्तूंवरील प्रकाश नैसर्गिक असेल, तर योग्य दिशेला जाऊन किंवा वस्तू सरकविण्याजोगी असेल, तर ती थोडी फिरवून किंवा योग्य दिशेने प्रकाश येण्याची वाट पाहून चित्रण साधावे लागते. छटांचा कमीजास्तपणा परावर्तकांच्या साहाय्यानेही करता येतो. प्रकाशयोजना कृत्रिम असेल, तर परावर्तकाचा योग्य उपयोग होतो. छायाचित्रात ज्या वस्तूने जास्त जागा व्यापली असेल तिला महत्त्व प्राप्त होते. वस्तू जसजशी कॅमेऱ्याच्या जवळ येते, तसतसा तिचा छायाचित्रातील आकार वाढत जातो. गाई हाकणारा गुराखी पुढे असून गाय त्याच्या मागून येत असेल, तर छायाचित्रात गुराख्याला महत्त्व येईल. जर गाय पुढे असेल, तर तिला महत्त्व येईल आणि ती दोघे कॅमेऱ्याच्या जवळ असतील, तर गुराख्याच्या मानाने गाय खूपच मोठी दिसेल, परंतु त्या दोघांपासून कॅमेरा बऱ्याच अंतरावर नेला, तर गाय पुढे असूनही प्रमाणाबाहेर मोठी दिसणार नाही. म्हणून वस्तुवस्तूंमधील अंतर कमीजास्त करून व त्या वस्तूंचे कॅमेऱ्यापासूनचे अंतर कमीअधिक करून छायाचित्रात प्रमाणबद्धता राखता येते. यासाठी निरनिराळ्या केंद्रांतरांची भिंगेही वापरता येतात.

छायाचित्रात विशिष्ट घटकास प्राधान्य द्यावयाचे असेल, तर ते कसे साधावे, याबद्दल काही आडाखे आहेत. त्यांतील काही असे : (अ) दोन उभ्या व दोन आडव्या रेषा काढून चित्रचौकटीचे नऊ सारखे भाग केले, तर त्यांपैकी प्रत्येक दोन रेषा ज्या ठिकाणी एकमेकींस छेदतात, असे चार बिंदू मिळतात. त्यांपैकी प्रत्येक बिंदू छायाचित्रातील महत्त्वबिंदू होय. ज्या घटकाला प्राधान्य द्यावयाचे असेल, तो यांपैकी एका बिंदूजवळ असावा व इतर कोणतेही घटक बाकीच्या तिन्ही बिंदूंपासून वेगळे असावेत; (आ) चित्रचौकटीचा गुरुत्वमध्याशी म्हणजेच जेथे दोन्ही विकर्ण एकमेकांस छेदतात तेथे कोणताही घटक असू नये. तसे झाल्यास त्या घटकांवरच दृष्टी खिळून राहते व चित्र निर्जीव भासते. या बिंदूला मृतकेंद्र (डेड सेंटर) असेच नाव दिले जाते; (इ) छायाचित्रात पुरोभूमी व पार्श्वभूमी विभक्त करणारी रेषा चित्रचौकटीच्या बरोबर मध्यावर येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. निसर्गदृश्यात क्षितिज ही अशीच एक रेषा असते. क्षितिजरेषेने छायाचित्राचे दोन सारखे भाग होत असतील, तर लक्ष द्विधा होते म्हणून ही क्षितिजरेषा चित्राचे सारखे दोन भाग करणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. ती चित्रचौकटीच्या पायारेषेशी समांतर असावी लागते; (ई) छायाचित्रात महत्त्वाच्या घटकांचे संतुलन राखावे लागते. त्यामुळे छायाचित्राला स्थैर्य प्राप्त होते. सारख्याच आकाराच्या वस्तू छायाचित्रांच्या मध्यापासून सारख्याच अंतरावर असतील, तर तराजूच्या पारड्याप्रमाणेच समतोल साधतो; परंतु त्यात जोर नसतो. एखादी जवळची मोठी वस्तू, चित्रमध्यापासून विरुद्ध बाजूला जास्त अंतरावर ठेवलेल्या लहान वस्तूबरोबर संतुलन साधते व चित्र अधिक उठावदार दिसते; (उ) छायाचित्रणात एखादी गतिमान वस्तू ज्या दिशेला जात असेल, त्या दिशेला जास्त जागा सोडावी लागते. तसेच एखादी खाली पडणारी वस्तू असेल किंवा उडी मारणारा प्राणी वा व्यक्ती असेल, तर ती वस्तू किंवा प्राणी ज्या जागेवर उतरणार असेल, ती जागा छायाचित्रात असावी लागते; (ऊ) छायाचित्रात अनावश्यक घटकांपासून महत्त्वाचा भाग अलग केल्यास त्याकडे ताबडतोब लक्ष खेचले जाते. उदा., फुलांची छायाचित्रे आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतात. त्यासाठी फुलांच्या शक्य तेवढ्या जवळ जाऊन खालच्या पातळीवरून छायाचित्र घेता येते किंवा साध्या पडद्याची योग्य ती कृत्रिम पार्श्वभूमी वापरूनही मूळच्या उपद्रवकारक पार्श्वभूमीपासून त्यास दूर करता येते;

(ए) छायाचित्र कळण्यास सोपे असावे. त्यात मुख्य आकर्षणबिंदू एकच असावा व तो योग्य ठिकाणी असावा. छायाचित्रात फक्त त्यास पूरक ठरणारे घटकच असावेत. त्यामुळेच चित्रात साधेपणा साधता येतो;

(ऐ) छायाचित्रात एकात्मता आणण्यासाठी त्यातील सर्व घटकांत अर्थपूर्ण परस्पर संबंध असावा. उभ्या किंवा आडव्या रेषेत घटक तोडले जाऊ नयेत; (ओ) छायाचित्र योग्य क्षणी टिपलेले असावे. व्यक्तींचे, वस्तूंचे किंवा देखाव्याचे नेमके वैशिष्ट्य प्रकट होईल, अशा त्याच्या अवस्था टिपणे महत्त्वाचे असते. या नेमक्या क्षणाचे कलादृष्टीने फार महत्त्व असते. मांडणीचे हे सर्व आडाखे काटेकोरपणे पाळले जातातच, असे नाही; पण त्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तशा छायाचित्रांत काहीतरी उणिवा निर्माण होतात.


(३) छायाचित्राचा मुद्रणदर्जा : मूळ वस्तूचे जेवढे भाग प्रकाशित असतात तेवढे ते छायाचित्रात कधीही येत नाहीत. झगझगीत सूर्य आणि छायेमध्ये आलेला काळ्या दगडावरील भाग एकाच वेळी छायाचित्रात दाखविणे अशक्य असते. रंगीत छायाचित्रात सूर्याच्या दीप्तीचा थोडाफार आभास रंगाच्या वापराने निर्माण करता येतो. छायाप्रकाशाचे लहान प्रमाण घेऊन मुळातील प्रकाशमूल्ये त्याच प्रमाणात छायाचित्रात आणणे, ही एक कला आहे. डोळा हे एक अतिशय संवेदनक्षम इंद्रिय आहे. तो एकाच वेळी स्वच्छ उन्हामधील पांढरे पदार्थ व त्यांवरील सूक्ष्म छटा आणि सावलीतील काळ्या पदार्थांवरील सूक्ष्म छटा पाहू शकतो. हे कॅमेऱ्याच्या भिंगाला साधत नाही. तरीही तंत्रज्ञान वापरून छायाचित्रण हे सत्याभासाच्या जेवढे जवळ जाईल, तेवढा मुद्रणदर्जा चांगला ठरतो. म्हशीच्या पाठीवर ऊन पडले असता घेतलेल्या छायाचित्रात उन्हातील भाग पांढरे येतात. ते पांढरे न वाटता तो पांढरा आभास प्रकाशाचे परावर्तन आहे व त्याखाली म्हशीचा रंग काळाच आहे, असे ज्या छायाचित्रात भासेल त्याचा दर्जा उच्च ठरतो. छायाचित्राचे सर्व भाग समप्रमाणात उमटलेले असावे, त्यावर कसलेही डाग असू नयेत, याची काळजी घ्यावी लागते.

(४) छायाचित्रातील त्रिमितीय आभासनिर्मिती : छायाचित्राचे बरेचसे विषय त्रिमितीय असल्याने, त्यांची छायाचित्रे त्रिमिती भासावीत हे क्रमप्राप्तच आहे. द्विमिती कागदावर त्रिमितीचा आभास उत्पन्न करताना पुढील आडाखे उपयुक्त ठरतात : (अ) निमुळत्या समांतर रेषा : समोरच्या दिशेने समांतर जाणारे आगगाडीचे रूळ निमुळते दिसतात. छायाचित्रांतही अशा निमुळत्या रस्त्यांमुळे चित्रे त्रिमितीय वाटतात; (आ) आडव्या समांतर रेषा : विस्तीर्ण पटांगणात सारख्या अंतरावर काढलेल्या आडव्या रेषांकडे पाहिल्यास जवळच्या भागात त्या दूर दूर वाटतात; परंतु लांब अंतरावर त्या जवळजवळ वाटतात. छायाचित्रात याचाही त्रिमितीय आभासासाठी उपयोग करण्यात येतो. समुद्रावरील लाटा असा आभास निर्माण करतात; (इ) मावळत्या छटा : एकामागे एक आलेल्या डोंगरांच्या ओळींचे छायाचित्र घेतल्यास अगदी जवळचे डोंगर येतात. डोंगराच्या दूरवरच्या ओळी क्रमाने फिकट होत जातात आणि शेवटच्या तर करड्या बनून आकाशाच्या पार्श्वभूमीत लुप्त होतात. अशा छटाभिन्नत्वामुळे आलेला त्रिमितीय आभास उच्च दर्जाचा असतो; (ई) पडछाया : वस्तूच्या मागील बाजूस सूर्य अथवा दिवे असल्यास त्या वस्तूच्या पडछाया पुढील बाजूस पडतात. अशा पडछायांच्या कडा वस्तूंपेक्षा कॅमेऱ्याच्या अधिक जवळ आल्याने त्या पडछाया वस्तूंच्या बाजूला जाताना निमुळत्या होत जातात व निमुळत्या समांतर रेषांप्रमाणेच त्या त्रिमितीय आभास निर्माण करतात.

(५) छायाचित्रातील पट्टी : कित्येक छायाचित्रांत पांढरी शुभ्र वस्तू किंचित करड्या छटांनी दाखविली जाते. अशा छायाचित्रांस आसन्न शुभ्र (हाय की) छायाचित्रे म्हणतात. आनंद, तारुण्य, मृदुता, कोमलता इ. भाव दाखविण्यास ही पद्धत वापरतात. याउलट ज्या छायाचित्रांत बहुतांशी काळ्या छटा असतात व महत्त्वाचे भाग तेवढे प्रकाशित केले जातात, अशा छायाचित्रांस आसन्न कृष्ण (लो. की) छायाचित्रे म्हणतात. वार्धक्य, गंभीरता, वैषम्य, निराशा इ. भाव या पद्धतीने जास्त प्रभावी दिसतात.

(६) छायाचित्रातील किरणकेंद्रीकरण : बहुतेक छायाचित्रांत त्यांतील सर्वच भाग पूर्णकेंद्रित असावे लागतात; परंतु काही छायाचित्रांत मुख्य घटकाचे पूर्णकेंद्रीकरण करून बाकीच्या भागांचे जाणूनबुजून योग्य प्रमाणात अपकेंद्रण करावे लागते; कॅमेऱ्याकडे बघणाऱ्या व्यक्तीचे डोळे आणि नाक पूर्णकेंद्रित करून कान आणि डोक्याच्या आकाररेषांचे अपकेंद्रीकरण करण्यात येते. त्यामुळे असे छायाचित्र अगदी वास्तवदर्शी होते. या प्रकारास भेददर्शी केंद्रीकरण म्हणतात. नाजूकपणा किंवा कोमल भावना दाखविताना मृदुकेंद्रीकरणाचा उपयोग करतात. असे छायाचित्र घेण्याकरिता मृदुकेंद्रण करणारी स्वतंत्र भिंगे अथवा चालू भिंगांवर लावण्याची उपभिंगे वापरतात. कॅमेऱ्याच्या किंवा चित्रवर्धकाच्या भिंगापुढे बारीक जाळी (नेट किंवा मेश) धरूनही मृदुकेंद्रीकरण साधता येते. यातही भेददर्शी केंद्रीकरण होऊ शकते. साधारणपणे कृष्णश्वेत छायाचित्रांत नजीकचे घटक (पुरोभूमी) पूर्णकेंद्रित असावे लागतात; परंतु रंगीत छायाचित्रांत पुरोभाग काय किंवा पार्श्वभाग काय किंवा प्रसंगी दोन्ही भाग अपकेंद्रित केल्यास त्या भागांतील रंगांचे संमिश्रण होऊन छायाचित्राला उठाव लाभतो. छिद्रपटल विस्तृत ठेवून हे साधता येते.

(७) छायाचित्राचे अंतिम संस्करण : या सर्व गुणधर्मांबरोबरच छायाचित्रावर कचऱ्यामुळे आलेले पांढरे डाग, किंवा ऋणपट्टीवरील सूचिछिद्रांमुळे आलेले काळे डाग घालविण्यासाठी संस्करण (स्पॉटिंग अँड फिनिशिंग) करावे लागते.

(८) पोत-अभिसाधन : कापड किंवा गालिचे यांसारख्या वस्तूंचे पोत, झाडांच्या सालीचा अथवा झोपड्यांच्या भिंतीवरील खडबडीत पृष्ठभाग, त्वचेवरील छिद्रे, चेहऱ्यावरील सुरकुत्या, भांड्यांवरील चमक इत्यादींचे तंतोतंत छायाचित्रण करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. असे छायाचित्रण वस्तुपृष्ठांवर शक्य तेवढा तिरपा प्रकाश टाकून करता येते.

पुढच्या पानावर बघा

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...