Tuesday 24 September 2013

वेब पत्रकारिता

माध्यम इंटरनेट
पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या व अशासारख्या चर्चेच्या ओघात 'मेरा नंबर कब आयेगा' म्हणत हमखास दरवाजाबाहेर ताटकळत असतं ते इंटरनेट.

इंटरनेट हे माध्यम?
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.

सुपर माध्यमाची बीजे
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.
इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत..
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.
इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.

सर्वसामान्यांची पत्रकारिता
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.

खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.

इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.
आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.

माधव शिरवळकर

Sunday 22 September 2013

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर


जन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश)

मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे. बाबासाहेबांचा जन्म १४ एपिल १८९१ रोजी महु या गावी एका अस्पृश्य कुटुंबात झाला. अस्पृश्य कुटुंबात जन्मल्यामुळे लहान वयापासून अन्यायकारक प्रथेचा अनुभव येत गेला. त्यांचे वडिल लष्करात सुभेदार मेजर होते, भीमराव आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व महाविद्यालयात झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी पत्करली. पण तिथे सुद्धा पदोपदी जातीच्या नावाखाली हेटाळणी होत असे. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ती नोकरी सोडून, मुंबईतल्या सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यपकाची नोकरी स्वीकारली.

अन्याया विरुद्ध आवाज उठवून, अस्पृश्यांचा उद्धार हेच त्यांनी आपले जिवीत कार्य मानले. त्यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरुवात केली. १९१९ पासून त्यांचा सार्वजनिक जीवनात वावर सुरु झाला आणि अस्पृश्य समाजाच्या जागृतीचं आणि संघटनाचं कार्य करुन ते दलितांचे नेते म्हणून ही ओळखले जाऊ लागले.१९२० मध्ये त्यांनी मुंबई येथून “मूकनायक” नावाचे पाक्षिक सुरु केले. त्याच वर्षी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगांव येथे परिषद आयोजित केली. तर नागपूरला छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आखिल भारतीय परिषद ही बोलावली, लोकजागृतीचं कार्य सुरु असतानाच स्वत:चे अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरिता ते इंग्लंडला गेले. आणि लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही दुर्लभ पदवी संपादन करुन बॅरिस्टर झाले.

१९२४ मध्ये त्यांनी “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. “शिकवा, चेतवा व संघटित करा”हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर सर्वसामान्यांप्रमाणे अस्पृश्यांनाही पाणी भरता यावे यासाठी त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व त्याच वर्षी अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी “मनुस्मृती” आणली.

अस्पृश्यांना इतर भक्तांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे यासाठी १९३० साली. काळाराम मंदीर प्रवेशासाठी सत्याग्रह ही केला, त्याचं नेतृत्व त्यांनी स्वत: केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते, तिथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू अगदी हिरहिरीने मांडली; त्यांची स्वतंत्र मतदार संघांची मागणी ही मंजूर झाली. पण यामुळे म.गांधी आणि डॉ. आंबेडकर मध्ये मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गांधीजींनी उपोषण आरंभले.

१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. प्रांतिक विधीमंडळाच्या झालेल्या निवडणूकीमध्ये ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले.

१९४१ साली त्यांनी “ऑलइंडिया शेड्युलकास्ट फेडरेशन” नावाच्या देशव्यापी पक्षाची स्थापना करुन, अस्पृश्यांसाठी अनेक लढे ही दिले. तसंच अन्याय ग्रस्त समाज घटकांचं एक व्यापक पक्ष म्हणून स्थापना करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. त्याचं नाव “रिपब्लिकन पक्ष” असं ठरवण्यात आलं होतं, पण या पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर म्हणजे १९५७ साली करण्यात आली.

१९४२ ते १९४६ या कालखंडात बाबासाहेब व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते, भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री झाले. भारतीय राज्यघटनेच्या निमिर्ती मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, सोबतच ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अथक परिश्रम पणाला लावुन त्यांनी संविधनाचा मसुदा तयार केला होता, म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे आदिशिल्पकार मानण्यात आलं आहे.

वाचन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही असे त्यांना वाटे. त्यांच्याकडे दुर्मिळ अशा २५ हजार ग्रंथांचा संग्रह होता, बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक ग्रंथ ही विचार प्रेरक आहेत.

आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्तीक असलेला ग्रंथ म्हणजे “हु वेअर शुद्राज” तर त्यांचे “द अनटचेबल्स” या नावाचे पुस्तक ही उल्लेखनीय आहे. जातीय संस्थेमुळे हिंदूधर्म पोखरला गेला आहे, अशी बाबासाहेबांची ठाम समजूत होती. धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांवरील त्रास व अन्याय दूर होणार नाही, अशी पक्की धारणा झाल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनेक अनुयायांसह नागपूर येथे बौध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बौध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीचे कार्य हाती घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तसंच राजकीय आणि सामाजिक चळवळींनी प्रचंड क्रांतिकारी कार्य ही केले. त्यामुळेच शतकानुशतके मुक असणार्‍या एका मोठ्या समुदायाला बाबासाहेबांच्या रुपाने वाचा मिळाली.

भारताचे एक द्रष्ट नेते, श्रेष्ठ कायदेपंडित, तळा गळातील जनतेचा नेता आणि “एक विद्वान महामानव” अशा अनेक रुपांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किर्ती आणि स्मृती चिरंतन रहाणार आहेत. ६ डिसेंबर १९५६ ला त्यांच महानिर्वाण झालं, त्यानंतर भारताचं सर्वोच्च असा “भारत रत्न” हा सन्मान मरणोत्तर बहाल करण्यात आला.

प्रकाश गोपाळराव पोहरे


महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या `दैनिक देशोन्नती' या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक.

`दैनिक देशोन्नती' हे महाराष्ट्रातील ५ व्या क्रमांकाचे तर विदर्भातील दुसर्‍या क्रमांकाचे दैनिक आहे. याचबरोबर त्यांनी कमी खर्चाच्या शास्वत शेतीला वाहिलेले `साप्ताहिक कृषकोन्नती' सुरु केले असून शेती या विषयावर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे साप्ताहिक आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी सुरु केलेले हिंदी दैनिक `राष्ट्रप्रकाश' हे मराठी संपादक/मालकाचे पहिलेच हिंदी दैनिक आहे. श्री प्रकाश पोहरे यांचा जन्म दि. १७ मार्च १९५४ रोजी अकोला येथे झाला. १९८० ते १९९४ ही तब्बल १४ वर्षे ते शेतकरी संघटनेमध्ये अत्यंत सक्रियरित्या सहभागी होते. या काळात त्यांनी राज्यात अनेक सभा व आंदोलने गाजवली. १९९३ मध्ये त्यांनी कापूस सीमापार या आंदोलनाचे नेतृत्तव केले. परिणामी कापसाला २४०० रुपये भाव मिळाला.

`प्रहार' हा त्यांचा स्तंभ फार लोकप्रिय असून त्यातील लेखांचे संकलन एकूण चार पुस्तकांतून केले गेले आहे. त्यांची एकूण ९ पुस्तके प्रकाशित झाली असून दैनिक देशोन्नतीमधील १९९४ ते २०१० या १६ वर्षातील निवडक अग्रलेखांचे १० खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या सर्व पुस्तकांच्या मिळून जवळपास ५०००० प्रतिंची विक्री झाली आहे. श्री प्रकाश पोहरे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांना पत्रकारीतेतील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. श्री प्रकाश पोहरे यांच्याविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या http://www.prakashpohare.com या साईटला भेट द्या . `प्रहार' या स्तंभातील निवडक लेख मराठीसृष्टीच्या `लेखसंग्रह' या विबागात उपलब्ध आहेत.

पराग करंदीकर

पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्‍या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रासाठी निवसी पत्रकाराचे काम करताना ते बेनेट कोलमॅन अँड कंपनीमध्ये कार्यरत असुन आपल्या आभ्यासपुर्ण लेखनाचा व
अचुक माहिती संकलनाचा सुरेख संगम करीत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा अगदी ठसठशीत ठसा त्यांनी येथे उमटविला आहे. करंदीकरांचे शैक्षणिक आलेख बघितला, तरी त्यांच्या आतील अष्टपैलु व सृजनशील विद्यार्थ्याची सहज प्रचिती येईल, इतक्या विभीन्न प्रातांना व पाउलवाटांना एक विद्यार्थी म्हणून चोखंदळले आहे. 'डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग' हा कोर्स करून एका इंजिनीअराची प्राथमिक घडण, आर्टस क्षेत्राती राज्यशास्त्र या विषयातील पदवी मिळविलेला पदवीधर, व रानडे इन्स्टिट्युट मधून 'मास्टर्स इन जर्नालिसम अँड कम्युनिकेशन' ही पत्रकारिता कौशल्यांना सबळ व सक्षम करणारी डिग्री मिळविणारा तज्ञ, अशी एक विद्यार्थी म्हणूनच त्यांची मुळे फार खोलवर रूतलेली आहेत. कस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रथितयश संस्थेमधून ते डिप्लोमा इंजिनीअर झाले तर परशुराम भाऊ कॉलेज पुणे या नामांकित कॉलेजमधून कला क्षेत्रातील पदवीधर झाले .त्यांच्यातील खर्‍या पत्रकाराची जडण घडण तर कॉलेजच्या दिवसांपासूनच झाली. पत्रकारिता हे त्यांच व्रत आहे, अन्यायाला तोंड फोडण्यासाठी त्यांनी निवडलेलं शस्त्र आहे हे त्यांच्या आतापर्यंतच्या अत्यंत तत्पर व पारदर्शी वाटचालीमधून सिध्द होतं आलयं. कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्या हाताला चिकटलेली लेखणी आजवर कधीही म्यानस्थ झ ालेली नाही. उलट ती आजच्या आव्हानात्मक व भ्रष्टाचाराने वेढलेल्या जगामध्ये अधिकच तावून सुलाखून निघालेली आहे. निर्भीड विचारसणीचे व विज्ञानवादी दृष्टीकोनाचे पुरस्कर्ते असलेल्या करंदीकरांनी साहाय्यकारी संपादक पुणे शहर, सकाळ मिडिया ग्रुप येथे, सकाळ पेपर्स लिमीटेड साठी अहवालकर्ता म्हणून, तर सकाळसाठीच क्रिडा विभागाचे उपसंपादक व प्रमुख रिपोर्टर म्हणून काम केले आहे. आपले पदव्योत्तर शिक्षण त्यांनी एन. एम. व्ही. कॉलेजमधुन पुर्ण केले.

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर

जन्म - १ डिसेंबर १८८५ ,
मृत्यू - २१ ऑगस्ट १९८१

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, उर्फ आचार्य कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर; हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहे.

काकासाहेब कालेलकरांचा जन्म १ डिसेंबर १८८५ साली सावंतवाडीच्या बेलगुंडी या गावी झाला.फर्ग्युसन महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी “राष्ट्रमत” या दैनिकात संपादकीय विभागात काम केलं. त्यानंतर बडोदा येथील गंगाधर विद्यालयात कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, पण “या विद्यालयात सरकार विरोधी कारवाया चालतात” असे कारण दाखवून ब्रिटीश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले.
“गंगाधर विद्यालय” बंद झाल्यावर काकासाहेबांनी महात्मा गांधीजींच्या गुजराथ येथील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी “सर्वोदय” या महात्मा गांधीजींच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलं. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचं योगदान बजावलं, त्यासाठी हिंदुस्थानी प्रचार सभेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवला. भारत देशाचं ऐक्य टिकून रहाण्यासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची नितांत आवशक्यता असल्याचं ते मानत, त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण ही केले. 
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेमुळे साकारलेल्या गुजराथ विद्यापिठाच्या स्थापनेत काकासाहेब कालेलकरांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काही काळ कालेलकर गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरु ही होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३ साली “मागास वर्गीय आयोग” नेमण्यात आला होता, काकासाहेब कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. १९५५ ला या आयोगाने आपला अहवाल सरकारला केला. या अहवालात दलित तसंच अस्पृश्यांसाठी अ नेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.

काकासाहेब कालेलकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती जनतेने सुद्धा त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले, कालेलकरांना गुजराती लोकं आदराने “सवाई गुजराती” म्हणत असत. काकासाहेब कालेलकरांनी लेखन आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले, तर कालेलकरांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामासाठी १९६६ साली “जीवन व्यवस्था” या गुजराती भाषेतील निबंध संग्रह साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. तर १९७१ साली “साहित्य अकादमीचे सदस्यत्व” ही बहाल करण्यात आले. २१ ऑगस्ट १९८१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी काकासाहेब कालेलकरांच वृद्धापकाळाने निधन झाले.

हेमंत देसाई

हेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले. या काळात सदर वृत्तपत्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा योगदान असून अग्रलेख, वैचारिक लेखनशैलीसाठी ख्याती आहे.
त्याचप्रमाणे लोकमत,सकाळ, महानगर, प्रभात, नवशक्ति, महानगर सारख्या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन ही केलेलं आहे.तर साधना साप्ताहिकात चार वर्षे सदर व अग्रलेखही लिहिले. तसेच बाबू मोशाय या टोपणनावाने चित्रपटविषयक लिखाण. संशोधन, अभ्यासू वृत्ती हेमंत देसाईंच्या वैशिष्ट्य म्हणता येईल.कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता परखड लेखन व बोलण्यासाठी प्रसिद्ध. आक्रमक व वैचारिकता यांची सांगड घालून लेखन व भाषणे राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर लेखनाबरेबरच ठिकठिकाणी व्याख्याने. राजकीय व सामाजिक विषयांचे अभ्यासक म्हणून व वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालांमधून व्याख्याने दिली आहेत यामध्ये पुण्याची वसंत व्याख्यानमाला, संगमनेरची अनंत फंदी, मिरज व गडहिंग्लज येथील वाचनालयांच्या व्याख्यानमाला या व इतर ब-याच ठिकाणी व्याख्याने दिली असून, अनेक टीव्ही चॅनेल्सवरूनही विश्लेषणात्मक चर्चांमधून सहभाग घेतला आहे. बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशी संबंध. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीशी जवळचे नाते जोडून काम. विविधांगी लेखनासोबतच कथालेखनही चालू. भोवळ कादंबरीही दिवाळी अंकातून प्रकाशित झाली असून ती पुस्तकरूपात प्रसिध्द झाली आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांसाठी अध्यापन ही केलं असून माध्यम क्षेत्रातील त्यांचे अनेक विद्यार्थी आज महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
सण्डे के सण्डे, बोई बगाल, जलसाघर, तारकांचे गाणे, शहेनशहा अमिताभ, विदूषक, चांदरात ही बाबू मोशायलिखित आणि आपला अर्थसंकल्प, कंगालांचे अर्थशास्त्र व सारथी ही हेमंत देसाई नावाने लिहिलेली पुस्तके प्रकाशित. त्यांचा ‘बोई बंगाल’ या पुस्तकास राज्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला असून,आणखीही काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर. चित्रपटसंगीतविषयक ‘सुहाना सफर’ व राजकीय लेखसंग्रह ‘डावपेच’ प्रसिद्ध झाला आहे.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

जन्म-२५ नोव्हेंबर, १८७२ मृत्यू- २६ ऑगस्ट, १९४८ 
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. 'केसरी'चे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.'नवाकाळ' या वृत्तपत्राचे ते संस्थापक आहेत.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...