Thursday 5 September 2013

जाहिरात

जाहिरात
जाहिरात म्हणजे दृक् किंवा श्राव्य संदेश विविध संपर्क माध्यमांतून जनतेस कळविणे. जाहिरातीने प्रभावित होऊन लोकांनी उत्पादित वस्तू किंवा सेवा घ्यावी, हा जाहिरातीमागे उद्देश असतो. तसेच व्यक्ती वा संस्था यांविषयी लोकांचे मत अनुकूल होऊन ते संदेशाबरहुकूम कार्यशील व्हावे, असाही हेतू जाहिरातीमागे असतो.

इतिहास : मुद्रणकलेचा शोध लागण्यापूर्वी मालाची जाहिरात बाजारपेत ओरडून किंवा दवंडी पिटून केली जाई. दुकानावर सचित्र व सुबोध फलक असत. पाँपेई व रोम येथे ख्रिस्तपूर्वकालात दुग्धशाळा, पावभट्टी, चर्मकारांची व मद्याची दुकाने इत्यादींवर फलक असत. भिंतीवर रंगवलेल्या जाहिरातीतून भाड्याने द्यावयाची जागा, हरवलेल्या वस्तू, क्रीडा, मुष्टियुद्धादी खेळ इत्यादींबद्दल फलके लिहीत असत. ब्रिटीश म्यूझीयममध्ये प्राचीन ईजिप्तमधील भूर्जपत्रावरील एक जाहिरात आहे. तिच्यात शेमनामक परांगंदा झालेल्या गुलामास शोधून देणाऱ्याला एक सोन्याच्या नाण्याचे बक्षीस केले आहे. पंधराव्या शतकातील मुद्रणकलेचा शोध ही जाहिरातीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होय. १४७७ साली इंग्लंडमध्ये प्रार्थना पुस्तकाच्या विक्रीसंबंधी पहिली छापील जाहीरात हस्तपत्रकाच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वर्तमानपत्रात पहिली जाहिरात १६२५ साली लंडनमधील एका वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानावर छापण्यात आली. अठराव्या शतकात हस्तपत्रके जास्त प्रमाणात प्रचलित झाली व त्यांतून चित्रमय जाहिरातीला वाव मिळाला. अमेरिकेत वर्तमानपत्रांतील जाहिरातींना १७०४ मध्ये सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये पहिली जाहिरातवितरण-संस्था १८१२ साली व अमेरिकेत १८४१ मध्ये स्थापन झाली, तर फ्रान्समध्ये १८७५ च्या सुमारास अत्यंत उत्कृष्ट अशी भित्तिपत्रके तयार होऊ लागली. झूल शेरे व तूलूझ-लोत्रेक यांच्यासारख्या ख्यातनाम चित्रकांराची चित्रे भित्तिपत्रात वापरली जाऊ लागली. १८७७ साली इंग्लंडमध्ये मिलेचे बुडबुडे (बबल्स) नावाचे प्रसिद्ध तैलचित्र पेअर्स (Pears) साबण कंपनीने आपल्या भित्तिपत्रकासाठी वापरले. तेव्हापासून उपयोजित कलेसाठी चित्रकला वापरण्याची प्रथा पडली व चित्रकारांनी एक नवीन संधी प्राप्त झाली. नभोवाणीवरील जाहिराती इंग्लंड-अमेरिकेमध्ये १९२० पासून सुरू झाल्या व त्यानंतर भित्तिपत्रे, फलकांवरील जाहिराती इत्यादींना नव्याने जोम चढला, तसेच टपालाद्वारेही जाहिराती सुरू झाल्या. १९२०–३० या दशकात जाहिरातक्षेत्रात विपणिसंशोधनाने प्रवेश केला व दुसऱ्या महायुद्धानंतर मानसशास्त्र व प्रवर्तन–संशोधनाच्या आधार जाहिराततज्ञ घेऊ लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर दूरचित्रवाणीचाही जाहिरातीसाठी उपयोग होऊ लागला. भारतात १७९० पासून वर्तमानपत्रांतील जाहिराती सुरू झाल्या. वर्तमानपत्रे व मासिके यांच्या वाढत्या प्रसाराबरोबरच त्यांच्यामधील जाहिरातींचे प्रमाण वाढत गेले. भारतात पहिली जाहिरात वितरण-संस्था १९०७ साली मुबंईत स्थापन झाली. दुसऱ्या महायुद्धापासून जाहिरातवजा प्रसिद्धिपट चित्रपटगृहांत दाखविण्यात येऊ लागले. भारतात आकाशवाणीचा १ नोव्हेंबर १९६७ पासून आणि दूरचित्रवाणीचा १ जानेवारी १९७६ पासून जाहिरातीसाठी उपयोग सुरू करण्यात आला.

जाहिरातीची निकड व उत्क्रांती : औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादकाला आपल्या मालाचे उत्पादन पूर्वीपेक्षा अनेकपटीने वाढविणे शक्य झाले व त्यामुळे त्याला विक्रीचे प्रमाणही वाढविणे आवश्यक झाले. दळणवळणाच्या वाढत्या सोयींमुळे मालाच्या वाहतुकीची सोय झाली व आंतरराष्ट्रीय बाजारपेठही उपलब्ध होऊ लागल्या. जाहिरात हा विणनातील विक्रीतंत्राचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक असून विचारप्रसारणाचा एक प्रकार आहे. जाहिरात वा विज्ञापन ही एक कला आहे; ज्यात विविध उपयोजित कलाकौशल्यांचा आविष्कार घडतो. जाहिरात हे एक शास्त्रही आहे व त्याची उभारणी समाजशास्त्र, मानसशास्त्र, वाणिज्य व सांख्यिकीशास्त्र इत्यादींच्या पायावर केली जाते. जाहिरातीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीतीने अनेकांना रोजगार मिळतो वा कमाई होते व म्हणून तो एक धंदाही असतो.

आधुनिक अर्थव्यवस्थेत उत्पादनाचा वा सेवेचा खप अधिक प्रमाणात घडवून आणण्याचे कार्य जाहिरात करते. वस्तू दोन प्रकारच्या असतात. एक अल्पकाळ टिकणाऱ्या उदा., दंतमंजन, साबण, कापड, इ. व दुसऱ्या दीर्घकाळ टिकणाऱ्या उदा., विजेचा पंखा, रेडिओ, इत्यादी. सेवेमध्ये वाहतूक संस्था, उपहारगृहे, निवासस्थाने यांसारख्यांचा अंतर्भाव होतो. याशिवाय कुटूंबनियोजन, राष्ट्रीय एकात्मता, पंचवार्षिक योजना इ. कल्पनांचा जाहिरातीद्वारे प्रसार करण्यात येतो. राष्ट्रातील आपत्तींच्या प्रसंगी उदा., जातीय दंगे, दुष्काळ, रोगांच्या साथी, भूकंप, महापूर. इ. प्रसंगी लोकांचे नीतिधैर्य टिकविण्यासाठी व लोकप्रयत्न संघटित करण्यासाठी जाहिरातींचा उपयोग केला जातो.जाहिरातीमुळे हजारो लोकांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे रोजगार प्राप्त होतो. जाहिरातीपासून होणाऱ्या उत्पन्नाच्या आर्थिक बळकटीमुळे वर्तमानपत्रांना आपले लोकजागृतीचे कार्य स्वतंत्र बाण्याने पार पाडता येते. वर्तमानपत्रांना निम्म्याहून अधिक उत्पन्न जाहिरातीपासून लाभते व परिणामी वाचकांना वर्तमानपत्रे स्वस्त दरात मिळतात. जाहिरातीमुळे ग्राहकांना विविध उत्पादनांची व सेवांची माहिती मिळते. त्यांच्या विशिष्ट दर्जाबाबत पूर्वकल्पना येते. जाहिरातीमुळे ग्राहकांना इष्ट त्या वस्तूंची निवड करणे सोयीचे ठरते. शिवाय खरेदीविक्रीच्या व्यवहारात जाहिरातीमुळे सुलभता येते. एकूण ग्राहकांना अनेक प्रकारे मार्गदर्शन करण्याचे कार्य जाहिरातीमुळे शक्य होते.

प्रत्यक्ष उत्पादक संस्था आपल्या विकासाचा प्रयत्न करीत असते. विकास साधण्याचा एक मार्ग म्हणजे विक्रीचे प्रमाण वाढविणे. यासाठी जाहिरात आवश्यक असते, तथापि जाहिरातीचा खर्च ग्राहकांच्या माथी मारला जातो, अशी एक तक्रार विरोधकांकडून करण्यात येते. वास्तविक विपणनातील इतर खर्चांप्रमाणे जाहिरात हा एक आवश्यक खर्च आहे. विक्रीसाठी जाहिरात ही स्वस्त, खात्रीलायक, कार्यक्षम व जलद पद्धती आहे. व अशा प्रकारची दुसरी पद्धती उपलब्ध नाही. जाहिरातीमुळे उत्पादकसंस्थेस वितरकांना, वितरकांस दुकानदारांना व दुकानदारांस ग्राहकांना माल विकणे सुलभ जाते. मालाच्या अधिक विक्रीमुळे उत्पादन वाढते व उत्पादन खर्च कमी होत जातो. त्यामुळे मालाच्या किंमती कमी करणे उत्पादकाला शक्य होते. जाहिरातीमुळे मालाची मागणी आणि पर्यायाने उत्पादन वाढल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. हे नवे कामगारही ग्राहक असल्यामुळे चलनात अधिक पैसा येतो. अधिक नफ्यातील काही हिस्सा दूरदृष्टीचा उत्पादक बोनस, कामाच्या चांगल्या सोयी, कामगार निवासस्थाने इत्यादींवर खर्च करू शकतो. जाहिरातीमुळे मालाची प्रतिष्ठा वाढते व संस्थेचे नाव होते.

मागणी वाढवायची तर संभाव्य ग्राहकांना मालाची जाणीव करून देऊन त्यांचे लक्ष मालाकडे आकर्षून घ्यावे लागते. चांगली वस्तू आपोआप विकली जाईल, असे काहीजण मानतात; परंतु स्पर्धायुक्त बाजारात एखाद्या उत्पादकाची वस्तू केवळ चांगली व स्वस्त असली, तरी ती जाहिरातीशिवाय खपेलच अशी खात्री देता येत नाही. कारण तशाच प्रकारची वस्तू बनविणारे अन्य उत्पादक आपल्या मालाची जोरदार जाहिरात करून ती खपवू शकतात. अर्थात केवळ प्रचंड प्रमाणावर जाहिरात केल्याने सुरुवातीस काही काळ एखाद्या वस्तूचा खप वाढला, तरी वस्तूमध्ये गुणवत्ता नसल्यास तिचा खप सतत टिकून राहणे किंवा वाढणे अशक्य आहे. जाहिरातीतील सत्य किती असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आजकाल खोटी वा फसवी जाहिरात करणे अवघड झाले आहे. कारण या संदर्भातील वेगवेगळे कायदे व जाहिरात वितरण-संस्था यांचे स्वेच्छ निर्बंध. विकसित राष्ट्रांमध्ये जाहिरातीचे प्रमाण अधिक असते. ही केवळ योगायोगाची गोष्ट नसून जाहिरातीमुळे औद्योगिक विकासाला मदत होते, असे आढळून आले आहे. जाहिरात हे जीवनमानात सुधारणा घडवून आणणारे एक महत्त्वाचे साधन समजले जाते.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...