Thursday 5 September 2013

बाळशास्त्री जांभेकर

जांभेकर, बाळशास्त्री

(? १८१२–१७ मे १८४६). मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंम्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी. गंगाधरशास्त्री ह्या व्युत्पन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईस येऊन सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून धेतला होता. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एलफिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).
दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच १८४० मध्ये काढले. लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हेच हेतू या उपक्रमांमागे होते.
भूगोल, व्याकरण, गणित, इतिहासादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली. काही पाठांतरे नोंदवून त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होत. या संस्थेच्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी त्यांचे संशोधनात्मक निबंध येत असत.
त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.


संदर्भ : जांभेकर, ग. गं. आचार्य बाळ गंगाधर जांभेकर : जीवनवृत्तांत व लेखसंग्रह, पुणे १९५०.


कुलकर्णी, अ. र.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...