Sunday 8 September 2013

नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्था

नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्थेत जमेची फक्त तीन अंग आहेत : वर्गणीदारांकडून येणारे उत्पन्न, किरकोळ अंकांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आणि जाहिरातदारांकडून येणारे उत्पन्न; परंतु यापेक्षा खर्चाचे तपशील अधिक आहेत. उदा., कागद आणि छपाईचा खर्च, अंकबांधणीचा खर्च, टपालखर्च, लेखकांचा मोबदला, संपादकीय व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादी. जमेच्या बाजूला किरकोळ अंकविक्रीपासून मिळणारी रक्कम ही तुलनेने सर्वात गौण आवक आहे. वर्गणी व जाहिराती यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच नियतकालिकांना खर्चाशी तोंडमिळवणी करावी लागते. जाहिरातींचे उत्पन्न हा या एकूण उत्पन्नाचा फार मोठा घटक आहे; तथापि वर्गणीचे उत्पन्न व जाहिरातीचे उत्पन्न ही परस्परावलंबी आहेत, याचे कारण असे, की जाहिरातदारांच्या दृष्टीने नियतकालिकांचा वाचकवर्ग म्हणजे आपल्या मालासाठी एक बाजारपेठच असते. वाचकवर्ग जितका विस्तृत तितकीच त्यांची बाजारपेठही मोठी. वाढत्या वाचकवर्गाच्या नियतकालिकांना अधिक जाहिराती मिळतात, एवढेच नव्हे, तर त्या अधिक दरानेही मिळण्याची शक्यता असते, म्हणूनच आपल्या खपाचे आकडे नियतकालिके वारंवार प्रसिद्ध करीत असतात. संपन्न देशांतील नियतकालिकांच्या अर्थव्यवस्थेत जाहिरातींचे स्थान व प्रभावही मोठा आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नाचा किमान निम्मा व अनेकदा ७५ ते ८० टक्के हिस्सा जाहिरातींपासून मिळवलेला असतो. मराठी नियतकालिकांच्या व्यवस्थापनेत गेल्या अर्धशतकापासून मूलगामी फरक होऊ लागला आहे. आरंभी नियतकालिकांचा प्रपंच एकेका व्यक्तीवर, कधी संपादकावर, तर कधी व्यवस्थापकांवर अवलंबून असे. वैयक्तिक कर्तुत्वाचे महत्त्व आता संपुष्टात येत चालले असे नव्हे; पण संपादनकौशल्याला भांडवलाची व व्यवस्थापकीय कौशल्याची जोड ज्या प्रमाणात लाभेल, त्यावर नियतकालिकाची आयुर्मर्यादा अवलंबून असते, ही अनुभवजन्य जाणीव आता रूजली आहे. आपल्या संपादनाखाली निघणाऱ्या नियतकालिकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य त्या प्रतिष्ठित लेखकांकडून सातत्याने साहित्य मिळविणे नव्या लेखकांच्या शोधात राहून त्यांचे साहित्य मिळविणे, आपल्या उद्दिष्टाला पूरक असे नवे नवे विषय शोधणे, हाती आलेल्या लिखाणाचा यथोचित परामर्ष घेणे ही अनेकांगी संपादकीय जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडावयाची असेल, तर संपादकीय सूत्रे एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये विभागून संपादकमंडळ स्थापण्याची आवश्यकता भासू लागली आहे. संपादकीय व्यवसायाचे शास्त्रीय शिक्षण मिळण्याची सोयही आता भारतातील काही विद्यापीठांतून झालेली आहे. या अभ्यासक्रमात वृत्तपत्रकारांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले असले, तरी समाजाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांचा त्यात अंतर्भाव केला असल्यामुळे नियतकालिकांच्या संपादनालासुद्धा हे शिक्षण उपयुक्त ठरू शकते. व्यवस्थापकीय कामकाजाचीही तीच अवस्था आहे. प्रसिद्धीचा वक्तशीरपणा, अंकाची अंतर्बाह्य सजावट, वर्गणीदार व जहिरातदार यांच्या वाढीचे प्रयत्न यांपैकी कशातही कुचराई झाली, तर वाढत्या स्पर्धेच्या जगात निभाव लागणार नाही, हे उमजून सामूहिक व्यवस्थापना अमलात येऊ लागली.
भारतातील समग्र नियतकालिकांची शासनप्रणीत खानेसुमारी १९५७ सालापासून दरवर्षी मिळू लागली आहे. रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया यांच्या द प्रेस इन इंडिया या वर्षिक अहवालात विद्यमान नियतकालिकांची तपशीलवार सूची आणि विविध दृष्टिकोनातून केलेली वर्गीकृत आकडेवारी मिळते. त्यांच्या १९७४ सालच्या अहवालातून भारतीय नियतकालिकसृष्टीच्या रूपरेषा प्रतीत होतात. १९६९-७४ या पाच वर्षांत नियतकालिकांच्या आणि त्यांच्या खपाच्या संख्येत चढउतार आढळत असला, तरी त्यांत अनुक्रमे १७.९% आणि २३.८% वाढ झालेली आहे. एकूण नियतकालिकांत मासिके सर्वाधिक (३९.७%) आणि साप्ताहिके व पाक्षिके त्यांच्या खालोखाल (अनुक्रमे ३२.५ आणि १२.५%) आहेत. हिंदी ही बहुसंख्यकांची भाषा असल्यामुळे हिंदी नियतकालिकांची संख्या आणि खप (अनुक्रमे २,९१८ व ५,६४,९००) अग्रक्रमवार आहेत, हे स्वाभाविकच आहे; पण १९७३ साली या दोन्ही बाबतींत इंग्रजी अग्रेसर होती आणि इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा इंग्रजीत दुपटीहून अधिक संख्येने नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यापेक्षाही अधिक प्रमाणात खपतात, ही परिस्थिती त्या भाषेच्या भारतातील भवितव्याच्या संदर्भात बोलकी आहे. इतर दृष्टिकोनातून इंग्रजीचे वर्चस्वच आढळून येते. ज्यांच्या प्रत्येक अंकाचा खप १ लक्ष प्रतींपेक्षा अधिक आहे, अशा २५ नियतकालकांमध्ये इंग्रजी नियतकालिके सर्वाधिक (८) आहेत आणि विषयांनुसार केलेल्या वर्गीकरणात २१ विषयांपैकी १४ विषयांत सर्वांत अधिक खप इंग्रजी नियतकालिकांचाच आहे. नियतकालिकप्रकाशनात महाराष्ट्र अखिल भारतात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात १,६१८ नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ४७,९६,००० प्रतींचा आहे.


ज्यांच्या दरेक अंकाच्या १ लक्षाहून अधिक प्रती खपतात अशा सर्वच नियतकालिकांचा हेतू फावल्या वेळात मनोरंजन करणे हा दिसतो. लोकशिक्षण, समाजप्रबोधन हे आपले प्रयोजन मानून त्यासाठी विचारप्रवर्तक, कसदार लेखन प्रसिद्ध करणारी गंभीर प्रकृतीची नियतकालिके कोठल्याही भाषेत तुलनेने अल्पसंख्यच आढळतात; कारण त्यांचा वाचकवर्ग फार मर्यादित असतो. मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ६३० नियतकालिकांच्या संदर्भात हीच परिस्थीती आहे, असे समजण्यात काही प्रत्यवाय नसावा. श्रेष्ठ दर्जाच्या मजकुराच्या मागणीचे दडपण वाचकांकडून नसल्यामुळे हिणकस मजकुरांनी भरलेली नियतकालिके निघतात व जगतात. ही परिस्थिती मागणी तसा पुरवठा या न्यायाचे द्योतक आहे हे खरे, पण समाजशिक्षणाचे आणि समाजाच्या सदभिरुचीचे संवर्धन करण्याचे एक प्रभावी माध्यम या दृष्टीने नियतकालिकांचा विचार केला, तर सद्य:स्थिती काहीशी असमाधानकारक आहे, असा अभिप्राय समीक्षणवाड्‌मयातून प्रतीत होतो.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...