Sunday 8 September 2013

नियतकालिके

नियतकालिके

जे प्रकाशन एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवड्याच्या किंवा त्याहून अधिक कालावधीने सामान्यत: नियमितपणे प्रसिद्ध होते आणि ज्यात अनेक लेखकांचे विविध विषयांवरचे (किंवा प्रकाशन विशिष्ट विषयाला वाहिलेले असल्यास त्या एकाच विषयावरचे) साहित्य संकलित केलेले असते ते नियतकालिक, अशी सर्वसाधारणपणे नियतकालिकाची व्याख्या करता येईल. दैनिक वृत्तपत्रांचा अंतर्भाव सामान्यत: या संज्ञेत करीत नाहीत. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध घटनांच्या बातम्या ताबडतोब पुरविणे, हा वृत्तपंत्राचा मुख्य हेतू असतो; तेव्हा वृत्तपत्राप्रमाणे बातम्या न पुरविता मनोरंजक वा ज्ञानवर्धक मजकूर जी प्रकाशने नियमित कालावधीने पुरवितात, त्यांनाच नियतकालिक ही संज्ञा आहे. नियतकालिकांचे वर्गीकरण अनेक दृष्टिकोनांतून करता येते. प्रसिद्धीच्या नियतकालानुसार साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक असे नियतकालिकांचे प्रकार होऊ शकतात. मुलांची, स्त्रियांची अशी विशिष्ट वाचकवर्गानुरूप किंवा मनोरंजक, वैचारिक, संशोधनात्मक अशी आशयानुरूप वर्गावारीही करता येते.

नियतकालिक या वाड्‌यप्रकाराचा उदय युरोप खंडात सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. १६६३ साली जर्मनीत हँबर्गला प्रसिद्ध झालेले Erbauliche Monaths-Unterre-dungen हे जगातील पहिले ज्ञात नियतकालिक समजले जाते. पुढील दोनचार वर्षांच्या अवधीतच फ्रान्स, इंग्लंड आणि इटली या देशांत नियतकालिक निघू लागली. या सर्वांची प्रेरणा ज्ञानप्रसार हीच एक होती. यानंतर १० वर्षांनी फ्रान्समध्ये नियतकालिकांतून रंजक स्वरुपाचा मजकूर समाविष्ट होण्यास सुरुवात झाली. १६७२ साली Mercure gallant या नियतकालिकात आख्यायिका, कविता अशा तऱ्हेचे साहित्य संगृहित केले जाऊ लागले. यथाकाल त्याच अनुकरण होऊन यूरोपमधील इतर देशांतही त्याच धर्तीवर नियतकालिके निघू लागली. १६९० साली इंग्लडमध्ये जॉन डंटन हा प्रकाशक अथेनिअन मर्क्युरी हे रंजक नियतकालिक प्रकाशित करु लागला. स्त्रीवर्गातील वाढता शिक्षणप्रसार ध्यानात घेऊन या मासिकाचे काही अंक त्याने खास स्त्रीवाचकांसाठी प्रसिद्ध केले. त्या प्रयोगाला अपेक्षेपेक्षाही अधिक अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे १६९३ साली त्याने लेडीज मर्क्युरी या नावाचे स्वतंत्र नियतकालिक स्त्रियांसाठी सुरू केले. स्त्रियांसाठी निघणाऱ्या नियतकालिकांचा हा आद्य अवतार समजता येईल.

अठराव्या शतकाच्या आरंभी निबंध या वाड्‌मयप्रकाराचा उदय व विकास होण्यास नियतकालिकाचे माध्यम फार उपयुक्त ठऱले. रिव्ह्यू, टॅटलर, स्पेक्टॅटर इ. नियतकालिकांतून डॅन्येल डीफो, रिचर्ड स्टील व जोसेफ ॲडिसन या तीन निबंधकारांनी इंग्लंडमध्ये लक्षणीय सामाजिक आणि राजकीय जागृती घडवून आणली. त्याबरोबरच आपल्या भाषाशैलीने अभिजात वाङमयाविषयी अभिरुचीही सर्वसामान्य लोकांत निर्माण केली. याच शतकाच्या अखेरच्या दशकात जर्मनीत केवळ वाड्‌मयीन विषयांना वाहिलेली नियतकालिके प्रथम निघाली. शिलर व गटे या विश्वविख्यात साहित्यिकांनी संपादन केलेली वाड्‌मयीन नियतकालिके जर्मन साहित्यात अत्यंत प्रभावी ठरली.

अमेरिकेत नियतकालिकांचा आरंभ १७४१ च्या सुमारास झाला व या अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत तेथे सु. १०० नियतकालिके सुरू झाली. पुढे अमेरिकन नियतकालिकांची जी भरभराट झाली, ती देशातील तत्कालीन सर्वांगीन प्रगतीचा एक भागच समजता येईल. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण अमेरिकेत बहुतेक सर्व घटक राज्यांतून सुरू झाले. त्याचा परिणाम नियतकालकांसाठी एक मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यात झाला. त्या काळात जी वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती झाली तीसुद्धा नियतकालिकांच्या प्रसाराला फार उपयुक्त ठरली. मुद्रणकलेत झालेल्या तांत्रिक सुधारणांमुळे छपाईच्या खर्चात बचत होऊ लागली. कागदाचे उत्पादन मुबलक होऊन तो स्वस्त दराने मिळू लागला. करमणूक आणि ज्ञानवंर्धन या क्षेत्रातील नियतकालिकांची परिणामकारकता जाणून १८७९ सालापासून टपालाच्या दरात त्यांना खास सवलत दिली गेली. या सर्वांचा परिणाम नियतकालिके बहुजनसमाजाला परवडण्याइतकी स्वस्त होण्यात झाला. त्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यांचा प्रसार समाजामधील सर्व थरांपर्यंत पोहोचला.

एकोणिसाव्या शतकात ज्ञानाची अपूर्व प्रगती होऊन त्याच्या नव्या नव्या शाखोपशाखा विकसित झाल्या. विविध विषयांच्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी आपापल्या विषयांच्या संवर्धनासाठी विद्वतपरिषदा आणि संघटना स्थापन करून विशिष्ट विषयाला वाहिलेली नियतकालिके प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. नवविचारप्रवर्तक आणि व्यासंगपूर्ण साहित्यासाठी आज जगन्मान्य झालेल्या नेचर, लॅन्सेट, ब्रिटिश मेडिकल जर्नल, जर्नल ऑफ द रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी, इकॉनॉमिक जर्नल या इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या आणि पॉप्युलर सायन्स मंथली, सायंटिफिक अमेरिकन, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, पॉलिटिकल सायन्स क्कॉर्टर्ली, नॅशनल जिओग्राफिक जर्नल, देदलस या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांची सुरुवात याच काळातील आहे.

विसाव्या शतकात नियतकालिकांचे काही अभिनव प्रकार अमेरिकेत सुरु झाले. विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण जागतिक घटनांची बातमी समयोचित छायाचित्रांसह पुरविणारे टाइम मॅगझिन हे साप्ताहिक १९२३ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि वृत्तनियतकालिक या एका नव्या प्रकाराचा नियतकालिकसृष्टित उदय झाला. या साप्ताहिकाला सुरुवातीपासून मिळालेले भरघोस यश पाहून त्याचे अनुकरण होणे स्वाभाविकच होते. अल्पावधीत अमेरिकेत टाइमच्याच धर्तीवर न्यूजवीक, यू. एस. अँड वर्ल्ड रिपोर्ट ही साप्ताहिके निघू लागली. आपले कुशल बातमीदार आणि छायाचित्रकार जगभर नेमून त्यांच्याकरवी मिळालेल्या सामग्रीवर आपल्या खास भाषाशैलीचा संपादकीय संस्कार करून बातम्या गोष्टसदृश स्वरुपात सादर करणे, हे या नियतकालिकांचे वैशिष्ट्ये आहे. फ्रान्समधील L'Express, जर्मनीतील Der spiegel, इटलीतील Panorama व मेक्सिकोतील Tiempo ही या प्रकारातील इतर नावाजलेली नियतकालिके आहेत. वृत्तनियतकालिकांतील टाइमचे अद्वितीयत्व आजतागायत अबाधित आहे. निरनिराळ्या देशांसाठी त्याच्या २०० स्वतंत्र आवृत्त प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ५५ लक्ष प्रतींचा आहे.

लेखी मजकुरांपेक्षा छायाचित्रांना अधिक प्राधान्य देऊन छायाचित्रांतून घडलेला प्रसंग जणू प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान वाचकांना देणाऱ्या छायाचित्र-नियतकालिकांचा प्रारंभ लाइफ या साप्ताहिकाने १९३६ साली केला. जगातील लक्षवेधक प्रसंगांची कलात्मदृष्ट्या उत्तम आणि अत्यंत परिणामकारक छायाचित्रे प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टीत एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यमान छायाचित्र प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टित एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यामान छायाचित्रनियतकालिकांत फान्समधील Paris-Match, जर्मनीतील Stern व इटलीतील Oggi ही श्रेष्ठ दर्जाची समजली जातात. निरनिराळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले विविध विषयांवरील निवडक लेख संक्षिप्त करुन एकत्र छापण्याचा उपक्रम अमेरिकेत लिटररी डायजेस्ट आणि रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूज या नियतकालिकांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुरू केला होता; पण या कल्पनेची खरी परिपूर्ती १९२२ साली रीडर्स डायजेस्ट नियतकालिकाच्या सुरूवातीने झाली. प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीनुरूप प्रत्येक अंकात भरपूर साहित्य मिळाल्याचे समाधान होईल, अशा योजकतेने संक्षेपासाठी लेख निवडणे हे त्याच्या अभूतपूर्व लोकप्रियतेचे मर्म दिसते. करमणूक, ज्ञान, बहुश्रुतता यांसाठी उत्सुक असलेल्या वाचकवर्गावर याचा इतका पगडा पडला, की अवघ्या वीस वर्षांत अनेक देशांत आणि अनेक भाषांत त्याच्या स्वतंत्र आवृत्त्या निघू लागल्या. भारतातही त्याची स्वतंत्र आवृत्ती सुरू झालेली आहे (१९५४). त्याच्या इतर १३ आवृत्त्या निघतात आणि त्यांचा एकूण खप ३ कोटींच्या आसपास आहे. नियतकालिकसृष्टित हा विक्रम अभूतपर्व आहे.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...