Saturday 7 September 2013

भारतातील इतिहास आणि विकास

भारतामध्ये मुद्रणतंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. १५५७ मध्ये या मुद्राणाल्यामध्ये जे. बूस्तामांते यांनी सेंट झेव्हिअर यांचे Doutrina Christa हे पहिले पुस्तक छापले; पण त्याची भाषा व लिपी मात्र परकी होती. मुद्रण तंत्राचा प्रसार मात्र तेथून भारताच्या इतर भागांमध्ये कोचीन, पुडीकाईल, अंबलक्कडू, त्रांकेबार वगैरे किनाऱ्यावरील गावी झाला. अंबलक्कडू येथे 'मलबार टाइप' या नावाने प्रथम जे. गॉनसॅल्‌व्हिस यांनी १५५७ मध्ये खिळे तयार केले. त्यानंतर इग्नेशियस ऐशामोनी यांनी तमिळ लिपीतील खिळे प्रथम लाकडी साचे कोरून तयार केले. त्यांच्यापासून जे खिळे तयार केले त्यांचा उपयोग तमिळपोर्तुगीज भाषांचा शब्दकोश तयार करण्यासाठी केला गेला. सतराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षाच्या काळापासून पुढे पोर्तुगीज लोकांनी मुद्रण तंत्राविषयी फारसे काही केले नाही आणि त्यात प्रगतीही केली नाही. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला डॅनिश धर्मप्रसारकांनी मुद्रणामध्ये पुन्हा काही नवीन गोष्टी करायला सुरुवात केली. बार्थालोमस झिगेनबाल्ग यांनी त्रांकेबार येथे Bibli Danulica हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले. पूर्व जर्मनीमधील हाल येथे तयार केलेले तमिळ खिळे झिगेनबाल्ग यांनी मिळविले व त्या खिळ्यांनी वरील पुस्तक छापले. नंतर त्रांकेबार येथे मलबारी व तमिळ खिळे तयार करायला सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच काळापर्यत मुद्रणाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात मात्र कलकत्ता, मद्रास व मुंबई या सर्व शहरात एकाच वेळी  मुद्रणाचे तंत्र इंग्रज लोकांनी सुरु करून त्यात प्रगती करायला सुरुवात केली.
१७७८ हे वर्ष भारतातील मुद्रण व्यवसायाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. या वर्षी ए ग्रामर ऑफ द बेंगॉली लँग्वेज हे पुस्तक कलकत्त्याजवळील हुगळी येथे अँड्रूज यांचेया छापखान्यात छापले गेले. त्याचे लेखक एन्‌. बी. हॉलहेड हे होते. या पुस्तकांचे वैशिष्ट्य असे की, त्यासाठी लागणारे अक्षरांचे सर्व खिळे स्थानिकपणे सर चार्लस विल्किन्झ यांनी तयार केले होते. त्यातही दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे खिळे तयार करण्यासाठी एक भारतीय कारागीर शिक्षण देऊन तयार केला होता. त्यांचे नाव पंचानन कर्मकार असे होते. त्यांनी पुढे खिळे तयार करण्याची कला इतर भारतीय तंत्रज्ञांना शिकविली. नंतर चार्लस विल्किन्झ यांच्यावर कलकत्ता येथील नवीन सरकारी छापखाना सुरू करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांनीच नंतर देवनागरी व पर्शियन लिप्यांचे खिळे तयार केले.

मुंबई शहरातील मुद्रण प्रथम इंग्लंडमधून तयार करून आणलेल्या खिळ्यांच्या साह्याने केले जात होते. मद्रास प्रांतांमध्येही मुद्रण तंत्राने भक्कम पाया रोवला. तेथे तमिळ-इंग्रजी शब्दकोश १७७९ मध्ये व्हेपेरी येथे छापून प्रसिद्ध झाला. अठराव्या शतकाच्या शेवटी मुंबई, मद्रास व कलकत्ता या तिन्ही मोठ्या शहरांमध्ये आणखी बरीच मुद्रणालये निघाली व मुद्रण व्यवसायाचा पाया पक्का झाला. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुद्रणव्यवसायातील एक नवा टप्पा सुरू झाला.

इ. स. १८०० मध्ये कलकत्त्याजवळ सेरामपूर येथे विल्यम कॅरी यांनी स्वतःचा छापखाना चालू केला. त्यांनी पंचानन कर्मकार या प्रसिद्ध कारागिरांना बोलावून घेऊन नोकरी दिली व त्यांच्याकडून येथील विविध भाषांमधील अक्षारांचे साचे कोरून खिळे तयार करण्याचे काम सुरू केले. पंचानन कर्मकार व त्यांचे जावई मनोहर यांनी भारतातील बहुतेक सर्व लिप्यांमधील अक्षरे उत्तम प्रकारे तयार केली. शिवाय परदेशी भाषांच्या लिप्यांचे खिळेही त्यांनी तयार केले. चिनी लिपीसुद्धा त्यांनी हस्तगत केली. सेरामपूरची खिळे तयार करण्याची ओतशाळा ही भारतीय लिप्यांचे खिळे सहजपणे मिळण्याचे एकमेव ठिकाण होते व भारतातील छापखान्यांची गरज यशस्वीपणे भागवीत असे.

सेरामपूर येथील मिशनच्या छापखान्याने १८०१–३२ या काळात विविध भारतीय भाषा व परदेशी भाषा मिळून ४० भाषांमधील १२,००० ग्रंथ छापले. इंग्रज अधिकाऱ्यांनी फोर्ट विल्यम कॉलेज या शिक्षण संस्थेत भारतीय भाषांच्या शिक्षणासाठी मोठे उत्तेजन दिले व इंग्रज नागरिकांनी येथील भाषा शिकाव्यात म्हणून येथील भाषांमध्ये ग्रंथछपाईसाठी खूप खटपट केली. १८१८ मध्ये दिग्दर्शन व समाचार दर्पण नावांची नियतकालिके छापून प्रसिद्ध करण्याचे सर्व श्रेय विल्यम कॅरी व त्यांचा सेरामपूर मिशन छापखाना यांना द्यावे लागेल. मात्र त्याआधी १७८० मध्ये बेंगॉल गॅझेट नावाचे दैनंदिन वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. एकोणीसाव्या शतकात जसजसा साक्षरता व शिक्षण यांचा प्रसार वाढत गेला तसतसा मुद्रणव्यवसाय वाढत गेला व त्याला स्थैर्य येऊन एक भारदस्त परिणाम लाभले.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...