Saturday 7 September 2013

गूटेनबेर्क मुद्रणयंत्र

गूटेनबेर्क मुद्रणयंत्र : गूटेनबेर्क यांच्या काळातील कागदपत्रे व १४३९ च्या सुमाराला झालेल्या एका खटल्यातील काही नोंदी यांच्यामुळे सुरुवातीच्या काळापासून मुद्रणयंत्र वापरले जात होते, अशी माहिती उपलब्ध आहे. कदाचित प्रथम पुस्तकबांधणीसाठी वापरले जाणारे दाबयंत्र थोडेसे सुधारून त्याचा उपयोग पुस्तकाच्या मुद्रणासाठी केला गेला असावा. अक्षरांच्या खिळ्यांवर शाई लावून त्यांवर कागद ठेवून मग त्यावर यांत्रिक पद्धतीने (लाकडी मळसूत्राच्या-स्क्रूच्या-साहाय्याने) दाब देणे ही सर्व क्रिया या दाबयंत्रामार्फत होत असे. हे तंत्र पूर्वी लाकडी ठोकळ्यावरील अक्षरांवर दाब देऊन मुद्रण करण्याच्या तंत्रापेक्षा जास्त चांगले होते, कारण यामुळे अक्षरांच्या कडा जास्त ठळक होत असे. तरीही या तंत्रात काही त्रुटी होत्या. खिळ्यांवर शाई लावून नंतर त्यावर कागद ठेवणे हे फार त्रासदायक होत असे.सर्वसाधारणपणे १४७० पर्यंत प्राचारात आलेले मुद्रणयंत्र हे मुद्रणाच्या सर्व प्राथमिक गरजा भागवायला समर्थ झाले, अशी समजूत आहे. अक्षरांची जुळणी केलेली सर्व पाने (मजकूर) एका हलत्या पाट्यावर ठेवून तो पाटा पुढे-मागे करण्याची यांत्रिक सोय प्रथम अस्तित्वात आली. त्यामुळे मजकुरावर शाई रुळाच्या साह्याने लावून तो मजकूर मागे सरकवून त्यावर कागद ठेवणे व नंतर त्यावर दाबून मुद्रण करणे इतक्या क्रिया या यंत्रामध्ये होत असत. त्यानंतर काही यांत्रिक सुधारणा केल्यामुळे हेच यंत्र वापरणे जास्त सुलभ झाले. एका फर्म्याचे दोन भाग करून दोन यांत्रिक हालचालींनी तो फर्मा छापणे अशा पद्धतीने मुद्रण सुरु झाले व नंतर जवळजवळ ३०० वर्षे याच तंत्राचा उपयोग अक्षरदाब मुद्रणासाठी होत राहिला.

गूटेनबेर्कंनंतर यंत्रात झालेल्या सुधारण : पुढील ३५० वर्षामध्ये मळसूत्राच्या मुद्रणयंत्रामध्ये अनेकविध सुधारणा झाल्या व त्यांतील बहुतेक सर्व महत्त्वाच्या होत्या. १५५० च्या सुमाराला लाकडी मळसूत्राची जागा लोखंडी मळसूत्राने घेतली. त्यानंतर वीस वर्षांनी संशोधकांनी दुहेरी बिजागरीच्या साह्याने लोखंडी चौकट हलविण्याची सोय, फक्त अक्षरांच्या खिळ्यांवर शाई लावून उरलेल्या भागावरील शाई कागदावर उतरु नये म्हणून एक कातडी आवरण, दाब समान देण्यासाठी एक कापडी जाड थराची गादी वगैरे सुधारण केल्या. साधारण १६२० च्या सुमाराला अँम्स्टरडॅम येथे यंत्राचा पाटा आपोआप वर उचलला जावा म्हणून पाट्यावर दाबा देण्यासाठी जी एक पट्टी वापरली जात असे त्या पट्टीला प्रतिभार लावण्याची (समतोल राखण्यासाठी दुसरे वजन लावण्याची) सोय करण्यात आली. या यंत्राला 'डच मुद्रणयंत्र' असे नाव मिळाले व हेच यंत्र १६३८ मध्ये उत्तर अमेरिकेमध्ये प्रचारात आणले गेले. या सुधारणेचे जनक व्हिलेम यान्सन ब्लाऊ हे समजले जातात. १७९० च्या सुमाराला विल्यम निकलसन या इंग्रज वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी खिळ्यांवर शाई लावण्यासाठी कातडी आवरणाचा एक रूळ तयार करून तो वापरायला सुरुवात केली. यामुळे अशा यंत्रावर प्रथम चक्रीय गतीचा उपयोग केला गेला. कातडी आवरणाच्या ऐवजी नंतर सरस आणि मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी तयार करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाचा उपयोग रूळ करण्यासाठी करण्यात आला.

धातूचे मुद्रणयंत्र : इंग्लंडमध्ये १७९५ मध्ये प्रथमतः धातूचा उपयोग केलेले मुद्रणयंत्र तयार करण्यात आले. नंतर काही वर्षांनी अमेरिकेतील एका यंत्रज्ञाने एक धातूचे यंत्र तयार केले, त्यात मळसूत्राचा उपयोग करण्याऐवजी सलग अशा धातूच्या यांत्रिक सांध्यांचा उपयोग केला होता. या यंत्राचे नाव 'कोलंबियन' असे होते. त्याच्या नंतर सॅम्यूएल रस्ट यांनी 'वॉशिंग्टन' नावाचे यंत्र तयार केले. त्याचा ताशी वेग सु. २५० कागदांचा (प्रतींचा) होता.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...