Saturday 7 September 2013

इतिहास व विकास

मुद्रण : मुद्रण ही क्रिया रूढ अर्थाने कागदावर किंवा तत्सम पृष्ठावर ठसा उमटविणे ही होय. त्यावरून एकाच मजकुराचे किंवा चित्राचे अनेक ठसे उमटवून त्याच्या प्रती काढणे म्हणजे मुद्रण करणे असा अर्थ त्याला प्राप्त झाला. या तंत्राप्रमाणे त्याची व्याख्या म्हणजे योग्य अशा पृष्ठावर दाब देऊन रंगद्रव्याच्या साह्याने अक्षरे किंवा चित्र उमटविणे.
अलीकडील काळात अक्षरसमूह किंवा चित्रे मुद्रित करण्यासाठी पुष्कळ प्रकारची तंत्रे अस्तित्त्वात आली आहेत; पण त्या तंत्रांमध्ये यांत्रिक पद्धतीने दाब देऊन ठसा उमटविणे किंवा त्या मुद्रणासाठी रंगद्रव्याचे साहाय्य घेणे या गोष्टींचा समावेश होत नाही. या नवीन तंत्राच्या विकासामुळे जुन्या व रूढ तंत्रांचा वापर पुढे कदाचित पूर्णपणे थांबेल. त्यामुळे मुद्रणाची नवीन व्याख्या म्हणजे अलीकडील नवीन तंत्राचा वापर करुन काळ्या किंवा रंगीत शाईचा उपयोग करुन कोणत्याही टिकाऊ पृष्ठावर अक्षरे किंवा चित्रे मुद्रित करुन अनेक प्रती काढणे अशी करता येईल. मुद्रणामध्ये प्रथम शिसे, शाई, कागद, यंत्रे इ. गोष्टी वापरल्या गेल्या. त्यामुळे मुद्रणाशी या सर्वच गोष्टीची सांगड आपोआप घातली गेली; पण नंतर या तंत्राचा जो विकास होत गेला त्यामुळे या तंत्रात पुष्कळच बदल झाला.
मुद्रण तंत्राची सुरुवात झाल्यानंतर गेल्या पाच शतकांहून जास्त काळ या तंत्राने सुसंस्कृत समाजावर एक प्रकारे प्रभुत्व ठेवले आहे व ज्ञानाचा ठेवा जतन करून ज्ञानप्रसाराचे काम कौशल्याने केले आहे. मुद्रणाच्या या उपयुक्ततेला अलीकडच्या बिनतारी संदेशवहन, दूरचित्रवाणी, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), फीत ध्वनिमुद्रण इ. प्रगत तंत्रांनी फार मोठे आव्हान दिले आहे व या आव्हानाला मुद्रण तंत्रच पुष्कळसे कारणीभूत झाले आहे; तरीही मुद्रण तंत्राला स्वतंत्रपणे फार मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. पुस्तके किंवा वर्तमानपत्रांसाठीच फक्त या तंत्राचा वापर मर्यादित राहिलेला नाही. कापडावर, पत्र्यावर, भिंतीच्या कागदांवर, आवेष्टनांवर किंवा मोठया जाहिरातींवर मुद्रणाच्या अनेक तंत्रापैकी एकाचा वापर करून मुद्रण केले जाते. अतिसूक्ष्म अशा इलेक्ट्रॉनीय मंडलाच्या उत्पादनासाठीसुद्धा मुद्रण तंत्राचा उपयोग केला जातो [⟶मुद्रित मंडले; सूक्ष्मीकरण, इलेक्ट्रॉनीय मंडलाचे].
साधारणपणे ज्या काळात मोठे वैज्ञानिक शोध जगात लागत होते. त्याच काळात मुद्रण तंत्राचाही शोध लागल्याने ज्ञानाच्या प्रसाराला त्याची फार मोठी मदत झाली. शिवाय सामाजिक, आर्थिक किंवा सैद्धांतिक दृष्टया संस्कृतिसंगमाला चालना मिळून जगातील ज्ञान पसरण्याला मुद्रणाच्या प्रसारामुळे फार मोठी चालना मिळली. यामुळे मुद्रणाच्या शोधाला ज्ञान प्रसाराच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मुद्रित पुस्तकाचा मोठा फायदा प्रथम साक्षरता प्रसारासाठी झाला. व अजूनही विकसनशील देशांमध्ये होत आहे. त्यातूनच पुढे सामान्य ज्ञानाच्या प्रसारालाही त्याची फार मोठी मदत झाली. विशेषतः आर्थिक दृष्ट्या प्रगत अशा वर्गाला या ज्ञानप्रसाराची फार मदत झाली. सुरुवातीला या ज्ञानप्रसाराला राजघराण्यांनी तुच्छ लेखले. प्रारंभीच्या पुस्तकांमध्ये वैज्ञानिक मजकूर व वाङ्‌मयीन गोष्टी यांचा प्रभाव जास्त असे व त्या खालोखाल धार्मिक मजकुराला महत्त्व असे. प्रथम कॅथलिक व नंतर प्रोस्टेस्टंट या पंथाच्या धर्मप्रचाराला मुद्रण तंत्राचा फार फायदा झाला. पंधराव्या शतकामध्ये त्याचा प्रसार प्रथम झाला नाही, या गोष्टीला एक विशिष्ट अर्थ आहे. मुद्रण तंत्राची प्राथमिक माहिती चीनसारख्या देशामध्ये बाराव्या शतकाच्या आधीपासून होती, तरीही यूरोपमध्ये या तंत्राचा प्रसार आधी झाला, या गोष्टीला महत्त्व आहे. यूरोपमध्ये प्रथम लिहिण्याचे तंत्र प्रगत झाले ते अमूर्त वर्णमालेतील अक्षरांच्या साह्याने व त्या अक्षरांची संख्या फार मर्यादित होती. शिवाय या अक्षरांना प्रथम नुसत्या खुणांचे स्वरूप होते. त्यामुळे हलत्या अक्षरांसाठी आणि खुणांसाठी प्रथम खिळे तयार करण्याचे तंत्र बरेच सुलभ झाले. चिनी वर्णमालेच्या साधारणपणे ८०,००० खुणांचा (अक्षरचिन्हांचा) उपयोग करावा लागत असल्याने मुद्रण योजनेच्या दृष्टीने या लिपीचा उपयोग फारच कमी होता. या कारणामुळे यूरोपातील संस्कृतीपेक्षा पौर्वात्य संस्कृती निश्चितपणे जास्त प्रगत असूनही तिचा विकास गेल्या ४-५ शतकांमध्ये फार सावकाश झाला व तुलनेने यूरोपीय संस्कृती फार झपाट्याने प्रगत झाली.

मुद्रणामुळे ज्ञानाचा साठा होण्याला व त्याची अविरत वाढ होण्यला मदत झाली. प्रत्येक पुढील युगाला मागच्या ज्ञानाच्या साठ्याचा ठेवा मिळाला व त्या त्या काळातील माणसांनी पूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यात नवीन ज्ञानाची भर घातली. फ्रेंच साहित्यिक दनी दीद्रो यांनी अठराव्या शतकाच्या मध्याला त्या भाषेतील विश्वकोशाची सुरुवात करून तो प्रसिद्ध केला तेव्हापासून सध्याच्या काळापर्यंत ज्ञानसाधनांमध्ये इतकी प्रचंड भर पडली आहे की, तिचे मोजमाप करणे अशक्य आहे. या ज्ञानसाधनांमुळे जगाच्या सर्वसाधारण दृष्टिकोनामध्ये फार मोठा फरक पडला व त्यात जो बदल घडत गेला त्याचा वेगही सारखा वाढत गेला आणि तीच क्रिया आजतागायत चालू आहे. या बदल होण्याच्या क्रियेमध्ये एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीची आणि विसाव्या शतकातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीची फार मोठी भर पडली. औद्योगिक क्रांतीमुळे आणि सुधारणेमुळे समाजाचे जे आर्थिक संक्रमण झाले त्याला मुद्रणामुळे मदत झाली व सामाजिक बदल त्यामुळे शक्य झाले. मानवी हक्कसंहिता, अमेरिकेची राष्ट्रघटना, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेला वैचारिक बदल आणि एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाचे सामाजिक परिवर्तन या सर्व गोष्टी मुद्रणाच्या प्रगतीमुळे शक्य झाल्या व त्यांचे पुढील पिढ्यांसाठी जतन झाले. पुस्तके, मासिके आणि इतर मद्रित गोष्टी यांच्या साह्याने ज्ञानाच्या सर्वसामान्य गोष्टी समाजाच्या पुष्कळ कनिष्ठ थरापर्यंत सहज पोहोचल्या. जेथे साक्षर समाज मोठा आहे, त्या देशांमध्ये तर ज्ञानप्रसार होण्यासाठी मुद्रणाची फार मदत होते.
अलीकडील काळातील चढाओढीच्या, स्पर्धेच्या वातावरणामुळे मुद्रणावर अनिष्ट परिणाम होऊन ते हळूहळू नाहीसे होणार असा एक समज बळावत आहे. त्या उलट वरील समज चुकीचा आहे असा विचार व्यक्त होतो कारण मुद्रित विचार किंवा ज्ञान यांचा फायदा रेडिओ किंवा दूरचित्रवाणी या इतर माध्यमांपेक्षा वेगळा आणि जास्त मौल्यवान आहे. रेडिओवरील शब्द व दूरचित्रवाणीवरील चित्रे यांचा परिणाम मनावर तत्काळ पण वरवर होतो व तो टिकाऊ नसतो. मुद्रित शब्द किंवा चित्रे यांची निर्मिती जरी जास्त वेळ घेणारी असली, तरी त्यांचा टिकाऊपणा हा जास्त मौल्यवान आहे, कारण मुद्रित पुस्तक हवे तेव्हा उपलब्ध होऊ शकते आणि वाचल्यावर त्याबद्दल विचार करणे हे जास्त सोईचे असते. जरी फीत ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, सूक्ष्म छायाचित्रण किंवा इतर साधने यांच्या साहाय्याने ज्ञानाचा फार मोठा मोठा करता आला, तरी त्याच्या उपयोगासाठी ध्वनिक्षेपक किंवा चित्रवर्धक वगैरे गोष्टींच्या साहाय्याशिवाय सामान्य माणसाला या ज्ञानाच्या साठ्याचा उपयोग करणे अशक्य आहे. म्हणून मुद्रित ज्ञान हे सामान्य माणसाला चटकन उपलब्ध होण्याची शक्यता जास्त आहे व साक्षर व्यक्तीला हे ज्ञानसाधन सर्वांत कमी खर्चाचे आहे. त्यामुळे मुद्रित अक्षरे नाहीशी होण्याऐवजी त्यांचे महत्त्व जास्त वाढत आहे व इतर यांत्रिक माध्यमांच्या बरोबरीने मुद्रण या माध्यमाचे महत्त्व लक्षात येत आहे.

इतिहास व विकास : इ. स. नंतरच्या दुसऱ्या शतकाच्या शेवटी चिनी लोकांनी स्वानुभवाने अक्षरे किंवा मजकूर मुद्रित करण्याची पद्धती शोधून काढली होती. त्या काळी मुद्रणासाठी ज्या तीन प्राथमिक वस्तूंची गरज होती त्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत्या; उदा., कागद, शाई व मुद्रणप्रतिमा. कागद तयार करण्याचे शास्त्र त्यांना त्याआधी काही दशक वर्षे माहीत होते. शाई तयार करण्याची माहिती त्याआधी जवळजवळ अडीच हजार वर्षे चिनी लोकांना माहित होती. मुद्रण प्रतिमा हा कोरून तयार केलेल्या पृष्ठाची असे व तिचे स्वरूप वेगवेगळे असे. मुद्रणप्रतिमा ही उठावाच्या स्वरुपात व इतर भाग कोरून खोल गेलेल्या अशा स्वरूपात असे. त्या वेळी काही मजकूर (बौद्ध धर्मातील काही विचार) संगमरवरी (दगडी) खांबावर कोरून ठेवलेले असत. यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत. काही मजकूर धार्मिक स्वरूपाचा असे व त्याचे रूप मुद्रेसारखे (सीलसारखे) असे आणि त्यावर शाई लावून तो मजकूर कागदावर उठवण्यासाठीच त्या मुद्रेचा उपयोग केला जात असे. या मुद्रांमुळे त्याला लावण्याच्या शाईत सुधारणा होऊन ती मुद्रणाला योग्य केली गेली. हा काळ इ. स. चौथे किंवा पाचवे शतक होता.

नंतर सहाव्या शतकामध्ये संगमरवरी दगड किंवा मुद्रा या मुद्रण माध्यमांची जागा जास्त सोईस्कर अशा लाकडी ठशांनी घेतली कारण लाकडावर कोरणे हे तुलनात्मकपणे जास्त सोईचे होते. मुद्रणप्रतिमा कोरण्यासाठी लाकडी फळीचा आकारही जास्त सोईस्कर ठरला. प्रथम एका पातळ कागदावर मजकूर शाईने लिहिला जात असे व हा कागद शाईंची बाजू खाली करून लाकडी पृष्ठावर दाबला जात असे. त्याआधी लाकडी पृष्ठावर तांदळाच्या पिठाची खळ लावली जात असे, त्यामुळे कागदावरील शाई या खळीवर सहज चिकटून बसे. त्यानंतर कोरीवकाम करणारा कारागीर लाकडी पृष्ठावर जेथे शाई लागलेली नसे तो भाग हत्यारांनी कोरून काढून टाकीत असे. मुद्रणप्रतिमेचा भाग त्यामुळे उठावदार असा तयार होत असे व मुद्रणाला योग्य अशी उलट प्रतिमा मिळत असे. प्रत्यक्ष मुद्रण करताना कोरलेल्या लाकडी पृष्ठावर प्रथम शाई लावून त्यावर कागद पसरून नंतर एका कुंचल्याने कागदाची मागची बाजू दाबली जाई. मात्र यात कागदाची एकच बाजू मुद्रणासाठी वापरता येते. या पद्घतीने (तंत्राने) मुद्रित केलेला सर्वांत जुना मजकूर प्रथम जपानमध्ये इ. स. ७६४-७० च्या दरम्यानचा आहे व तो बौद्धांचा धार्मिक मजकूर आहे. चीनमध्येही इ. स. ८६८ च्या सुमाराला हीरक सूत्र या नावाचे पुस्तक प्रथम मुद्रित झाले. नंतर ९३२ च्या सुमाराला फाँग ताओ नावाच्या एका मंत्र्यांच्या प्रेरणेने १३० खंडांमध्ये चिनी अभिजात वाङ्‌मय मुद्रित करण्याला सुरुवात झाली.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...